
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या स्वागताला हजेरी लावली होती. मरिन ड्राईव्ह येथे टीम इंडियाच्या खेळाडूंची विजयी परेड निघाली होती.
या विजयी परेडनंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी वानखेडे स्टेडियमला हजेरी लावली. येथेही खेळाडूंनी जोरदार डान्स केला. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मासह अनेक खेळाडू यावेळी डान्स करताना दिसले.
दरम्यान, विश्वविजेत्या संघावर चोहोबाजूंनी कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. बीसीसीआयनेही या खेळाडूंचे कौतुक म्हणून भव्य बक्षीस जाहीर केले आहे. बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी तब्बल १२५ कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
बीसीसीआयने वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियाला १२५ कोटींचा चेक दिला. यावेळी संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता. टीम इंडियाने यावेळी चाहत्यांनाही धन्यवाद दिले. टीम इंडियाने वानखेडे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना धन्यवाद देण्यासाठी हातात ट्रॉफी घेत स्टेडियमला फेरी मारली. यावेळी टीम इंडियाचे खेळाडू प्रेक्षकांच्या दिशेने टेनिस बॉल फेकत होते.