Thursday, October 30, 2025
Happy Diwali

चिंतनाचे महत्त्व किती?

चिंतनाचे महत्त्व किती?

जीवन संगीत - सद्गुरू वामनराव पै

तुमचे नशीब जर तुम्हाला बदलायचे असेल, तर ते तुम्हाला बदलता येते. नियती किंवा नशीब तुम्हाला घडविता येते. चांगले नशीब किंवा वाईट नशीब. नशीब हे असे दोन प्रकारचे असते. कमनशिबी किंवा नशिबवान. चिंतनाने काय काढायचे, हे तुम्हाला कळले पाहिजे, कारण शुभ काढायचे की अशुभ हे तुमच्या चिंतनावर अवलंबून असते. चिंतनाचे महत्त्व किती आहे? तुकाराम महाराज म्हणतात, “काय नोहे केले एका चिंतीता विठ्ठले.” विठ्ठलाचे जर चिंतन केले, तर काय होणार नाही? काहीही होऊ शकते. “योग याग तपे, केली तयाने अमूपे, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा.” देवाचे चिंतन केले पाहिजे. “हित ते करावे देवाचे चिंतन.” चिंतनाला महत्त्वाचे स्थान आहे. परमार्थात चिंतन कशाचे करायचे?

सतत चिंतन देवाचे करायचे, सद्गुरूंचे करायचे, सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचे करायचे, सद्गुरूंनी दिलेल्या विचारांचे करायचे, सद्गुरूंनी दिलेल्या बोधांचे करायचे, सद्गुरूंनी दिलेल्या साधनांचे करायचे या शुभ चिंतनाने तुम्ही पुण्य बाहेर काढता. संचितातून पाप किंवा पुण्य बाहेर येते त्यालाच प्रारब्ध असे म्हणतात. संचितातून जे काढतो ते प्रारब्ध. हे प्रारब्ध दोन प्रकारचे असते. शुभ किंवा अशुभ. अशुभ चिंतनाने अशुभ प्रारब्ध वाट्याला येते, तर शुभ चिंतनाने शुभ प्रारब्ध वाट्याला येते. आज बरेचसे लोक विचार, चिंतन अनिष्ट करतात. अनिष्ट बोलतात, अनिष्ट वागतात. बहुतेक सगळ्या गोष्टी अनिष्ट असतात. सहज जे बोलतो, तेही नकारात्मक बोलतो. आमचे हे जे कार्टे आहे ना ते कमनशिबी आहे, असे सहज बोलतो. अभ्यास करतच नाही, हे सहज बोलतात; पण त्याचे दुष्परिणाम काय होणार, हे त्यांना कळतच नाही.

शंकर म्हणतो, तथास्तु हे त्यांना माहीत नसते. शरीर म्हणजे एक वास्तू आहे. “ईश्वरः सर्वभूतानां ह्रिदयेश्येर्जुन तिष्ठति.” हा ईश्वर शरीरात बसलेला आहे. तो तथास्तु म्हणतच असतो. हे जे कार्टे आहे ना ते कमनशिबी आहे, “तथास्तु.” अभ्यास करतच नाही, “तथास्तु.” तो म्हणतो अभ्यास नाहीच करणार. सगळीकडे जर यांनी हेच सांगितले आहे, तर मी अभ्यास करूच कशाला? असे लोक मी पाहिलेले आहेत. आमच्यादेखत वाईट बोलतात. चांगले बोला, येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगा की, आमचा मुलगा चांगले आहे, मुलगा व्हावा तर असा. तो कसाही असू दे, अभ्यास खूप करतो, शाळेतले मास्तरसुद्धा त्याची खूप वाह वाह करतात. मग त्याला असे वाटते की, आपल्याबद्दल सगळे चांगले बोलत आहेत, तो अभ्यास करायला लागतो. हळूहळू चांगले मार्क्स मिळवू लागतो व सगळे चांगले होते.

जीवनविद्या तत्त्वज्ञानाचा थोडा अभ्यास केला आणि त्याप्रमाणे थोडे आचरण केले की सुखच सुख. जीवनात सुखी होणे सोपे व दु:खी होणे कठीण आहे; पण लोक दु:खी का होतात? सतत अशुभ चिंतन करतात. आरामखुर्चीत बसतो व चिंतनाला सुरुवात होते. त्याने माझा अपमान केला, त्याचा सूड घेतला पाहिजे. हे असे चिंतन चाललेले असते. म्हणून शुभ चिंतन केले पाहिजे, तर तुमच्या जीवनाचे नंदनवन होईल. अशुभ चिंतन केले, तर जीवनाचे वाळवंट होईल. जीवनाचे नंदनवन करायचे की वाळवंट करायचे, हे तू ठरव, देव येऊन सांगणार नाही. त्याने तुला स्वातंत्र्य दिलेले आहे.

करायचे ते शुभ, बोलायचे ते शुभ, विचार करायचे ते शुभ, चिंतन करायचे ते शुभ, इच्छा करायची ती शुभ, मग सगळे शुभच शुभ होईल. कुटुंबात भांडण-तंटे का होतात? अशुभ बोलतात, विचार अशुभ करतात, एकमेकांचा द्वेष करतात, टीव्हीवर तेच दाखवले जाते, जे संसारात घडत असते. सुखी होणे सोपे, दु:खी होणे कठीण असे म्हटले, तरी सुखी होणे वाटते तेवढे सोपे नाही. जीवनविद्या जे सांगते, ते केले तर सुखी होणे सोपे. नुसते जीवनविद्येत येऊन चालणार नाही. अहो आम्ही अनुग्रह घेतला, मात्र आम्हाला काही मिळाले नाही. कसे मिळणार? तू करतोस काय? “केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.” करायचे की नाही, हे आधी तू ठरव. चांगले करायचे की वाईट करायचे, हे तू ठरव; कारण “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.”

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा