फिरता फिरता – मेघना साने
अमेरिकेत मराठी मंडळ टॅम्पा बे येथे हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यासाठी मी आणि हेमंत साने २०१७ साली
गेलो होतो. आमच्या कार्यक्रमासाठी स्थानिक गायिका शोधताना, जान्हवी केंदे यांच्याशी ओळख झाली. ती तेथील पंडित जसराज स्कूल ऑफ म्युझिकमध्ये शास्त्रीय संगीत शिकत आहे, असे कळले. त्या निमित्ताने अमेरिकेत शास्त्रीय संगीत शिक्षणाचे वर्ग चालतात, ते आम्हाला कळले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिच्या संगीत क्लासलाच भेट दिली. क्लासचे गुरू पंडित राधारमण कीर्तने यांच्याकडे ती तन्मयतेने शिकत होती. वर्गाची वेळ संपल्यावर आमचा गुरुजींशी संवाद सुरू झाला.
पंडितजी, नमस्ते! या निमित्ताने पंडित जसराज स्कूलमधील एका गुरूची भेट घेण्याचा योग आला.
नमस्कार मेघना साने. आपण नाट्यसंपदाच्या? ‘तो मी नव्हेच’ नाटकात सुनंदा दातारची भूमिका करत होतात ना? मी
तुमचे नाटक पाहिले आहे. पंडितजी हसत हसत म्हणाले. अहो, मीही तुमच्याप्रमाणे नाट्यसंपदाच्या नाटकातच काम करत होतो. मग संगीताचीच आवड निर्माण झाली आणि संगीतातच करिअर केले. आता गुरुजींनी (पंडित जसराजजी) मला इथेच संगीताचे शिक्षण देण्यासाठी राहण्यास सांगितले आहे. टॅम्पा येथील जसराज स्कूल माझ्यावर सोपवली आहे. त्यामुळे मूळचे मुंबईचे असलेले पंडित राधा रमण कीर्तने आता अमेरिकेतच राहतात आणि तेथील विद्यार्थ्यांना शिकवतात. वर्षांतून कधीमधी घरी जायला मिळते. त्यांच्याशी बोलताना पंडित जसराज यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
एकदा पंडित जसराज यांचे गाणे त्यांनी ऐकले आणि त्यांना त्यांचे शिष्यत्व पत्करावे असे वाटले. ते थेट पंडित जसराजजींच्या घरी संगीत वर्गात जाऊन बसले आणि ‘कट्यार काळजात घुसली’मधील नाट्यगीत गायले. ते ऐकून गुरुजींना ते शिष्य म्हणून योग्य वाटले. पंडित राधारमण पुढे सांगत होते, त्यांचे असे होते की, एकदा एखाद्याला शिष्य मानला की मानला! तेव्हापासून पंडित जसराज यांनी आयुष्यभर आम्हाला शास्त्रीय संगीताचे धडे दिले. परंतु पैसे घेतले नाहीत. एवढेच काय, आम्ही विद्यार्थी त्यांच्या मैफलीत तंबोरा किंवा पेटी वाजवायचो, तेव्हा ते कलाकार म्हणून आमचा मान ठेवत आणि आम्हाला पाकीट देत. गाताना जर एखादी सुंदर तान शिष्याच्या गळ्यातून निघाली की, लगेच ‘जीते रहो’ अशी आशीर्वादरूपी दाद देत. संगीत मार्तंड पंडित जसराजजी यांना तीन पद्म पुरस्कार मिळाले होते. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण! भारतात आणि अमेरिकेत त्यांनी आपल्या मेवाती घराण्याच्या संगीताचे अनेक शिष्य घडवले. संगीत क्षेत्रात त्यांचे खूप योगदान आहे.‘जसरंगी’ हा गायनाचा प्रकार म्हणजे स्त्री आणि पुरुष गायक कलाकारांनी एकाच वेळी दोन वेगळ्या रागांचे व्यासपीठावर सादरीकरण करून दाखवणे. हा अभिनव प्रकार त्यांच्या कल्पनेतून आला. याचे यशस्वी सादरीकरण त्यांचे शिष्य करत असतात. जसराजजींनी अमेरिकेत काही काळ आणि भारतात काही काळ राहून दोन्ही देशांत अनेक शिष्य घडवले.
