Saturday, July 6, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकोकणात पाणबुडीतून पर्यटन...!

कोकणात पाणबुडीतून पर्यटन…!

माझे कोकण: संतोष वायंगणकर

कोकणात पर्यटकांची संख्या प्रतिवर्षी वाढत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागूनच असलेल्या गोवा राज्यामध्ये जरी जगभरातले पर्यटक येत असले तरीही गोव्यात येणारे पर्यटकही कोकणात पर्यटनासाठी येत आहेत. निवास-न्याहरीसारख्या योजनेमुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांना त्यांना निवास-न्याहरी योजनेच्या माध्यमातून त्यांची चांगली सोय होऊ शकली. अनेक पर्यटकांना शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहायचे असते. तशी सुविधा यामुळे निर्माण होऊ शकली. निवास-न्याहरीसारख्या योजनेतून जुन्या असलेल्या घरांमधूनच पर्यटक येऊन राहू लागले. पर्यटकांची सोय झाली आणि स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला.

कोकणात अनेक गावांतून या योजनेचा लाभ झालेला लाभार्थी आहे. ज्यांना हॉटेलमध्ये राहायचं असतं असा पर्यटक हॉटेलमध्ये राहातो; परंतु ज्या पर्यटकांना गावात राहण्याचा आनंद घ्यायचा आहे, असे पर्यटक या निवास-न्याहरीमध्ये राहतात. कोकणातील सर्वच भागांत याप्रमाणे पर्यटक येत आहेत, राहात आहेत. पर्यटकांनाही आज-काल नवनवीन आकर्षण हवी असतात. स्कुबा डायव्हिंगसाठी मुद्दामहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठी आहे. कोकणातील पर्यटन प्रकल्पांच्या बाबतीत आजही अनेक त्रुटी आहेत. यामध्ये आवश्यक असणाऱ्या पर्यटनाला चालना देणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. राज्य सरकारने कोकणातील पर्यटन व्यवसायातून आर्थिक समृद्धी येईल हे समजून घेण्याची आवश्यकता केली. अनेक वर्षे ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना, साखर कारखानदारीला मोठ्या प्रमाणावर अनुदानाचे पॅकेज दिलं जात आहे.

प्रत्येक वेळच्या अर्थसंकल्पात त्याची मोठी तरतूद असते; परंतु कोकणातील पर्यटनावर जर राज्य सरकारने पैसा खर्च केला तर निश्चितपणे सरकारच्या तिजोरीतही कोकणातून मोठी भर पडू शकते; परंतु उर्वरित महाराष्ट्रातील सर्वच राज्यकर्त्यांना नेमकं कशामुळे वावडं आहे हे सांगणं कठीण असलं तरीही राज्य सरकारातील सत्ताधारी कधी कोकणाच्या बाबतीत फार कधी उदारता दाखवत नाहीत. यावेळी कोकणातील पर्यटनाला चालना देणारी एक अतिशय चांगली बाब घडली आहे. गेल्या काही वर्षे चर्चेत असणारा पाणबुडी प्रकल्प मार्गी लागणार हे निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे या वर्षीच्या अर्थसंकल्पात तशी भरीव आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. यामुळे पाणबुडी प्रकल्प वेंगुर्लेमध्ये होत आहे. कोकणातील किनारपट्टीला समृद्धीचे दिवस येत आहेत. पन्नास वर्षांपूर्वी कोकणात बोट वाहतूक होती. कोकणातील मुंबईकर चाकरमानी मोठ्या प्रमाणावर बोटीतून प्रवास करायचे. सर्वसामान्यांना बोटीचा हा प्रवास परवडणारा होता.

कोकणातील किनारपट्टीला असणाऱ्या ग्रामस्थांना तर बोटीचा हा प्रवास अधिक सोईचा होता. कालानुरूप कोकणातील बोट वाहतूक बंद झाली. माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांनी पाहिलेले सागरी महामार्गाचे स्वप्न आजही रस्त्यावरच आहे. बोट बंद झाली खरी, परंतु कोकणातील किनारपट्टीवरील बाजारपेठांवर, गावांवर अवकळा पसरली. मासेमारीवर थोडाफार आधार राहिला. ज्या बाजारपेठा पूर्वी गजबजलेल्या असायच्या त्या बाजारपेठेतील व्यावसायिक ग्राहकांची वाट पाहत आहेत. हे चित्र कोकणातील किनारपट्टीवरील गावातून दिसू लागले; परंतु कोकणातील पर्यटन व्यवसायाने याच उपेक्षित, दुर्लक्षित होऊ पाहणाऱ्या किनारपट्टीच्या तालुक्यातूनही आज चांगली आर्थिक उलाढाल होताना दिसत आहे. कोकणातील समुद्रकिनाऱ्यावरच्या तालुक्यातून पर्यटक येतात, राहतात आणि पर्यटनाचाही आनंद घेतात. साहजिकच आर्थिक उलाढालही चांगली होत आहे. कोकणातील पर्यटनाचे स्वरूपही बदलत चाललंय. कोकणात आता पर्यटन हा व्यवसाय झाला आहे. या व्यवसायातून आर्थिक समृद्धी येऊ शकेल. जर प्रयत्न करत राहिलो तर कोकणात पर्यटन आणखी वाढू शकेल.

गोवा राज्यात येणारा पर्यटक आणि खास कोकणात येणारा पर्यटक या दोघांमध्ये फार फरक आहे. कोकणात पर्यटन आणखी अधिक प्रमाणात वाढले पाहिजेत. या वाढत जाणाऱ्या पर्यटनातून कोकणाची पर्यायाने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल, बळकट होईल. वेंगुर्लेच्या पाणबुडी प्रकल्पावरून मध्यंतरी फार राजकीय चर्चा चालू होत्या. या सगळ्यांमध्ये राज्य सरकारने पाणबुडी प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद करून कोकणाकडेही लक्ष आहे, हे देखील यानिमित्ताने दाखवून दिले आहे. स्कुबाडायव्हिंग प्रकल्प वेंगुर्ले-मालवण समुद्रात साकारला जाणार आहे. कोकणातील पर्यटन प्रकल्पांवर नुसती चर्चा होत न राहाता नव्याने काही उभं राहिलं पाहिजे. वेंगुर्लेतील या पाणबुडी प्रकल्पाने केवळ पर्यटनदृष्ट्या वेंगुर्लेच विकसित होणार आहे असे नव्हे तर त्याचा चांगला परिणाम निश्चितपणे कोकणातील पर्यटनावरही होणार आहे. तसेच कोकणातील रेवस ते रेडी या किनाऱ्यावरील गाव अधिक आर्थिक सक्षम होण्यासाठीचा प्रयत्न होत आहे.

माजी केंद्रीयमंत्री खा. नारायण राणे यांनी कणकवली, विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी असा टॉयट्रेन प्रकल्प व्हावा हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला आहे. सिंधुदुर्गातील किनारपट्टी या टॉयट्रेनने जोडली जाऊ शकते. कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना निश्चितपणे ‘टॉयट्रेन’चं खास आकर्षण होऊ शकेल. राजकारणापलीकडे जाऊन विकासाची दूरदृष्टी कशी असायला हवी त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आज टॉयट्रेन प्रकल्पाचे सूतोवाच खा. नारायण राणे यांनी केले आहे. या अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांनी सारं काही बदलून जातं. टॉयट्रेनचा प्रकल्प आज जरी कागदावर असला तरीही हाच आजचा कागदावरचा प्रकल्प उद्या कधी जेव्हा प्रत्यक्षात साकारला जाईल तेव्हा कोणते आणि कसे बदल घडतील याचं वास्तववादी चित्र मनपटलावर जरी आणलं तरीही त्यातून खूप काही समजण्यासारखे आहे.

वेंगुर्लेतील पाणबुडी प्रकल्प व्हावा यासाठी निश्चितपणे शिक्षणमंत्री आणि सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्गाचे आमदार दीपक केसरकर हे पाठपुरावा करत राहिले. जेव्हा पाणबुडी प्रकल्प रद्द झाला म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आ. आदित्य ठाकरे यांनी सांगून टाकलेले, तेव्हाच खा.नारायण राणे, दीपक केसरकर, आ. नितेश राणे यांनी कोणताही प्रकल्प रद्द झालेला नाही. प्रकल्प होणार म्हणून माध्यमांना सांगितलेले. पाणबुडी प्रकल्पासाठी ६६ कोटींची आर्थिक तरतूद करून या पाणबुडी प्रकल्प होणार यावर शिक्कामोर्तब केले आहे. राजकारण ज्यांच्या-त्यांच्या पद्धतीने होत राहील; परंतु कोकणातील विकास प्रक्रिया गतिमान होतेय, ही आनंदाची बाब आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -