विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश
मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई येथे २०१२ साली मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अखेर १२ वर्षानंतर म्हणजे एक तपाच्या प्रतीक्षेनंतर कार्यान्वीत होत आहे. विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा मतदार संघाचे आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांनी सातत्याने पाठपुरावा करुन, आपल्या दालनात सर्व संबंधित अधिकारी यांचे समवेत वारंवार बैठका निमंत्रित करुन, बहुप्रतिक्षेत असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तातडीने कार्यान्वीत करण्याचा मार्ग प्रशस्त केल्याने प्रामुख्याने दक्षिण मुंबईतील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
नव्याने सुरु होत असलेले नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सध्या जी.टी.रुग्णालय व कामा रुग्णालय, मुंबई या वास्तूमध्ये ५० विद्यार्थी प्रवेश संख्येने शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ पासून कार्यान्वीत होणार आहे. नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे जी.टी. रुग्णालय व कामा रुग्णालयांशी संलग्न असेल. पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ पासून ५० विद्यार्थी प्रवेश संख्या ही दुप्पट म्हणजेच १०० इतकी करण्यात येणार आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने नुकतीच याबाबतची परवानगी दिलेली आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने निर्गमित केलेल्या ३१-१-२०१२ रोजीच्या शासननिर्णयान्वये या नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मंजूरी देण्यात आली होती. महाराष्ट्र विधानसभा ॲङ राहुल नार्वेकर यांनी सदर कागदावरच राहिलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रत्यक्षात कार्यान्वीत होण्याच्यादृष्टीने २०-११-२०२३ रोजी त्यांचे दालनात संबंधित विभागाचे अधिकारी यांचे समवेत बैठक आयोजित केली.
तसेच वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागांशी सातत्याने संपर्क व पाठपुरावा केला. त्यामुळे सुमारे १२ वर्षापूर्वी मंजूर नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला. आता हे नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत होत असल्याने एमबीबीएस डॉक्टरांची संख्या वाढणार आहे.
त्याचबरोबर दक्षिण मुंबईतील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत जलद वैद्यकीय सेवा प्राप्त होणार आहे. दक्षिण मुंबईमध्ये प्रलंबित असलेले नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर कार्यान्वीत झाल्याबद्दल कुलाबा विधानसभा क्षेत्रातील आणि दक्षिण मुंबईतील विविध सामाजिक संस्था आणि त्याचप्रमाणे रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या विविध स्वयंसेवी संस्था यांनी मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा व कुलाबा विधानसभेचे आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांचे आणि हा निर्णय तातडीने घोषित करणारे वैद्यकीय शिक्षणमंत्री मा.श्री.हसन मुश्रीफ यांचे प्रत्यक्ष भेटून आणि त्याचप्रमाणे पत्राद्वारे अभिनंदन केले आहे.