टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल
आपले ध्येय गाठण्यासाठी अतिशय परिश्रम करून, कुटुंबाच्या सुखाला तिलांजली देऊन, मुंबई गाठून दिग्दर्शनाचे स्वप्न पूर्ण करणारा दिग्दर्शक म्हणजे करण सुमन अर्जुन.
करण मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील, अकोला तालुक्यातील तांबोळ गनोरे गावचा. शालेय शिक्षण झाल्यानंतर कॉलेज शिक्षण अर्धवट सोडून, मनोरंजनाच्या क्षेत्रात काही तरी करण्यासाठी त्याने पुणे गाठले. पुण्यातील मंगल थिएटर संस्थेकडून अभिनयाच्या क्षेत्रातील बारकावे शिकायला मिळाले. संघर्ष सुरूच होता, मार्ग काही सापडत नव्हता. नंतर त्याने मुंबई गाठली. तेथे त्याने नाटकात बॅक स्टेजसाठी काम केले. ‘उंच माझा झोका’साठी त्याने काम केले. दिग्दर्शक अतुल जगदाळे यांच्या ‘गणवेश’ चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले. ‘वर्तुळ’ चित्रपटाचे त्याने नंतर त्याच्या गावी शूटिंग केले.
दोन वर्षांनंतर जीवन लहाटे या मित्राचा त्याला फोन आला. त्यांनी साऱ्यांनी मिळून ‘हलगट’ नावाचा चित्रपट तयार करण्याचे ठरविले. हलगट म्हणजे ‘रेडा.’ पारधी समाजात आर्थिक सुबत्ता येण्यासाठी, वर्षातून एकदा रेड्याचा बळी देण्याची प्रथा आहे. हलगट चित्रपट हा मर्डर मिस्ट्री आहे. या चित्रपटामध्ये चोरी करणारी एक टोळी असते. बिबट्या, जिलेबी, बाब्या हे या टोळीतील सदस्य असतात. या टोळीतील नायकाचे इतरांशी पटत नाही. नायक, नायिका घेऊन वेगळी चूल मांडतात. या चित्रपटाचे शूटिंग तीस ते पस्तीस दिवसांत झाले. या चित्रपटामध्ये एक सॅड साँग आहे. सामान्य पात्रांची असामान्य गोष्ट या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टी व वावरणारे पात्र या चित्रपटात दिसून येणार असल्यामुळे, त्याची मनोरंजकता वाढणार आहे.
खूप मेहनत घेऊन, त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मराठी सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही, अशी खंत त्याने व्यक्त केली. मराठी चित्रपटाचा विषय चांगला असतो, त्यामुळे त्याला सर्व प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. परंतु मराठी सिनेमा सर्व स्तरापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. चित्रपट निर्मितीनंतर तो सर्व थिएटरमध्ये रिलिज केला पाहिजे. टेक्निकली मराठी चित्रपट चांगला बनविला गेला पाहिजे, कारण त्याची स्पर्धा बॉलिवूड, हॉलिवूडशी असते.
करणच्या ‘हलगट’ या आगामी चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा!