Thursday, July 4, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखशर्मा, कोहली, जडेजाची पोकळी कोण भरणार?

शर्मा, कोहली, जडेजाची पोकळी कोण भरणार?

टी-२० क्रिकेट खेळातील विश्वचषक भारतीय संघाने जिंकत तब्बल एक तपाचा विजेतेपदाचा दुष्काळ संपविला. टी-२० प्रकारात आपण पुन्हा एकदा जगज्जेते झालो. शेवटच्या षटकांपर्यंत श्वास रोखून धरणारा अटीतटीच्या सामन्याने क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. अर्थांत खेळामध्ये हार-जीत हा प्रकार चालतोच. अंतिम सामन्यात कोणीतरी एकच विजयी होणार असल्याने कोणाला तरी पराभवाला सामोरे जात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागणार, हे स्पष्ट होते. पण क्रिकेटवेड्या आपल्या भारत देशातील अनेकांना क्रिकेट या खेळाचे व्यसनच जडले आहे, असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. टी-२०चा विश्वचषक जिंकताच कोट्यवधी भारतीयांच्या व्हॉट्सअॅपवरील स्टेट्स बदली झाले. अवघ्या काही सेंकदांत तिथे भारतीय संघातील खेळाडूंच्या फोटोने व व्हीडिओने जागा घेतली. फटाक्यांचा धुराळा आणि आवाजाचा गगनभेदी जल्लोषाचा उत्साह देशाच्या कानाकोपऱ्यांत पाहावयास मिळाला, अनुभवयास मिळाला. विश्वचषक जिंकल्याचा आनंद भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सदस्यांना, भारतीय क्रिकेट संघातील सदस्यांना व त्यांच्या परिवाराला झाला नसेल, त्याहून कैकपटीने आनंद भारतीयांना झाला आहे.

 जिंकण्यासाठी ज्या स्टाईलमध्ये रोहित शर्मा गेला, त्या स्टाईलची चर्चा जगभरात झाली. सोशल मीडियावर त्याचीच गेले दोन-तीन दिवस चर्चा सुरू आहे. यूट्यूब, व्हॉट्सअॅप, ट्विटरवरही तेच व्हीडिओ जोरदार व्हायरल होत आहेत. विश्वचषक जिंकल्याचा आनंद कोट्यवधी भारतीय साजरा करत असताना कर्णधार रोहित शर्मा व भारताचा हरफन मौला अंदाज असणारा विराट कोहली या दोन खेळाडूंनी टी-२० क्रिकेट प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. या धक्क्यातून भारतीय क्रिकेटप्रेमी सावरत नाही तोच क्रिकेटप्रेमी ज्या खेळाडूचा प्रेमाने व आदराने ‘सर’ असा गेल्या काही वर्षांपासून उल्लेख करत आहेत, त्या ‘सर’ रवींद्र जडेजा यांनीही टी-२०च्या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. प्रत्येक गतीला कोठे ना कोठे हा विराम असतोच. कुठे थांबावे, हे ज्याला समजते, त्याचाच मानसन्मान हा अखेरपर्यंत क्रीडा रसिकांच्या मनामध्ये कायम राहतो. कसोटी क्रिकेटमधील लीटल मास्टर म्हणून ओळखले जाणारे व कसोटी क्रिकेटमध्ये ज्यांनी सर्वप्रथम दहा हजार धावा बनविल्या, त्या सुनील गावस्करांनी देखील क्रिकेटमधील सर्वोच्च शिखरावर असताना व सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये असताना निवृत्ती जाहीर केली.

सुनील गावस्करांचा खेळ पाहता व त्यांची धावांची रनमशीन कार्यरत असताना त्यांनी किमान पाच ते सहा वर्षे खेळण्यापासून कोणीही रोखू शकले नसते; परंतु अन्य खेळाडूंनाही संधी मिळावी या विचाराने आपण निवृत्त होत असल्याचे गावस्करांनी सांगितले. त्याच काळातील कपिल देव निखंज या अष्टपैलू खेळाडूची निवृत्ती वादग्रस्त ठरली. १९८३ सालचा विश्वचषक भारतीय संघाने कपिल देवच्याच नेतृत्वाखाली जिंकल्याचा बहुमान मिळाला होता. त्याच विश्वचषक स्पर्धेत दुबळ्या झिम्बॉम्बे संघाने आपली वाताहत केली असताना १७५ धावांची खेळी करत कपिल देवने भारताच्या विजयात अष्टपैलूची भूमिका निभावली होती. पण केवळ न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडली या वेगवान गोलंदाजाचा कसोटी क्रिकेटमधील ४३१ बळींचा विक्रम मोडण्यासाठी कपिल देव खेळत राहिला. अखेरच्या काही सामन्यांमध्ये तर कपिल देवचा एक टप्पा चेंडूही समोरच्या फलंदाजापर्यंत पोहोचतही नसायचा. कपिल आता तरी थांब असे म्हणण्याची वेळ क्रिकेट प्रेक्षकांवर आली होती. अखेरीला रिचर्ड हॅडली यांचा ४३१ बळींचा विक्रम मोडताच कपिल देव यांनी निवृत्ती जाहीर केली.

कर्णधार रोहित शर्मा यांचे ३७ वर्षे वय झाले असल्याने तो पुढचा टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळणे शक्य नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे स्वत:च्या नेतृत्वाखाली देशाला टी-२० विश्वचषक मिळवून दिल्याने मान-सन्मानाने निवृत्ती जाहीर करणे अपेक्षित होते; परंतु भारतीय संघाची तुफानी एक्स्प्रेस समजली जाणारी रनमशीन असणाऱ्या विराट कोहली आणि फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रकारामध्ये ‘सर’ असणाऱ्या रवींद्र जडेजा यांनी वयाच्या ३५व्या वर्षी टी-२० क्रिकेट प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. कोहली व जडेजा यांचा सध्याचा खेळ पाहता त्यांना अजून किमान तीन वर्षे तरी खेळण्यापासून कोणीही रोखू शकले नसते; परंतु आगामी टी-२० विश्वचषकाच्या पूर्वतयारीचा एक भाग तसेच टी-२० संघ बांधणीस वेळ मिळावा या हेतूने कोहली व जडेजा यांनी घेतलेला निवृत्तीचा निर्णय निश्चितच स्तुत्य आहे. क्रिकेटच्या टी-२० प्रकारामध्ये गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचा दबदबा कायम राहिलेला आहे. एक प्रबळ संघ अशी भारतीय संघाची ओळख होती. सध्याच्या भारतीय क्रिकेट संघामध्ये अनेक रथी-महारथी खेळाडूंचा समावेश आहे.

एकाला दोन-तीन पर्याय म्हणून नावे समोर येतात. भारतीय क्रिकेटसाठी हा खऱ्या अर्थांने सुवर्णकाळ मानावयास हरकत नाही; परंतु कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व सर रवींद्र जडेजा यांची निवृत्ती काही प्रमाणात चटका लावणारी आहे. अर्थांत यापूर्वीही भारतीय संघातून टप्प्याटप्प्याने अनेक रथी-महारथी खेळाडू निवृत्त होत गेले. परंतु एकसाथ तीन खेळाडूंची टी-२० प्रकारातील निवृत्ती पाहता ही निर्माण होणारी पोकळी भरून काढण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला प्रयत्न हे करावेच लागणार आहेत. अर्थांत भारतीय क्रिकेट संघामध्ये गुणवान भारती खेळाडूंची सुबत्ता आहे. त्यामुळे ही पोकळी भरून काढण्यास फारसा वेळ लागणार नाही. पण निवृत्त होणाऱ्या खेळाडूंच्या तोलामोलाचे खेळाडू सापडणे सध्या तरी अवघडच नाही तर अशक्य आहे. तीनही खेळाडूंची स्वत:च्या खेळाची एक वेगळी जागा आहे, पर्याय नक्कीच मिळतील. पण त्यासाठी आतापासूनच तयारी होणे आवश्यक आहे.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा हे काही तासांनंतर निवृत्ती जाहीर करणार आहेत, असे कोणी सांगितले असते, तर त्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. भारतीय क्रिकेटमध्ये शर्मा, कोहली, जडेजा यांचे योगदान नक्कीच प्रशंसनीय आहे. फलंदाजीच्या प्रकारात रोहित शर्मा व विराट कोहली हे ‘बाप’ माणूस होते, तर रवींद्र जडेजा फलंदाजीसोबत गोलंदाजीतही चमक दाखवित होते. विराट कोहली हा मैदानावरील उत्साहमूर्ती होता. तिघांच्या निवृत्तीने एक पोकळी निर्माण झाली आहे. रोहित, विराट व जडेजाशिवाय संघ ही कल्पना सध्या पचनी पडणार नाही. काही महिन्यांतच खेळाडूंची निवड होईल. नव्याने जोश निर्माण होईल. सध्या निर्माण झालेली पोकळी नक्कीच भरून निघेल. थोडा वेळ जाईल, पण भारतीय संघ रोहित, कोहली, रवींद्र यांच्याशिवाय भरारी घेताना दिसून येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -