
मुंबई: टीम इंडिया(team india) टी-२० वर्ल्डकपची चॅम्पियन ठरली आहे. फायनल सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवत खिताब आपल्या नावे केला. चमचमणाऱ्या ट्रॉफीसह टीम इंडियाला २०.३६ कोटी रूपयांचे बक्षीसही मिळाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाला १२५ कोटी रूपये देण्याची घोषणा केली.
भारतीय संघ मायदेशात परतल्यानंतर त्यांचे चॅम्पियनप्रमाणे स्वागत झाले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रिकेटर्सची भेट घेतली. पंतप्रधानांच्या भेटीनंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला. हा फोटो होता १९८३मध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा. तेव्हा भारताने कपिल देवच्या नेतृत्वात लॉर्ड्सच्या मैदानावर वेस्ट इंडिजला हरवत क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता.
मायदेशात परतल्यानंतर या भारतीय संघाची केवळ पंतप्रधान इंदिरा गांधीच यांनी भेट घेतली नाही तर त्यावेळचे राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग हे ही खेळाडूंना भेटले. मात्र तुम्हाला माहीत आहे का की त्यावेळेस भारतीय संघाला किती पैसे मिळाले होते. बीसीसीआय आज जितकी श्रीमंत संस्था आहे तेवढी त्यावेळेस नव्हती. तेव्हा बोर्डाकडे इतका पैसा नव्हता.
कपिल देवच्या नेतृत्वात टीम इंडिया जेव्हा वर्ल्डकप जिंकून परतली तेव्हा बीसीसीआयच्या हातात काही नव्हते मात्र खेळाडूंना काहीतरी द्यायचे मात्र होते. तेव्हा एनकेपी साळवे बीससीआयचे अध्यक्ष होते. ते लता मंगेशकर यांच्याकडे गेले आणि दिल्लीत एक कॉन्सर्ट घेण्याची विनंती केली. यामुळे खेळाडूंसाठी पैसा जमा करता येईल. लता मंगेशकर यांनी लगेचच हो म्हटले.
दिल्लीत लता मंगेशकर यांची कॉन्सर्ट सुपरहिट ठरली. या कॉन्सर्टच्या माध्यमातून २० लाख रूपये जमा झाले आणि बीसीसीआयने क्रिकेट वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघातील प्रत्येक सदस्याला प्रत्येकी एक लाख रूपये दिले. विशेष म्हणजे या कॉन्सर्टसाठी लता मंगेशकर यांनी एक रूपयाही घेतला नव्हता.