मराठीवर नितांत प्रेम करणाऱ्या यास्मिन शेख ‌

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर


आपण जिथे राहतो, जिथे जगतो, वाढतो त्या भूमीत बोलली जाणारी भाषा तीच आपली मातृभाषा असे मानणाऱ्या भाषातज्ज्ञ यास्मिन शेख यांचा वाढदिवस जून महिन्यात असतो. नुकत्याच चिरतरुण यास्मिनबाईंनी वयाच्या शंभराव्या वर्षात प्रवेश केला. त्यांच्या मराठीप्रेमाचे विलक्षण कौतुक करावे, तितके कमीच आहे. जेरूशा जॉन रुबेन असे बाईंचे मूळ नाव. ज्यू धर्मीयांना द्वेष व तिरस्कारातून खूप सोसावे लागले. आपला देश व भूमी सोडून स्थलांतरित व्हावे लागले. यास्मिनबाईंचे आईवडील पॅलेस्टाईनमधून भारतात स्थलांतरित झाले नि महाराष्ट्रातच वसले. शिक्षणाकरिता मराठी माध्यमच निवडल्या कारणाने मराठीचा वारसा आपसुकच लाभला.


आईवडील उत्तम मराठी बोलणारे नि मुख्य म्हणजे मराठी वाचनाची आवड जपणारे! त्यामुळे घरात भरपूर मराठी पुस्तके स्त्री, सत्यकथा, किर्लोस्कर अशी नानाविध मासिके येत होती. अवती-भवतीच्या या मराठी वाचनसमृद्धीतून बाईंचे मराठीशी दृढ नाते जुळले. वडील बांधकाम खात्यात असल्याने वाई, पंढरपूर, नाशिक, कराड अशा विविध ठिकाणी त्यांच्या बदल्या झाल्या नि तिथे तिथे मराठी साहित्य संस्कृतीचा ठसा मनावर उमटत राहिला. बी.ए.च्या शेवटच्या वर्षी मराठी या विषयात सर्वोत्तम गुण मिळवून, बाई इतर विषयांच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आल्या. आजमितीला ‘मराठीत गुण मिळत नाहीत’ या सुरू असलेल्या प्रचाराची आठवण होते. अन्य विषयांप्रमाणेच मराठी विषयाचा प्रेमाने अभ्यास करणाऱ्यांसाठी गुण देणाराच विषय आहे. श्री. म. माटे यांच्यासारखे हातचे राखून न ठेवणारे उदार व संवेदनशील शिक्षक यास्मिन बाईंना लाभले. नाशिकच्या कन्या शाळेत नोकरी करत बाईंनी एम. ए.चा अभ्यास केला.बाई मराठीचे अध्यापन करणार, यावर शिक्कामोर्तबच झाले.


वसंत कानेटकरांचे पदव्युत्तर अभ्यासासाठीचे सहकार्य दिशादर्शक ठरले. कानेटकरांच्या संपर्कातूनच पुरोगामी विचाराच्या डॅडी शेख या मुस्लीम तरुणाशी त्यांचा परिचय झाला. प्रेमातून सुरू झालेला सहजीवनाचा हा प्रवास सुंदर होता. आपल्या दोन्ही मुलींना बाईंनी मराठी माध्यमातच शिकवले. सायन येथील एस. आई. एस. महाविद्यालयात बाईंनी प्रदीर्घ काळ मराठीचे अध्यापन केले. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी शब्दलेखनकोश’ हे बाईंचे ग्रंथ मौलिक आहेत. व्याकरण हे रुक्ष व नीरस असते हे बाईंना मान्यच नाही. शब्दकोशांच्या जगात त्या सहज रमल्या. जिथे मराठी शब्द उपलब्ध असतात, तिथेही समाज ते वापरत नाही, याची त्यांना खंत वाटते. मराठी प्रदूषित होत आहे, तिची उपेक्षा होत आहे, हे जाणवते, तेव्हा त्या अस्वस्थ होतात. मराठीला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा म्हणून आपण किती गंभीर आहोत? मराठीबाबतची समाजाची उदासीनता हाच तर तिच्या विकासातला अडसर आहे, ही जाणीव करून देणाऱ्या मराठीप्रेमी यास्मिनबाईंना उदंड शुभेच्छा!

Comments
Add Comment

सौदीही निसटला?

सौदीही निसटला? पाकिस्तानचा नुसता उल्लेख झाला, तरी भारतीय मन सावध होतं. पाकिस्तान भारताची थेट कुरापत काढू शकत

नागपूरकर भोसलेंचा पितृपक्षातील गणेशोत्सव

नागपूरकर भोसलेंचा पितृपक्षातील गणेशोत्सव महाराष्ट्रात भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून तर चतुर्दशीपर्यंत घरोघरी

मराठी साहित्याचा विश्वास

९९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड यंदा

मोदींची दूरदृष्टी: मिशन कर्मयोगी

सार्वजनिक प्रशासनाच्या क्षेत्रात भारत काहीतरी अभूतपूर्व करण्याचा प्रयत्न करत आहे. तो केवळ अधिकाऱ्यांच्या

बालेकिल्लाही भाजप विचारांचा होतोय

तरुण मतदारांच्या अपेक्षा रोजगार, शिक्षण व उद्योजकतेशी निगडित आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी अजूनही पारंपरिक

नाशिक इंडस्ट्रियलची डेस्टिनेशनकडे वाटचाल

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट टेस्टिंग लॅब ही ऊर्जा मीटर्स ट्रान्सफार्मसी ऑइल इन्सुलेशन प्रयोग शाळा, केबल,