अमेरिकेतील अनेक प्रांतात पंडित जसराजजी यांचे अनेक शिष्य पंडित जसराज स्कूल चालवत आहेत. उदा. न्यूयॉर्क,
न्यूजर्सी, पिट्सबर्ग, पेनसिल्वानिया येथे पद्मश्री पंडिता तृप्ती मुखर्जी या शिष्य घडवत आहेत, तर पंडित प्रीतम भट्टाचारजी हे अटलांटा येथील स्कूलचे मार्गदर्शन करतात. ह्यूस्टन येथे पंडित सुमन घोष तर टोरांटो, कॅनडा येथे अमित आर्या आणि मुंबईमध्ये पंडित रतन मोहन शर्मा आणि अंकिता जोशी हे जसराज स्कूलसाठी गुरू लाभले आहेत. पंडिता तृप्ती मुखर्जी यांचे शिष्य व नामवंत गायक सुहास जोशी यांची न्यू जर्सीमध्ये भेट झाली. बडे गुरुजी अमेरिकेत येत, तेव्हा आपल्या शिष्यांसाठी शिबिरे घेत असत आणि त्यात फार सुंदर मार्गदर्शन मिळत असे. याबाबत सुहास जोशी सांगत होते. पंडित जसराजजींचे (बडे गुरुजी) शिबीर दिवसभराचे असायचे. अमेरिकेतील निरनिराळ्या प्रांतात शिकणारे जवळ जवळ २०० हून अधिक विद्यार्थी या शिबिरात सहभागी असायचे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारे शिबीर बुधवार संध्याकाळ ते रविवार दुपार असे असायचे. न्याहारी व जेवणाची वेळ सोडून विद्यार्थी पूर्ण वेळेस संगीतातच बुडलेले असायचे.
शिबिरात गुरुजन आणि आम्ही एकाच ठिकाणी राहायचो. त्यामुळे बडे गुरुजींचा आणि इतर गुरुजनांचाही सहवास आम्हाला मिळायचा. संध्याकाळच्या जेवणानंतर थोडे मनोरंजन असायचे. विद्यार्थी आपली कला सादर करत असत. दहा-बारा वर्षं शास्त्रीय संगीताचे सातत्याने शिक्षण घेतल्यावर गुरूंकडून परवानगी घेऊन, सुहास जोशी यांचे जाहीर कार्यक्रम सुरू झाले. २००८ साली, पंडिता तृप्ती मुखर्जी यांनी असे सूचित केले की, मेवाती घराण्याच्या तीन पिढ्यांचे गाणे एकाच मैफलीत व्हावे. पहिली पिढी म्हणजे पंडित जसराज, दुसरी पिढी म्हणजे पंडिता तृप्ती मुखर्जी आणि तिसरी पिढी म्हणजे त्यांचा शिष्य म्हणून पंडित जसराज यांनी सुहास जोशी यांची निवड केली, असे या मैफिलीचे नाव होते. ही मैफील यू. एस. ए.मध्ये चांगलीच गाजली. मेवाती घराण्याच्या गायकीचे वेगळेपण काय सांगाल? या माझ्या प्रश्नावर सुहास जोशी उत्तरले, मेवाती घराण्याची गायकी भावपूर्ण असते.
स्वर विलास करताना कोणता तरी भाव व्यक्त करण्यासाठी आहे. हे मुळात विसरून चालणार नाही. भारतीय शास्त्रीय संगीत हे स्पिरिच्युअल आहे आणि सायंटिफिकसुद्धा असे बडे गुरुजी म्हणत. १९९५ साली पंडित जसराजजींनी अमेरिकेत शास्त्रीय संगीत शिक्षण देण्यासाठी लावलेल्या जसराज स्कूल ऑफ म्युझिक या वृक्षाच्या शाखा अनेक प्रांतात बहरल्या आहेत आणि मेवाती घराण्याचा वारसा पुढील पिढ्यांकडे जात आहे.