राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जणू खेळ मांडला आहे. या संस्थेने घेतलेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार हा युवापिढीच्या भवितव्याशी खेळ असल्याचे, सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले आहे. नीट परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की राष्ट्रीय तपास संस्थेवर आली. हा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही आघात आहे. या घोटाळ्यात गैरप्रकार घडवणारी तीन ठिकाणे समोर आली आहेत. यानिमित्ताने…
आपण युवा पिढीला देशाचे भविष्य म्हणतो. त्यांनी अर्जित केलेल्या ज्ञानाचा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा केवळ त्यांना वा त्यांच्या कुटुंबालाच नव्हे, तर संपूर्ण समाजाला लाभ होत असतो. मात्र शिक्षण क्षेत्रातील वाढलेल्या गोंधळामुळे सध्या हे चित्र धुरकट होताना दिसत आहे. देशभर गाजत असलेला नीट परीक्षेचा गोंधळ, त्यातील घोटाळ्याची शक्यता आणि त्यावरून विद्यार्थ्यांचा आक्रोश वाढत असताना ही बाब किती गंभीर आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
खरे पाहता २०१६ पासून संपूर्ण देशात एकच सीईटी घेण्याची एक अतिशय चांगली पद्धत सुरू करण्यात आली. तोपर्यंत प्रत्येक राज्याची वेगळी तसेच खासगी विद्यापीठांची वेगळी अशाप्रकारे या प्रवेश परीक्षा घेतल्या जायच्या. त्यात बरेच गैरप्रकार चालल्याचा संशयही घेतला जायचा. त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी समान दर्जा ठेवण्याच्या उद्देशाने ही सामायिक परीक्षा सुरू झाली. राष्ट्रीय चाचणी संस्थेकडे (एनटीए) त्याची जबाबदारी गेली. अर्थातच ही यंत्रणाही तेवढीच सक्षम असण्याची अपेक्षा होती. मात्र याबद्दलही काही तक्रारी येत होत्या. अर्थात त्या आताइतक्या मोठ्या प्रमाणावर नव्हत्या. यंदा आलेल्या तक्रारी मात्र अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत. आतापर्यंत कधीही मिळाले नाहीत, असे गुण यंदा विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत. तेदेखील एका विशिष्ट सेंटरमधील वा एका विशिष्ट भागातील विद्यार्थ्यांवर गुणांची बरसात झाली आहे. त्याचबरोबर यंदा ग्रेस गुण देण्याचा झालेला विचित्रपणाही आधी कधीच पाहायला मिळाला नव्हता. हे सगळेच अत्यंत संशयास्पद आहे. कोणत्याही कारणांमुळे ग्रेस गुण देण्याची पद्धतच मुळात चुकीची आहे. एक वेळ विद्यार्थ्यांना तिथल्या तिथे वेळ वाढवून देणे पटण्यासारखे होते, कारण त्यात त्यांचा कस टिकून राहिला असता. मात्र ग्रेस गुण देऊन एक मोठी चूक केली, यात शंका नाही.
सदर प्रकरणाचा एवढा आरडाओरडा होण्यामागील आणखी एक कारण म्हणजे आधीच वैद्यकीय प्रवेशासाठी असणाऱ्या जागा अगदीच कमी म्हणजे देशभरात अवघ्या लाखभराच्या घरात आहेत. मात्र या जागांसाठी १८ ते २० लाखांच्या संख्येने विद्यार्थी प्रवेश परीक्षा देताना दिसतात. साहजिकच स्पर्धा अत्यंत तीव्र आहे. अशा स्थितीत एक एक गुण महत्त्वाचा असतो. गेल्या वर्षीची स्थिती बघायची, तर नीटला ६५० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला उत्तम मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. मात्र यंदा तेवढेच गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी नाहीच; पण खासगी कॉलेजमध्ये तरी प्रवेश मिळेल की नाही, अशी शंका येण्याइतकी वाईट परिस्थिती आहे. त्यामुळेच कुठे तरी, काही तरी निश्चितच चुकले आहे. पण त्याबाबत पारदर्शकतेने ना एनटीए पुढे येत आहे ना सरकार… असेही आता एनटीएच्या प्रमुखांची हकालपट्टी झाली आहेच. एक प्रकारे ही घोटाळा झाल्याचे मान्य केल्यासारखीच स्थिती आहे.
अशा परिस्थितीत पुन्हा परीक्षा घेण्याचा पर्याय चर्चेत आहे. मात्र तसे झाले तर खरेच प्रचंड अभ्यास करून चांगले गुण मिळवणाऱ्या मुलांवरील तो अन्याय ठरेल, कारण तोच उत्साह टिकवून पुन्हा परीक्षा देणे आणि पुन्हा तेवढेच गुण मिळवणे हे एक आव्हानच आहे. या सगळ्या गोंधळाचा आणखी एक परिणाम म्हणजे यंदा मोठ्या संख्येने मुले ड्रॉप घेतील आणि पुढच्या वर्षी नीट देण्यास पसंती देतील. तसे तर दरवर्षी थोड्या फार फरकाने अशीच स्थिती असते. दरवर्षी काही हजार मुले कमी गुण मिळाल्याच्या कारणास्तव पुन्हा या परीक्षेला बसतात. मात्र यापुढे ते प्रमाण प्रचंड मोठे असेल, कारण आता ६००-६५० अशा चांगल्या गुणांसहित प्रवेश मिळाला नाही, तर एक वर्ष गेले तरी चालेल; पण अधिक गुण मिळवू, असा विचार केला जाईल आणि यातूनच पुढच्या वर्षीदेखील स्कोअर खूप वर जाईल. यंदाची हुशार मुलेदेखील पुन्हा परीक्षा देतील, खेरीज नवी मुलेही येतील तेव्हा स्वाभाविकच तीन-चार वर्षे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्यांच्या मोठ्या स्पर्धेला त्यांना तोंड द्यावे लागेल. खेरीज हा या नवीन मुलांवरील अन्यायदेखील असेल. कारण ही मुले अधिक वेळ आणि अनुभवानिशी परीक्षा देतील. थोडक्यात हे एक दुष्टचक्र सुरू राहील, जे या पिढीसाठी त्रासदायक सिद्ध होईल.
आधीच वैद्यकीय शिक्षणाचा संपूर्ण अभ्यासक्रम अतिशय रटाळ म्हणून ओळखला जातो. साडेपाच वर्षांचा मुख्य अभ्यास संपवल्यानंतर पीजी नीट देण्यासाठी, मुलांना एक-दीड वर्षे तयारी करावी लागते. त्यानंतरही पुढे काही शिकण्याची गरज असतेच. म्हणजेच वैद्यकीय शिक्षणाचा कालावधी १०-११ वर्षे रेंगाळतो. त्यांचे शिक्षणच संपत नाही. यांचे प्राथमिक पदवीपर्यंतचे शिक्षण होईपर्यंत त्यांच्याबरोबर अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरीला लागलेले असतात. त्यांचे पॅकेज वाढू लागलेले असते. म्हणजेच आधीच ही समस्या असताना, आता प्रवेश परीक्षांमधील घोटाळ्याचे ताजे प्रकरण विद्यार्थी तसेच पालकांवरील ताण असह्य अवस्थेत नेऊन ठेवणारे आहे.
याचा आणखी एक दुष्परिणामही दुर्लक्षित करण्यासारखा नाही. हा धोका विद्यार्थी आणि पालकांनी परदेशी पर्याय शोधण्याचा आहे. खरे तर सध्याच्या स्थितीत हा पर्याय किती घातक आहे, हे वेगळे सांगायला नको. रशिया-युक्रेन युद्धामुळे मुलांना वैद्यकीय शिक्षण अर्धवट टाकून परतावे लागले, तेव्हा आपण याचा फटका सहन केलाच आहे. मात्र अशी एखादी विचित्र आणि संशयास्पद, गोंधळाची आणि अविश्वासाची परिस्थिती उद्भवते तेव्हा लोक मागचे सगळे विसरतात आणि परदेशाची वाट धरतात. आजही भारतीय विद्यार्थी रशिया, युक्रेन, जॉर्जिया, फिलिपाइन्स, चीन आदी देशांमधील वैद्यकीय अभ्यासक्रमांना मोठ्या प्रमाणावर जाताना दिसतात. असे असताना सद्यस्थितीमध्ये हे प्रमाणही वाढेल आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती प्रतिकूल बनल्यास त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी केंद्र सरकारवर येईल. खेरीज विद्यार्थ्यांची कारकीर्दही धोक्यात येईल. थोडक्यात ‘नीट’मधील घोटाळा आणि संशयाचे वातावरण अशा एक ना अनेक दुरवस्थेचे कारण ठरू शकते. त्यामुळे आता तरी यावर रास्त तोडगा निघणे गरजेचे आहे. मुख्य म्हणजे दोषींवर अत्यंत कठोर कारवाई करण्याची खरी गरज आहे. परत कोणाची असे काम करण्याची हिंमत होऊ नये, इतके या शिक्षेचे कडक स्वरूप असणे गरजेचे आहे.
ताजा घटनाक्रम लक्षात घेता, परीक्षेत गैरव्यवहार असल्याचे नाकारणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी यथावकाश गैरव्यवहार झाल्याची कबुली दिली, हे लक्षात घ्यावे लागेल. घोटाळ्याशी संबंधित तीन ठिकाणे समोर आली आहेत. ‘नीट’ घोटाळ्याच्या मास्टरमाइंडचे लपण्याचे ठिकाण बिहारची राजधानी पाटणापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या नालंदा येथे आहे. नालंदाच्या नगरसौना गावात ‘नीट’ पेपर लीकच्या सूत्रधाराचे घर आहे. संजीव मुखिया असे पेपरफुटीच्या सूत्रधाराचे नाव आहे. मुखिया फरार असून, विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपर लीक प्रकरणात गेल्या २० वर्षांमध्ये त्याचे नाव अनेक वेळा समोर आले आहे. पेपरफुटी प्रकरणी मुखिया याचा मुलगाही तुरुंगात आहे. त्याची पत्नी पाटणा येथे राहते. त्याचा मुलगा शिव डॉक्टर असून, तो सध्या दुसऱ्या एका पेपरफुटी प्रकरणात तुरुंगात आहे. पोलिसांनी संजीवला अटक केली असून, तो तुरुंगात गेला आहे. त्याचबरोबर सरकारने ‘एनटीए’ सुधारण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकूणच पेपरफुटी ही देशातली गंभीर समस्या बनली आहे. ‘एनटीए’च्या स्थापनेपासून जवळजवळ प्रत्येक वर्षी परीक्षेत अनियमितता आणि हेराफेरीचे आरोप होत आहेत. २०१९ मध्ये जेईई मेनदरम्यान विद्यार्थ्यांना सर्व्हरमधील बिघाडामुळे समस्यांना सामोरे जावे लागले होते. याशिवाय काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका उशिरा आल्याच्या तक्रारीही केल्या होत्या. ‘नीट अंडरग्रेज्युएट मेडिकल’ प्रवेश परीक्षा २०२०च्या वेळीही ‘एनटीए’वर गंभीर प्रश्न उपस्थित केले गेले. परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलाव्या लागल्या. या परीक्षेत अनियमिततेच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. २०२१ मध्ये ‘जेईई मेन’ परीक्षेत काही चुकीच्या प्रश्नांमुळे गदारोळ झाला होता. अनेक ठिकाणी शिक्षण माफियांकडून परीक्षा चुकीच्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही झाला.
२०२१ मध्येच, राजस्थानच्या भांक्रोटा येथे सॉल्व्हर टोळीने ‘नीट’ परीक्षेत अनियमितता केल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणाबाबत देशभरात खळबळ उडाली होती. २०२२ मध्ये विविध केंद्रीय, राज्य आणि खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेत अनियमिततेच्या तक्रारी आल्या होत्या. आतापर्यंतच्या सर्वाधिक तक्रारी राजस्थानमधून आल्या आहेत. बिहारमध्ये पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे ‘एनटीए’ची विश्वासार्हता आणि पारदर्शकता यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ते लवकरात लवकर दूर होईल, हीच अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…