Thursday, July 4, 2024
Homeदेशहिंदूंचा अपमान हा विरोधकांचा अजेंडा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

हिंदूंचा अपमान हा विरोधकांचा अजेंडा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल जे काही घडले, त्याला देशातील कोट्यवधी जनता शतकानुशतके माफ करणार नाही. १३१ वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदजींनी शिकागो येथे म्हटले होते की, मला अभिमान आहे की, मी अशा धर्मातून आलो आहे, ज्याने संपूर्ण जगाला सहिष्णुता आणि जागतिक स्वीकाराची शिकवण दिली आहे. विवेकानंद यांनी शिकागो येथे जगातील दिग्गजांसमोर हिंदू धर्माची बाजू मांडली होती. हिंदूंमुळेच भारताची विविधता वाढली आहे आणि बहरत आहे. आज हिंदूंवर खोटे आरोप करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, ही गंभीर बाब आहे. हिंदू हिंसक आहेत, असे म्हटले जात आहे. ही तुमची मूल्ये, तुमचे चारित्र्य, तुमची विचारसरणी, तुमचा द्वेष आहे. हिंदूंचा अपमान हा विरोधकांचा अजेंडाच बनला असल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनात पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

देशातील हिंदूंच्या विरोधात या कारवाया, हा देश शतकानुशतके विसरणार नाही. हेच लोक आहेत, ज्यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला होता. त्यांच्या मित्रांनी हिंदू धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियासारख्या शब्दांशी केली होतो. सुनियोजित कटाचा एक भाग म्हणून, त्यांच्या संपूर्ण परिसंस्थेने हिंदू परंपरेचा अपमान आणि खिल्ली उडवण्याची फॅशन बनवली आहे. सभागृहातील कालचे दृश्य पाहिल्यानंतर हा अपमान हा योगायोग आहे की, मोठ्या प्रयोगाची तयारी आहे, याचा विचार आता हिंदू समाजाला करावा लागेल, असेही मोदी यावेळी म्हणाले.

बाबासाहेबांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी नेहरुजींनी आपली सर्व शक्ती वापरली. पहिल्याच निवडणुकीत षड्यंत्र रचून त्यांचा पराभव झाला. इतकंच नाही तर हा पराभव साजरा करत आनंद व्यक्त केला. हा आनंद एका पत्रात लिहिला आहे. बाबासाहेबांप्रमाणेच दलित नेते बाबू जगजीवन राम यांनाही त्यांचा हक्क मिळाला नाही. आणीबाणीनंतर जगजीवन राम पंतप्रधान होण्याची शक्यता होती. इंदिरा गांधींनी जगजीवन राम कोणत्याही किंमतीत पंतप्रधान होऊ नयेत याची काळजी घेतली. काँग्रेसने चौधरी चरणसिंग यांनाही तशीच वागणूक दिली. काँग्रेस हा आरक्षणाचा कट्टर विरोधक आहे. नेहरूजींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आरक्षणाला स्पष्ट विरोध केला होता. इंदिरा गांधींनी मंडल आयोगाचा अहवाल वर्षानुवर्षे राखून ठेवला होता. राजीव गांधी विरोधी पक्षात असताना त्यांचे सर्वात मोठे भाषण आरक्षणाच्या विरोधात होते, जे आजही संसदेच्या रेकॉर्डमध्ये उपलब्ध आहे.

२०१४ पूर्वी देशात घोटाळ्यांची स्पर्धांच लागली होती

२०१४ पूर्वीचे दिवस आठवले तर देशातील जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला होता. देश पार निराशेच्या गर्तेत बुडाला होता. देशाचे काहीही होऊ शकत नाही, हेच शब्द २०१४ पूर्वी कानावर पडायचे. दररोज वृत्तपत्रांमध्ये फक्त घोटाळ्यांच्या बातम्या यायच्या. घोटाळ्यांची जणून स्पर्धाच सुरू होती, अशी घणाघाती टीका पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

संसदेच्या विशेष अधिवेशनात पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

या देशाने दीर्घकाळ तुष्टीकरणाचे राजकारण पाहिले आणि प्रशासनाचे तुष्टीकरण मॉडेलही पाहिले आहे. जनतेने आमच्या १० वर्षांच्या सरकारचा ट्रॅक रेकॉर्डही पाहिला आहे. लोकसेवा हीच ईश्वर सेवा, हा मंत्र बनवून आम्ही काम केले. देशातील जनता भ्रष्टाचाराने त्रस्त होती. आम्ही भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स धोरण राबवले आहेत. आज जगात भारताचा गौरव होत आहे. जगात देशाची विश्वासार्हता वाढली आहे. भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. गेल्या १० वर्षात आमचे सरकार सबका साथ, सबका विकास या मंत्राचे पालन करून सर्वांचे कल्याण करण्याचा प्रयत्न करत आहे. नेशन फर्स्ट, हे आमचे ध्येय आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

भारत आपल्या सुरक्षेसाठी काहीही करू शकतो

मोदी पुढे म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाला माहित आहे की, भारत आता आपल्या सुरक्षेसाठी काहीही करू शकतो. कलम ३७० चा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, इथे संविधान डोक्यावर घेऊन नाचणारे लोक जम्मू-काश्मीरमध्ये ते लागू करण्याचे धाडस दाखवू शकत नाहीत. आज तिथे ३७० ची भिंत पडली अन् दगडफेक थांबली. तेथील लोक भारतीय राज्यघटनेवर पूर्ण विश्वास ठेवून पुढे येत आहेत. २०१४ पूर्वी देशात वारंवार दहशतवादी हल्ले होत असायचे. देशाच्या कानाकोपऱ्याला दहशतवादाने पोखरले होते. पूर्वी कुठेही दहशतवादी हल्ले व्हायचे. आज भारत त्यांच्या घरात घुसून मारतो. देश आपल्या सुरक्षेसाठी काहीही करू शकतो हे आज देशातील प्रत्येक नागरिकाला माहीत असल्याचे मोदी म्हणाले.

आमच्या प्रामाणिकपणावर जनतेचा विश्वास वाढला

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, देशातील जनतेने आमची धोरणे पाहिली, आमचा हेतू पाहिला. त्यामुळेच आमच्या प्रामाणिकपणावर जनतेचा विश्वास वाढला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विकसित भारताचा संकल्प घेऊन आम्ही गेले होतो. हाच संकल्प पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला जनतेने सेवा करण्याची संधी दिली. जेव्हा देशाचा विकास होतो, करोडो लोकांची स्वप्ने पूर्ण होतात, तेव्हा येणाऱ्या पिढ्यांसाठी एक मजबूत पाया तयार होतो. विकसित भारताचा थेट फायदा आपल्या देशातील नागरिकांच्या सन्मान आणि जीवनमानाच्या सुधारणेतून होतो. जगाच्या विकासाच्या प्रवासात भारताचाही वाटा समान असेल, हे आमचे स्वप्न आहे. मी देशवासियांना आश्वासन देतो की, विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण समर्पण आणि प्रामाणिकपणाने सर्वतोपरी प्रयत्न करू.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -