
झोपेत चालत थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला
मुंबई : झोपेत चालण्याच्या सवयीमुळे (sleepwalking) भायखळा येथील एका १९ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुस्तफा इब्राहिम चुनावाला असे या मृत तरुणाचे नाव आहे. सहाव्या मजल्यावरुन पडल्यानंतर मुस्तफा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला सेफी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता.
चुनावाला कुटुंबीय हे टॉवर नंबर १, नेसबीट रोड, माझगाव येथे राहातात. चुनावाला यांच्या मुस्तफा इब्राहिम चुनावाला या १९ वर्षांच्या मुलाला झोपेत चालण्याची सवय होती. ३० जूनच्या मध्यरात्री मुस्तफा झोपेत चालत असताना सहाव्या माळ्यावरून खाली पडला. मुस्तफा तिसऱ्या मजल्यावरील पोडियम स्पेसमध्ये पडला. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.