Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Manoj Jarange Patil : मराठा बांधव पुन्हा आक्रमक; छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरु केले 'रास्ता रोको' आंदोलन!

Manoj Jarange Patil : मराठा बांधव पुन्हा आक्रमक; छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरु केले 'रास्ता रोको' आंदोलन!

परिसरात मोठी वाहतूक कोंडी


छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) राहत असलेल्या अंतरवाली सराटीच्या सरपंचाच्या घरावर दोन दिवसांपूर्वी ड्रोनद्वारे (Drone) टेहाळणी केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर नजर ठेवली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत होता. या प्रकारामुळे मनोज जरांगे यांच्यावर धोक्याचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा (Z Plus Security) द्यावी अशी मागणी सहकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र सतत मागणी करुनही प्रशासन कोणतीही हालचाल करत नसल्यामुळे मराठा बांधवांनी (Maratha Protesters) आक्रमक भूमिका धारण केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील राहत असलेल्या अंतरवाली सराटीच्या सरपंचांच्या घरावर ड्रोनद्वारे टेहाळणी केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी करत छत्रपती संभाजीनगरमधील मराठा बांधव आक्रमक झाला आहे. आज छत्रपती संभाजीनगरमधील केंब्रिज चौकात सकल मराठा समाजातर्फे रास्ता रोको करण्यात आला आहे. मात्र या आंदोलनामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.


दरम्यान, अंतरवालीच्या सरपंचांच्या घरावर ड्रोनने घिरट्या घातल्याबाबत सरपंच पांडुरंग तारख यांनी माहिती देत जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली होती. तसे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते. काल पांडुरंग तारख यांनी मागणीसाठी जालन्यातील जिल्हाधिकाऱ्यांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे आता सरकार मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देणार का, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Comments
Add Comment