
कसोटी सामन्यात द. आफ्रिकेवर दहा विकेट्स राखून सरशी
चेन्नई (वृत्तसंस्था) : शफाली वर्माचे द्विशतक (२०५ धावा), स्मृती मंधानाचे शतक (१४९ धावा) यांच्या फलंदाजीतील दमदार कामगिरीसह स्नेह राणाने गोलंदाजीत प्रभावी कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात १० विकेट्स राखून, दणदणीत विजय मिळवला.
सामन्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी भारतासमोर विजयासाठी अवघ्या ३७ धावांचे लक्ष्य होते. भारतीय संघाने हे लक्ष्य बिनबाद पूर्ण केले. शुभा सतीश आणि शफाली वर्मा या सलामीवीरांनी नाबाद फलंदाजी करत, भारतीय संघाच्या गळ्यात विजयाची माळ घातली. दरम्यान चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला, तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डावा २३२ धावांवर २ फलंदाज बाद येथून सुरू झाला. सामन्याच्या या अखेरच्या दिवशी कर्णधार लौरा वॉलवार्ड्टने आपले शतक झळकावत, संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसऱ्या बाजूने विकेट जाण्याचे सत्र सुरूच राहिले. लौराने १२२ धावांची खेळी खेळली. मधल्या फळीतील नदीने दी क्लर्कने ६१ धावा करत संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात तिला यश आले नाही. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर सुने लूसने १०९ धावांची खेळी खेळली होती. ही तिकडी वगळता दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या अन्य फलंदाजांना धावा जमवण्यात अपयश आले. स्नेह राणा, दीप्ति शर्मा, राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी २ विकेट्स मिळवल्या.
तत्पूर्वी पहिल्या डावात भारताच्या शफाली वर्मा, स्मृती मंधाना यांच्या मॅरेथॉन खेळीच्या बळावर भारताने ६०३ धावांवर डाव घोषित केला. त्यात शफालीचे द्विशतक आणि स्मृतीच्या शतकाचा समावेश आहे. जेमिमाह रॉड्रिक्स, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांनीही अर्धशतकीय खेळी खेळत भारताला मोठी धावसंख्या उभारून देण्यात हातभार लावला. त्यानंतर स्नेह राणाने शानदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचे तीन तेरा वाजवले. स्नेह राणाने दक्षिण आफ्रिकेच्या ८ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तिला दीप्ति शर्माने २ विकेट्स घेत साथ दिली. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २६६ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेला फारशी विशेष कामगिरी करता आली नाही. लौरा वॉलवार्ड्ट, सुने लूस यांनी शतकी खेळी खेळली. मात्र तरीही त्यांना संघाच्या पराभवाचा बचाव करता आला नाही. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेला केवळ ३७३ धावा जमवता आल्या.