Sunday, July 7, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीदिल से दिल मिलने का कोई कारण होगा

दिल से दिल मिलने का कोई कारण होगा

ऋतुराज – ऋतुजा केळकर

“दिल से दिल मिलने का…
कोई कारण होगा…
बिना कारण कोई…
बात नहीं होती…”

जाता जाता सहजच कानावर या ओळी पडल्या आणि लक्षात आलं की, वर्षानुवर्षे नव्हे तर अगदी माझ्या जन्मापासून आज माझ्या लेकीच्या लग्नापर्यंत जवळ जवळ पन्नास वर्षे किंबहुना त्याहीपेक्षा जास्त हे गाणं वेगवेगळ्या पद्धतीने माझ्या कानावर पडत आलंय. कधी-कधी एखाद्या शिक्षकांची मी लाडकी झाले, तर कधी एखादी मैत्रीण मिळाली किंवा दूर गेली. असे आयुष्याच्या या मौतीक माळेत अनेक अनमोल मोती ओवले गेले… कित्येक निखळले… प्रत्येकासाठी काही ना काही तरी कारण हे होतच होतं. प्रथमदर्शनी प्रेमगीत वाटणारं हे गीत वेगवेगळ्या प्रसंगानुरूप वेगवेगळे अर्थ, वेगवेगळे जीवनाचे आयाम माझ्यासमोर उलगडत गेलंय.

खरं पाहायला गेलं, तर हे सारंच चराचर म्हणजे या परमेश्वराची अशी एक रचना आहे की, ज्यात सत्य, शीव आणि सुंदर यांचा उगम आहे आणि अंत ही. ज्याच्या आधारावर आज ही प्रकृती उभी राहिली आहे. त्या या रचनेला ही काही तरी त्रिगुणात्मक स्वरूप कारणमीमांसा तर आहेच.

या मायेची रचना करण्यात त्या परमेश्वराचा काय बरं मानस असेल? हा प्रश्न स्वतःला विचारला आणि प्रश्नांच्या चक्रीवादळात अडकल्यासारखी मी भिरभिरायला लागले. जरा संत साहित्यातील एखादा अभंग अभ्यासायला घेतला तर… संपूर्ण अभंग पुढची गोष्ट आहे; पण त्यातील प्रत्येक शब्दाचे वेगवेगळे अर्थ प्रतीत होतात आणि त्या अर्थांच्या शब्दांच्या बुडबुड्यात आपल्याला अडकून पडायला होतं.

मानवी मन म्हणजे एक असा सागर की, ज्यात मोहमायेच्या खट्याळ लाटांचा आगर. आनंदघन, देदीप्यमान पण भान हरपून टाकणाऱ्या अवस्थेत जन्मोजन्मी जखडून ठेवण्याचे सामर्थ्य म्हणजे मन. संकल्पना, संकल्प आणि सिद्धी यांचा त्रिवेणी संगम म्हणजे मन. प्रकृतीवर विचार आणि विकार यांचा पगडा म्हणजे मन. याच विचार आणि विकारांच्या पगड्यामुळे येणारी बवंडरे जिथे काळ्याशार डोहाप्रमाणे स्थिरावलेली असतात ते आपले आणि आपलच ‘मन’ असतं.

जेव्हा तहान, भुकेने शरीर हंबरडा फोडते… घडणारी कृती किंवा घटना जिच्यावर आपले नियंत्रण नसते त्याला जर वेळीच आपल्या सुयोग्य विचारसरणी आणि जीवनप्रणालीने लगाम घालून आपल्या चित्तास अंतर्बाह्य शुद्धता, पवित्रता आणता येते. तेव्हाच आपल्याला आपल्या जीवनातील आळस, औदास्य, निष्काळजीपणा तसेच अप्रतिष्ठित वागणं हे आपोआपच नाहीसे करता येईल. पण हे सारं जर आपल्याला आपल्या आयुष्यात योग्य त्यावेळी आणि योग्य त्या पद्धतीने घडायला हवं असेल, तर काही तरी ‘कारण’ असणे, घडणे तितकेच गरजेचे असते आणि हे घडावयास कारण की तप, दान तसेच आपले अंगीभूत असलेल्या आपल्या दैवत्वाची ओळख पटली, तरच कुठलीही ठळक गोष्ट घडते की, जी आपल्या जीवनात नवीन दिशा देणारी ठरू शकते.

खूप वेगळंं काही नाही सांगत आहे, मी पण अगदी सहज सोप्या शब्दात सांगायचे झाले, तर काही हात हे देशासाठी लढतात, कारण त्यांच्या पाठीशी किंवा त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या समाजाच्या मनात देशाबद्दल असलेली प्रेमभावना, त्यागाची वृत्ती किंवा अगदी समर्पणाची भावनिक गुंतागुंत ही इतरांपेक्षा काकणभर सरसच असते. म्हणजेच पिढी दर पिढी चालत आलेले संस्कार तसेच प्रकर्षाने आजूबाजूच्या आसमंताचा पगडा त्यावर बऱ्याच अंशी मनाची जडणघडण होते. जगण्याची उमेद प्रेरणा जे जे लागतं ते ते मन आणि शरीर आत्मसात हे करीतच असते. मग त्यात ज्यांना जे मार्ग पटतात, ते त्या मार्गाने पुढे जात असतात.

मग जीवनाच्या या सागरातून मनांच्या छोट्या बेटांमधून वाट काढत, एक बेट म्हणजे मन जिंकत, तो पुढे पुढे जात असतो आणि शेवटास अखेरच्या पडावावर पोहोचतो. मग अंतिम क्षणी त्याला जेव्हा, ‘‘माझ्या आयुष्यात इतकी सुख किंवा इतकी दुःखे का?” असा प्रश्न पडतो, तेव्हा त्रयस्थपणे वळून पाहिले की, लक्षात येते की, लौकिक अर्थाने आपल्या आवाक्यातील गोष्टी करताना आत्मिक संयोगाने, नियोजनाने, प्रेम, सेवा तसेच त्याग यांच्या त्रिसूत्रीने प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने जनमानसांत आपापली ओळख उमटवत असतो म्हणूनच कोणतीही गोष्ट ही विनाकारण घडतच नाही.

एक साधं समीकरण आहे, ऋतूसाजाचे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे ऋतू ऋतूचक्रात एकमेकांतून एकमेकांत उलगडत जातात. तसेच जीवनाचे ही आहे. जितका कडक दुःखांचा उन्हाळा तितकाच सुखद सुखाच्या सरींचा पावसाळा आणि तितकीच प्रेमाची… पाठीराख्यांची उब देणारी आत्म्याला ममतेची शिरशिरी आणणारी हिवाळी थंडीच्या रूपाने आपल्या आयुष्यात असते, त्याकरिता आपलीच कर्म सर्वार्थाने कारणीभूत असतात.

म्हणूनच अगदी माझ्याच साध्या सोप्या शब्दात सांगायचे झाले, तर जीवनाच्या या महायुद्धाची सुरुवात त्या विघ्नहर्त्याच्या पूजेने करताना एकच सूत्र लक्षात ठेवा-

“अध्यात्माची पारी…
नारळाची स्थिरचित्तता…
विधीलिखिताचा गोडवा…
कामक्रोध मदमत्सरी तमोगुण…
अर्पिते तुज गजानना….”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -