
वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : वयाच्या १० व्या वर्षी बालकलाकार म्हणून सुरुवात करत राज कपूर (Raj Kapoor) आणि देवानंद (Dev Anand) यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत पडदा गाजवलेल्या अभिनेत्री स्मृती बिस्वास नारंग (Smriti Biswas Narang) यांचे निधन झाले आहे. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी नाशिक (Nashik) येथे आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. काल रात्री वृद्धापकाळामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने सोशल मीडियावर त्यांचा फोटो पोस्ट करून त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांनी हिंदी, मराठी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं. स्मृती बिस्वास यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये १०० वा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर वृद्धापकाळाने त्यांचं ३ जुलै रोजी निधन झालं. आज ख्रिश्चन पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात राजीव आणि सत्यजीत ही दोन मुले आहेत.
कोण होत्या स्मृती बिस्वास?
अभिनेत्री स्मृती बिस्वास यांनी १९३० च्या दशकात फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. वयाच्या १० व्या वर्षी बालकलाकार म्हणून त्यांनी सुरुवात केली. 'संध्या' या बंगाली चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक दिग्गज चित्रपट निर्मात्यांसोबत काम केलं, ज्यामध्ये गुरु दत्त, व्ही शांताराम, मृणाल सेन, बिमल रॉय, बीआर चोप्रा आणि राज कपूर यांचा समावेश आहे.
त्यांनी 'नेक दिल', 'अपराजिता' आणि 'मॉडर्न गर्ल' या हिट चित्रपटामध्येही काम केलं. १९३० ते १९६० पर्यंतच्या तीन दशकांमध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आणि महत्त्वपूर्ण योगदान दिलं. बाप रे बाप, 'भागम भाग', 'द्वांड' 'नील आकाशेर नीचे' यांसारख्या चित्रपटांसाठी त्या ओळखल्या जातात.
चित्रपट निर्माते एसडी नारंग यांच्याशी लग्न केल्यानंतर स्मृती बिस्वास यांनी अभिनय सोडला होता. पतीच्या निधनानंतर त्या नाशिकला स्थलांतरित झाल्या. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी बिस्वास यांनी त्यांचा १०० वा वाढदिवस साजरा केला.
हंसल मेहता यांनी वाहिली श्रद्धांजली
चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून स्मृती बिस्वास यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी स्मृती यांचे शेवटच्या दिवसांतील काही फोटोज शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, "प्रिय स्मृतीजी शांततेत आणि आनंदाच्या ठिकाणी जा. आमच्या जीवनाला आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद". स्मृती बिस्वास यांच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.