Wednesday, July 3, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वMigration : कोट्यधीशांचे स्थलांतर, मोबाइल स्थित्यंतर

Migration : कोट्यधीशांचे स्थलांतर, मोबाइल स्थित्यंतर

  • अर्थनगरीतून… : महेश देशपांडे, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक

लक्षवेधी आणि माहितीपूर्ण बातम्यांनी सरता आठवडा गाजवला. त्यातील काही विशेष दखलपात्र आहेत. पैकी भारतातून ४३०० कोट्यधीशांचे स्थलांतर होत असल्याची बातमी भुवया उंचावणारी ठरली. या व्यतिरिक्त फेक कॉल ओळखण्यासाठी नवी सेवा चर्चेत आली. मोबाइल जगतातली आघाडीची विवो कंपनी ‘टाटा’ खरेदी करणार असल्याची वार्ता कान टवकारणारी ठरली. या पार्श्वभूमीवर टोमॅटो शंभरी गाठणार असल्याची माहिती कोड्यात पाडणारी ठरली.

‘हेन्ली अॅण्ड पार्टनर्स’ या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक स्थलांतर सल्लागार फर्मच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, या वर्षी सुमारे ४३०० लक्षाधीश देश सोडून जाण्याची शक्यता आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. विशेष बाब म्हणजे देशात दर वर्षी अनेक व्यक्ती उदयास येतात; पण दर वर्षी देश सोडून जाणाऱ्यांची संख्या कमी नसते. देशात व्यवसाय करण्यासोबतच हे लोक दुसऱ्या देशाचे नागरित्व स्वीकारतात. या करोडपतींमार्फत पैसा बाहेर जाणे ही विशेष चिंतेची बाब नाही. कारण जेवढे करोडपती देश सोडून बाहेर पडत आहेत, त्यापेक्षा जास्त देशात निर्माण होत आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिकेत जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, भारत सोडून गेलेले बहुतेक करोडपती आपला व्यवसाय आणि दुसरे घर येथे ठेवतात. ते एक सकारात्मक चिन्ह आहे. काही करोडपती देश सोडून जात असले, तरी देशातील आर्थिक आणि व्यावसायिक वातावरण श्रीमंत लोकांसाठी आकर्षक आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, परदेशात गेल्यानंतरही अनेक लक्षाधीश आपल्या मागे सोडलेल्या मालमत्ता आणि गुंतवणुकीतून देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत करत आहेत.

अहवालानुसार, भारतात करोडपतींची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यांचे लक्ष संयुक्त अरब अमिरातीकडे आहे. २०२४ मध्ये जगभरातील सुमारे १ लाख २८ हजार कोट्यधीश नवीन देशात स्थायिक होण्याची अपेक्षा आहे. त्यापैकी बहुतेक लोकांना संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिकेत जायचे आहे. एखाद्या देशातून श्रीमंत लोकांचे निर्गमन महत्त्वपूर्ण असते. भारत सोडून जाणाऱ्या करोडपतींनी निर्माण केलेल्या कंपन्यांचा फायदा भारतीयांनाही होतो. उदाहरणार्थ, मायक्रोसॉफ्ट, ॲपल आणि टेस्लासारख्या कंपन्या करोडपतींनी सुरू केल्या. या कंपन्यांनी हजारो लोकांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या दिल्या. यावरून लक्षाधीशांनी सुरू केलेल्या व्यवसायांचा आर्थिक परिणाम किती मोठा असू शकतो हे स्पष्ट होते. देश सोडून जाणाऱ्या लक्षाधीशांची संख्या हा देशाच्या आर्थिक आरोग्याचा एक महत्त्वाचा सूचक मानला जातो. अहवालात म्हटले आहे की, एखाद्या देशाने मोठ्या संख्येने करोडपती गमावले असतील, तर ते त्या देशातील काही गंभीर समस्येमुळे होत आहे. समस्या उद्भवतात तेव्हा श्रीमंत लोक बहुतेकदा देश सोडतात. त्यामुळे त्यांचे स्थलांतर भविष्यासाठी नकारात्मक लक्षण ठरू शकते.

दरम्यान, सरकारने फेक स्पॅम कॉल ओळखण्यासाठी नवी सेवा सुरू केली आहे. त्याची चाचणी देशातील दोन शहरांमध्ये सुरू झाली आहे. मुंबई आणि हरियाणामधील चंदिगडमध्ये ही सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे या शहरांमध्ये कॉल करणाऱ्याचा नंबर आणि नाव मोबाइलवर सेव्ह नसले तरी दिसू शकत आहे. सरकारने येत्या १५ जुलैपर्यंत ही सेवा देशभरात सुरू करण्याचे आदेश टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत. यामुळे कोणता कॉल घ्यावा अन् कोणता घेऊ नये, याचा निर्णय मोबाइलधारकाला घेता येणार आहे. मोदी सरकारच्या शंभर दिवसांच्या अजेंड्यामधील हा एक विषय आहे. कॉलर नेम प्रेजेंटेशन (सीएनएपी) अशी ही सेवा आहे. चाचणीतून या सेवेचा निकाल कसा असणार, याचा अहवाल दूरसंचार विभागाला देण्यात येणार आहे. त्यानंतर ही सेवा सर्वांना देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. कॉल घेताना झळकणारे नाव सीमकार्ड घेताना भरलेल्या अर्जावरील नावानुसार असणार आहे. सरकारने ट्रूकॉलर सारखी सेवा देण्याची योजना आखली होती. रेग्युलेटरने रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलसारख्या कंपन्यांना वर्षभरापूर्वी ही सेवा देण्यास सांगितले होते. आता त्याला अंतिम स्वरूप मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकार आणि दूरसंचार विभागाने दूरसंचार ऑपरेटरला बनावट आंतरराष्ट्रीय कॉल ब्लॉक करण्याचे निर्देश दिले होते. हे कॉल आल्यावर भारतीय क्रमांक झळकत असल्याचे जाणवले होते. दूरसंचार विभागाकडे अनेक दिवसांपासून यासंबंधी तक्रारी येत होत्या. या कॉल्सद्वारे सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणूक होत होती.

आता मोर्चा वळवू उद्योगजगताकडे

देशातील सर्वात विश्वासार्ह कंपनी असलेला टाटा समूह नवीन व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. सुईपासून विमाने बनवण्यापर्यंत मजल मारणारी ही कंपनी आता स्मार्टफोन उद्योगात उतरणार आहे. एक दशकापूर्वी टाटा समूह मोबाइल नेटवर्क आणि हॅडसेट बनवत होती; परंतु आता स्मार्टफोन बनवणार आहे. त्यासाठी चीनमधील विवो ही दिग्गज मोबाइल कंपनी खरेदी करण्याची तयारी टाटाने चालवली आहे. करार पूर्ण झाला तर या कंपनीत टाटा कंपनीचे ५१ टक्के शेअर्स असणार आहेत. त्यामुळे विदेशातील कंपनीचे सर्व नियंत्रण देशातील टाटा समूहाकडे येणार आहे. भारत सरकारने चीनमधील कंपन्यांवर नियंत्रण आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे चीनमधील ‘विवो’ ही मोठी कंपनी आपल्या कंपनीतील समभाग विकण्याची तयारी करत आहे. त्यासाठी टाटा समूहासोबत त्यांची चर्चा सुरू आहे. विवो टाटा सोबत स्मार्टफोन बनवणार आणि विक्री करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही कंपन्यांमध्ये प्राथमिक बोलणी झाली आहेत. आता विवोच्या मूल्यांकनावर हे प्रकरण आले आहे. टाटाने विवोचे मूल्यांकन केले आहे; परंतु विवोला त्यापेक्षा अधिक मूल्यांकन हवे आहे. टाटा या करारासाठी उत्सुक आहे; परंतु अद्याप काहीच निश्चित झालेले नाही.
सध्या भगवती प्रॉडक्ट या भारतीय कंपनीकडे विवोचे मोबाइल फोन तयार (मॅन्युफॅक्चरिंग) करण्याचे काम आहे. त्यासाठी या कंपनीने नोएडामधील प्लांटमध्ये भरती सुरू केली आहे. विवोचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट नोएडामधील ‘टेक्जोठन आयटी पार्क’मधील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’मध्ये असणार आहे. त्या ठिकाणी ग्रेटर नोएडामधील १७० एकर जागेवर नवीन युनिट उभारले जात आहे. त्या युनिटमधून येत्या काही दिवसांमध्ये उत्पादन सुरू होणार आहे. यापलीकडे टाटाकडून या संदर्भात काहीच माहिती दिली जात नाही; परंतु हा करार करण्यासाठी दोन्ही कंपन्यांकडून वेगाने पावले उचलली गेली आहेत, हे नक्की. अर्थात या कंपनीवर कर लपवल्याचा आणि मनी लाँड्रिंगचाही आरोप आहे.

आता कृषी क्षेत्रावर एक कटाक्ष

टोमॅटोच्या दराने देशात आगपाखड सुरू केली आहे. ही आग दक्षिण आणि दक्षिण-पूर्वमार्गे कधीही उत्तरेकडे येऊ शकते. विशेष म्हणजे देशातील १७ राज्यांमध्ये टोमॅटोचे दर ५० रुपयांच्या वर गेले आहेत. देशात अशी नऊ राज्ये आहेत, जिथे टोमॅटोचा दर साठ रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. चार राज्यांमध्ये टोमॅटोचा दर सत्तर रुपयांपेक्षा जास्त आहे. असे एकच राज्य आहे जिथे टोमॅटोचे भाव शंभर रुपयांच्या पुढे गेले आहेत. तज्ज्ञांच्या मते, उष्णतेची लाट आणि टोमॅटोचे घटलेले उत्पादन यामुळे येत्या काही दिवसांमध्ये टोमॅटोच्या किमती शंभर रुपये प्रति किलो दराच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. अंदमान निकोबारमध्ये टोमॅटोचे भाव शंभर रुपयांच्या पुढे गेले आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, २० जून रोजी येथे टोमॅटोचा भाव १००.३३ रुपये प्रति किलो होता. त्यानंतर नंबर लागतो तो केरळचा. तिथे टोमॅटोचा भाव ८२ रुपये किलो होता. मिझोराम आणि तामिळनाडूमध्ये टोमॅटोचा भाव ७० रुपये किलोच्या पुढे गेला आहे. तेलंगणा, गोवा, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात टोमॅटो ६० रुपयांपेक्षा जास्त प्रति किलो दराने विकला जात आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, सिक्कीम, ओडिशा, दादरा आणि नगर हवेली, मेघालय, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये टोमॅटोचा भाव ५० रुपये किलोच्या वर पोहोचला आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार टोमॅटोच्या सरासरी दरात चांगली वाढ झाली आहे. दक्षिण भारतात टोमॅटोची दरवाढ अधिक दिसून येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -