
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४मद्ये दक्षिण आफ्रिकेला हरवत टीम इंडिया मायदेशात परतली आहे. टीम इंडिया ४ जुलैला सकाळी ६ वाजून९ मिनिटांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली होती.
यानंतर टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले. येथे चॅम्पियन्स आणि टी-२० वर्ल्डकप ट्रॉफीची विजयी मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत लाखोंच्या संख्येने चाहते होते. यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये चॅम्पियन्ससाठी कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात विराट कोहलीने जसप्रीत बुमराहचे तोंडभरून कौतुक केले.
कोहली म्हणाला 'बुमराह हा राष्ट्रीय खजिना आहे'
भारतीय फलंदाज विराट कोहलीने जसप्रीत बुमराहवर स्तुती सुमने उधळताना म्हटले की तो भारताचा राष्ट्रीय खजिना आहे. तसेच तो जगातील आठवे आश्चर्य आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सन्मान सोहळ्यादरम्यान कोहलीशी बातचीत करताना तेथील उपस्थितांनी त्याला मजेशीर अंदाजात विचारले की बुमराहला राष्ट्रीय खजिना आणि जगातील आठवे आश्चर्य घोषित करणाऱ्या याचिकेवर स्वाक्षरी करशील का?
यावेळी थोडासाही विलंब न लावता विराट कोहलीने उत्तर दिले की मी आता या याचिकेवर स्वाक्षरी करण्यास तयार आहे. त्याला स्वत:ला ठरवायचे आहे की कशा पद्धतीचे वेळापत्रक बनवायचे आहे. आम्हाला फक्त इतके वाटते की त्याने जितके शक्य असेल तितके खेळावे. तो एखाद्या पिढीमध्ये येणारा एकमेव गोलंदाज आहे आणि आम्हाला गर्व आहे की तो आपल्यासाठी खेळतो.
विराट कोहलीने मान्य केले की जेव्हा शेवटच्या पाच षटकांत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी केवळ ३० धावा हव्या होत्या. तेव्हा त्यांना वाटले होते की भारताचा विजय कठीण आहे. मात्र बुमराहच्या खेळीने साऱ्यांनाच प्रभावित केले. त्याने केवळ ६ धावा देत एक विकेट घेत संघाला पुन्हा खेळात आणले.