
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (SRA scheme) घरांच्या विक्रीसाठीचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आता ऑनलाइन देण्यात येणार असून अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांत प्रमाणपत्र मिळेल, अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषदेत दिली.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत घरे विकण्यासाठी आवश्यक असलेल्या ना-हरकत प्रमाणपत्राबाबत सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत घरे विकण्याच्या अनेक अटी शिथिल करण्यात आल्याचे मंत्री म्हणाले, तसेच ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) ऑनलाइन वितरीत करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
झोपडपट्टीचा मालक मयत असल्यास त्याच्या वारसांना वारस प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांना एनओसी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.