
वडील वाहून जातानाचा 'तो' दुर्दैवी क्षण मुलीनेच केला रेकॉर्ड
पुणे : पावसाळी पर्यटनाचा (Monsoon trip) आनंद घेता घेता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या पर्यटकांच्या वाढत्या घटनांमुळे राज्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. लोणावळ्याच्या भुशी डॅममध्ये (Lonavla Bhushi Dam) वाहून गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांमुळे तर मन सुन्न झालं. यानंतर आणखी एक घटना पुण्याच्या ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) घडली. या ठिकाणी एका तरुणाने पाण्यात स्टंटबाजी करत उडी मारली आणि पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल (Social media viral) झाला. आता हा व्हिडीओ वाहून जाणाऱ्या तरुणाच्या लेकीनेच काढला असल्याची माहिती समोर आली आहे.
मृत तरुणाचं नाव स्वप्नील धावडे (Swapnil Dhavde) असं असून आपल्या ३२ जणांच्या जिमच्या ग्रुपसमवेत तो पर्यटनासाठी ताम्हिणी घाटात आला होता. यावेळेस निघता निघता त्याने आपल्या मुलीला कॅमेऱ्यात पाण्यात उडी मारतानाचा व्हिडीओ काढायला सांगितले होते. त्याप्रमाणे मुलगी व्हिडीओ काढत होती. तरणाने पाण्यात उडी मारली खरी पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्याला वर येणं कठीण झालं. आजूबाजूच्या खडकाच्या आधारे तो वर येण्याचा प्रयत्न करत होता मात्र, जोरदार पाण्याने त्याला वाहून नेले. दुर्दैवाने हा क्षण त्याच्या मुलीकडूनच कॅमेऱ्यात कैद झाला. डोळ्यादेखत आपले वडील वाहून गेल्याने मुलीला मोठा धक्का बसला आहे.
स्वप्नील धावडे हा बॉक्सिंगचा राष्ट्रीय खेळाडू असून त्याने भारतीय सैन्य दलातही सेवा दिली. तो एक वर्षापूर्वीच आर्मीमधून सेवानिवृत्त झाला होता. त्यानंतर तो भोसरी परिसरामध्ये स्विमिंग आणि व्यायामाचे ट्रेनिंग देण्याचं काम करत होता. शनिवारच्या सुमारास ताम्हिणी घाटामध्ये असणाऱ्या प्लस व्हॅली परिसरामध्ये तो ३२ जणांचा ग्रुप घेऊन ट्रेकिंगसाठी गेला होता. दिवसभर ट्रेकिंग केल्यानंतर निघण्याच्या वेळी त्यांनी आपल्या मुलीला माझा पाण्यात उडी मारतानाचा व्हिडिओ काढ, असे सांगितले. या व्हिडिओमध्येच स्वप्नील धावडे हे वाहून जातानाचा क्षण कैद झाला.
काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार
सोमवारी त्यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. धावडे यांच्या कुटुंबामध्ये आता कोणीही पुरुष व्यक्ती नाही. स्वप्नील धावडे यांच्या पश्चात कुटुंबात आई, पत्नी आणि मुलगी या तिघीच राहिल्या आहेत. स्वप्नील धावडे यांच्या जाण्याने धावडे कुटुंब पूर्णतः कोलमडले आहे.