राजरंग – राज चिंचणकर
तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी
नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः।
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।
आकाशात गडद मेघांची झालेली दाटी, पर्जन्यधारांची बरसात आणि एकूणच पार धुंद झालेला आसमंत अशा पद्धतीने निसर्गाच्या पटावर आषाढ मासाचा पहिला दिवस रंगतो. अशा वातावरणात कधी काळी, दूरदेशी राहिलेल्या प्रियतमेच्या आठवणीने व्याकूळ होत, तिचा विरह सहन करणारा प्रियकर म्हणजे एखादी कवी कल्पना वाटली, तरी तिचे महत्त्व मात्र अनन्यसाधारण आहे. कारण ही कल्पना कविकुलगुरू कालिदासाच्या लेखणीतून उतरली आहे. काही शतकांपूर्वी उद्भवलेल्या अशा स्थितीवर मात करण्यासाठी, महाकवी कालिदासाने थेट आभाळातल्या मेघाकडे संदेशवहन करण्याचे कार्य सोपवले आणि त्यातून ‘मेघदूत’ हे अजरामर काव्य निर्माण झाले.
आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघाकरवी धाडण्यात आलेला सांगावा आणि त्यातून प्रसवलेल्या ‘मेघदूत’ या काव्याने शतकानुशतके भारतवर्षातल्याच नव्हे; अखिल विश्वातल्या विद्वानांना त्याची पारायणे करायला भाग पाडले आहे. कालिदासाच्या एकूणच साहित्याने केवळ भारतातलेच नव्हेत; तर पाश्चिमात्य देशातले विद्वानही अचंबित झाले आहेत. कालिदासाची महाकाव्ये, नाटके यांची जादू विश्वभर आजही कायम आहे. कालिदासाचा हा ‘आषाढस्य प्रथम दिवसें’ कालचक्रागणिक कलियुगातही येत असला, तरी अनंतकाळाचे कवित्व सांगतच तो उजाडतो. वास्तविक इतर मराठी मासांप्रमाणेच आषाढ महिनाही येतो; पण त्याच्या पहिल्या दिवसाला गहिरी डूब देऊन मार्गस्थ होत, तो त्याची खूण मात्र काळाच्या पडद्यावर उमटवत राहतो.
महाकवी कालिदासाने ‘मालविकाग्निमित्र’, ‘विक्रमोर्वशीय’ व ‘शाकुंतल’ ही नाटके; तर ‘मेघदूत’, ‘कुमार संभव’, ‘रघुवंश’ आदी महाकाव्ये लिहिली. त्याचे ‘शाकुंतल’ हे नाटक विश्वातल्या उत्तम नाटकांत स्थान मिळवून आहे. ‘मेघदूत’ या महाकाव्याने तर अनेकांवर मोहिनी घातली. अनेक साहित्यिकांना ‘मेघदूत’चा अनुवाद करण्याची भुरळ पडावी, यातच या महाकाव्याचे उच्च स्थान स्पष्ट होते. वास्तविक कालिदासाने फक्त ‘मेघदूत’च लिहिले असते, तरी त्याच्या ‘कविकुलगुरू’ या पदाला अजिबात धक्का पोहोचला नसता. याच ‘मेघदूत’मध्ये म्हटलेल्या आषाढाच्या पहिल्या दिवशी प्रियतमेला मेघाकरवी सांगावा धाडण्याची कल्पना, ही केवळ कवी कल्पना नसून, ही घटना म्हणजे कालिदासाच्या प्रत्यक्ष जीवनातील अनुभव असावा, असेही म्हटले जाते.
कालिदास मूळचा बंगाल प्रांतातला किंवा उत्तर भारतातल्या प्रांतातला असावा असे अनुमान काही जणांनी काढले आहे. त्याच्या ग्रंथात हिमालय पर्वत आणि उत्तर भारतातल्या प्रदेशांची वर्णने आढळतात. त्यामुळे काही काळ तरी कालिदासाचे वास्तव्य हिमालयाच्या प्रदेशात असावे, असेही म्हटले जाते. पण ज्या रामगिरी पर्वतावर कालिदासाने ‘मेघदूत’ रचले. तो पर्वत म्हणजे सद्यकाळातल्या नागपूरच्या जवळ असलेला ‘रामटेक.’ ही बाब मात्र सर्वमान्य आहे. कुबेराने शाप दिल्याने जो यक्ष अलकानगरी सोडून रामगिरीवर आला आणि जो ‘मेघदूत’ या काव्यासाठी निमित्तमात्र ठरला, तो यक्ष दुसरा तिसरा कुणी नसून कालिदासच असावा, अशी शक्यताही वर्तवली जाते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, आषाढाचा पहिला दिवस ‘कविकुलगुरू कालिदास दिन’ म्हणून मान्यता पावला आहे. आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास आणि त्याच्या ‘मेघदूत’ची आठवण हटकून येते. कविकुलगुरू कालिदासाचे महत्त्व जपत, आषाढाच्या पहिल्या दिवसाची महती उत्तरोत्तर वाढतच राहिली आहे. या काव्याद्वारे प्रेमीजनांची कथा आणि व्यथा तर कायम जागती राहिलीच आहे; परंतु ज्या दिवशी हे काव्य कालिदासाला स्फुरले, तो ‘आषाढस्य प्रथम दिवसें’ शतकानुशतके महाकवी कालिदासाची याद जागवत राहिला असून, या दिवसाला चिरंजीवित्व प्राप्त झाले आहे.