
शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी वर्तविले भाकीत
मुंबई : ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी आल्याने चुरस वाढली आहे. यामुळे ११ जागा असल्या तरी १२ उमेदवार झाले आहेत. यामुळे मतांचे गणित कोण कसे जुळवणार, असा प्रश्न पडला आहे. नार्वेकरांमुळे काँग्रेसच्या किंवा शेकापच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो, असे सुतोवाच शिंदे गटाने केले आहे. यामुळे ही निवडणूक पुन्हा एकदा रंगतदार होणार आहे.
मिलिंद नार्वेकरांच्या नावाची घोषणा करून ठाकरे गटाने चुरस आणली असली तरी याला काहीतरी घडामोडी कारणीभूत असण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत. शिंदे गटातही नाराजी आहे. तसेच नार्वेकरांचेही सर्वच पक्षात मित्र आहेत. यामुळे याचा मविआ फायदा उचलण्याची शक्यता आहे.
सध्याच्या संख्याबळानुसार महायुती त्यांचे ८ उमेदवार निवडून आणू शकते. तर दोन मविआ निवडून आणू शकते. तिसऱ्या उमेदवारासाठी मविआला मते जुळवावी लागणार आहेत. ही मते जुळली तरी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नार्वेकरांमुळे प्रज्ञा सातव यांचा पराभव होऊ शकतो अशी शक्यता वर्तविली आहे. शिंदेंनी बंड करण्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. तशीच परिस्थिती नार्वेकरांच्या उमेदवारीमुळे उद्भवणार असल्याचे भाकीत सरनाईक यांनी केले आहे.