
नेमकं काय घडलं होतं तेव्हा?
पुणे : पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून (Sassoon Hospital) ड्रग्जमाफिया ललित पाटील (Lalit Patil) फरार झाल्याची बातमी चांगलीच गाजली होती. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. ललित पाटील पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षास तीन तास उशिरा देण्यात आली होती, असं तपासातून समोर आलं. या प्रकरणी दोन पुणे पोलिसांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे दोघे ललित सोबत एक्सरेसाठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयात आजारपणाचं कारण देत ड्रग्स रॅकेट चालवत होता. त्यावेळी ससून रुग्णालयातील गेटवर २ कोटी १४ लाखांचं ड्रग्स सापडलं होतं. त्यामुळे हे सगळं मोठं ड्रग्स रॅकेट तर पुढे आलंच पण त्यात अनेक बड्या लोकांचा हात असल्याचंही तपासादरम्यान समोर आलं. त्यानंतर सगळ्यांची कसून चौकशी सुरु झाली.
ससून रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, कारागृह पोलीस, कारागृहातील डॉक्टरांसह ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा संबंध असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं आणि सहा जणांना निलंबित करण्यात आलं होतं. ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयात एक्स रे साठी दोन कर्मचारी घेऊन जाणार होते. मात्र हे दोघे ललित पाटील सोबत एक्सरेसाठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे.
एवढंच नाही तर त्यांनी नियंत्रण कक्षास ही माहिती तब्बल तीन तास उशिरा दिली. नियंत्रण कक्षास माहिती दिली असती तर पळून गेलेल्या ललीत पाटीलला पकडता आले असते. परंतु या दोघांनी वरिष्ठ अधिकारी तसेच नियंत्रण कक्षाला कळवले नाही, असं चौकशीमध्ये निष्पन्न झालं आहे.
ललित पाटील प्रकरणी तब्बल ३१५० पानांचे चार्जशीट
ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणात अनेक खुलासे (Lalit Patil Drugs Case) समोर येत आहेत. ललित पाटीलसह १५ जणांवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल ३१५० पानांचे चार्जशीट दाखल केलं आहे. ड्रग्स रॅकेट प्रकरणी ललित पाटील त्याचा भाऊ भूषण पाटील आणि इतर साथीदारांच्या विरोधात हे चार्जशीट पुणे पोलिसांनी कोर्टात सादर केलं.