
मनसे नेते प्रकाश महाजन यांची मागणी
मुंबई : राज्य सरकारने (State Government) 'माझी लाडकी बहीण' (Mazi Ladki Bahin) या योजनेची घोषणा केली आहे. यामध्ये महिलांसाठी अन्नपूर्ण, पिंक रिक्षा, दरमहा १५०० रुपये मिळणार अशा योजनांचा समावेश आहे. लाडकी बहीण योजना लागू होताच फॉर्म भरण्यासाठी अनेक महिलांची एकच झुंबड उडाली आहे. अशातच मनसेचे (MNS) नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी योजनेबाबत मुस्लीम समाजातील ज्या महिलांना दोन पेक्षा अधिक मुले आहेत त्यांना या योजनेचा लाभ देऊ नये, अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने नुसार राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ मुस्लीम समाजातील ज्या महिलांना दोन पेक्षा अधिक मुले आहेत. तसेच ज्या मुस्लीम पुरुषाला एकापेक्षा अधिक पत्नी आहेत, त्यांना या योजनेचा लाभ देऊ नये, असे स्पष्ट मत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले आहे.
सरकार इतरांच्या बायका सांभाळण्यासाठी नाही
‘सरकार इतरांच्या बायका सांभाळण्यासाठी नाही तर ज्यांना गरज आहे त्या महिलांचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण व्हावे, यासाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली. मात्र सरकारच्या योजनेचा कोणीही चुकीचा फायदा घेतला नाही पाहिजे. विवाहित महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना किती अपत्य आहेत, हे पाहून त्या महिलांना या योजनेचा लाभ द्यावा', असे प्रकाश महाजन यांनी म्हटले. त्यासोबत कोणावर अन्याय करा असे त्यांचे म्हणणे नसून एखाद्या पुरूषाला तीन बायका असतील तर त्या तिघींना सरकार या योजनेचा लाभ देणार का? असा सवालही प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला आहे.