प्रवाशांनी सावध राहण्याचे पुणे पोलिसांचे आवाहन
पुणे : पुण्यातील धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच असून रोज नवनवीन घटना समोर येत आहेत (Pune crime). पुणे हे विद्येचे माहेरघर राहिले असून गुन्हेगारीचे माहेरघर झालं आहे, असा आरोपच सर्व स्तरांतून करण्यात येत आहे. कधी हाणामारी, कधी खून, कधी गोळीबार, कधी कोयता गँगची दहशत तर आता ड्रग्ज प्रकरण यांमुळे पुण्यातील गुन्हेगारी चिंतेचा विषय बनली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील स्वारगेटमधून (Swarget) अनेक मोबाईल चोरीच्या तक्रारी समोर येत होत्या. या प्रकरणी पुणे पोलिसांनी वेगाने तपास करत मोबाईल चोरट्यांच्या टोळीचा (Mobile theft) पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून पोलिसांनी तब्बल १२० मोबाईल आणि ३ लॅपटॉप जप्त केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट परिसर म्हणजे सध्या लुटीचे ठिकाण बनले आहे. स्वारगेट बस स्थानकामुळे येथे देशभरातून प्रवाशांची सतत गर्दी असते. मात्र याच गर्दीचा फायदा घेत एसटी स्टॅन्ड आणि पीएमपीएल बस स्टॅन्ड परिसरामध्ये मोबाईल फोनची चोरी केली जात होती. या टोळीचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी (Pune Police) केला आहे. तब्बल १३ लाख रुपये किंमतीचे १२० मोबाईल आणि तीन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
गजबजलेल्या स्वारगेटसारख्या ठिकाणाहून अनेक मोबाईल फोन्स चोरी झाल्याच्या तक्रारी पुणे पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. एके दिवशी एक इसम स्वारगेट एसटी स्टॅन्डमध्ये संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. सापळा रचून त्या इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याने स्वारगेट परिसरामध्ये १०० ते १५० मोबाईल चोरी केल्याचे सांगितले.
१३ लाखांचा मुद्देमाल जप्त
इम्रान ताज शेख असे मुख्य आरोपीचे नाव असून इतर तीन जणांना सुद्धा याप्रकरणी अटक केली आहे. आरोपींकडून आत्तापर्यंत एकूण १२ लाख रुपये किंमतीचे एकूण १२० वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन आणि एक लाख रुपये किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे तीन लॅपटॉप तसेच सॉफ्टवेअर मारण्याचे एकूण तीन डिव्हाईस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
प्रवाशांनी सावध राहण्याचे पुणे पोलिसांचे आवाहन
वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांच्या ऐवजावर डल्ला मारण्याचा चोरांचा प्रयत्न असतो. अशा वेळी घाईत असलेल्या प्रवाशांना आपल्या सामानाची चोरी झाल्याचे लक्षातही येत नाही. महिलांच्या मौल्यवान दागिन्यांवर देखील हे चोरटे लक्ष ठेवून असतात. त्यामुळे अशा वर्दळीच्या ठिकाणी सातत्याने आपल्या सामानाकडे लक्ष देण्याची सूचना केली जाते. तरीही चोरटे बरोबर डाव साधतात. त्यामुळे प्रवाशांना सावध राहण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.