Saturday, March 22, 2025
Homeमहत्वाची बातमीBritain government : ब्रिटनमध्ये सत्ताबदल! ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव

Britain government : ब्रिटनमध्ये सत्ताबदल! ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव

आता ‘हे’ असणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान

लंडन : ब्रिटनमध्ये (Britain) काल म्हणजेच ४ जुलै रोजी पंतप्रधान पदासाठी मतदान झालं होतं. या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. यात लेबर पार्टीने (Labour Party) बहुमताचा आकडा पार केला आहे तर आतापर्यंत ब्रिटनचे पंतप्रधान असलेल्या ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचा हुजूर पक्ष (Conservative party) मात्र पिछाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर ऋषी सुनक यांनी आपला पराभव मान्य करत कीर स्टार्मर (Keir Starmer) यांचं अभिनंदन देखील केलं आहे. त्यामुळे आता ब्रिटनमध्ये सत्ताबदल होणार असून कीर स्टार्मर हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत.

ब्रिटनमध्ये एकूण ६५० जागांसाठी निवडणूक झाली होती. बहुमतासाठी ३२६ जागांची आवश्यकता असते. सध्या लेबर पार्टीने ३९२ जागांवर आघाडी घेतली आहे, तर कंझर्व्हेटिव्ह पार्टी १०१ जागांवर आघाडीवर आहे. लेबर पार्टी बहुमताचा आकडा सहज पार करत असल्याचं सध्याचं चित्र आहे. याशिवाय मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये देखील कीर स्टार्मर ब्रिटनचे पंतप्रधान होतील, असं सांगण्यात आलं होतं.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मजूर पक्षाला ६५० पैकी ४१० जागांवर विजय मिळेल, असं सांगण्यात आलं होतं. मजूर पक्ष सत्तेत आल्यास तब्बल १४ वर्षानंतर हुजूर पक्ष सत्तेबाहेर होईल. आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार कल मजूर पक्षाच्या बाजूने आहेत. सुनक यांच्या पक्षाल १३१ जागा मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांच्या पक्षाला ३४६ जागा मिळाल्या होत्या. हुजूर पक्षाला त्यांच्या अंतर्गत वादाचा फटका बसल्याचं बोललं जात आहे.

वेळेआधीच सार्वत्रिक निवडणुकांची केली घोषणा

ऋषी सुनक यांनी वेळेआधीच सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कंझर्व्हेटिव्ह पक्षाबाबत ब्रिटनच्या जनतेमध्ये काहीसे नकारात्मक वातावरण होते. त्यामुळे त्यांनी वेळेआधी निवडणुका जाहीर केल्याने त्यांनी ही मोठी रिस्क घेतल्याचं बोललं जात होतं. ऋषी सुनक यांना जनतेने नाकारल्याचं स्पष्ट झालं आहे.

काय म्हणाले ऋषी सुनक?

लेबर पार्टीला बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट होताच सध्याचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी माध्यमांसमोर येऊन आपल्या पक्षाचा पराभव मान्य केला. पक्षाला विजय मिळवून देता आलं नाही, याबाबत त्यांनी पक्षाची माफी देखील मागितली आहे आणि विजयी लेबर पार्टीचे अभिनंदन केले आहे.

सुनक म्हणाले की, लेबर पार्टीने बहुमताचा आकडा पार केला आहे. मी सर कीर स्टार्मन यांचे विजयाबद्दल अभिनंदन करतो. आता शांततेतं सत्ताहस्तांतरण होईल. जनतेने दिलेला कौल मी मान्य करतो. पराभवातून खूप काही शिकायचं आहे. मी पराभवाची पूर्ण जबाबदारी घेतो. पक्षातील नेत्यांनी अहोरात्र प्रयत्न केले होते, पण शेवटी आमचा पराभव झाला आहे. आम्ही समाजासाठी काम करत राहू. मी पक्षाची माफी मागतो.

सुनक यांनी आता लंडनला जाणार असून तिथं निकालाच्या दृष्टीनं चिंतन करणार असल्याचं म्हटलं. पंतप्रधान म्हणून मिळालेल्या कार्यकाळात खूप काम केलं. माझं सर्वस्व यामध्ये झोकून दिलं होतं, असं सुनक म्हणाले.

काय म्हणाले कीर स्टार्मर?

स्टार्मर यांनी मजूर पक्षाला मिळालेल्या जनतेच्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. आम्ही लोकांसाठी काम करु, ज्यांनी मतदान केलं नाही त्यांचे देखील आभार, असं स्टार्मर म्हणाले. स्टार्मर यांनी आम्ही जनतेच्या मुद्द्यांवर बोलत राहू, जनतेसाठी दररोज लढू, बदलांसाठी तयार आहोत, असं म्हटलं. तुमच्या मतांनी बदल सुरु झाल्याचं स्टार्मर म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -