Tuesday, July 9, 2024

भाळणं…

हलकं-फुलकं – राजश्री वटे

नुसतं उच्चारलं तरी मस्त वाटतं…
कुणी तरी आपल्यावर भाळणं… किंवा आपण कुणावर तरी!
दुसऱ्याचं काहीतरी चांगलं आवडून जातं, आवडू लागतं… आणि त्या व्यक्तीच्या, त्या गोष्टीच्या प्रेमात पडतो!!
लहानपणी एखाद्या खेळण्याच्या
प्रेमात असतात…
मधल्या वयात मित्र किंवा मैत्रिणींवर जीव भाळतो…
तरुणपणी आवडलेल्या व्यक्तीवर दिल फिदा होऊन जातं… प्रेमातच पडतो…
सिनेमातील हिरो-हिरोईनवर तर कुर्बान जावा!
हे भाळणं फक्त तरुणपणावरच थांबत नाही, ते कोणत्याही वयात, कोणाच्याही लकबींवर फिदा होतं, अगदी प्रेमातच पडतं! प्रत्येक वयात याची व्याख्या बदलते… दृष्टिकोन बदलतो!

सुंदर स्त्रीच्या सौंदऱ्यावर भाळणारे खूप असतात… लाघवी बोलणं, दिलखुलास हसणं, गालावरची खळी, कपाळावर रुळणाऱ्या लडीवाळ बटा… यावर फिदा असणारे पुरुष तर असतीलच पण स्त्रीसुद्धा तिच्या या रूपावर नक्कीच भाळते… तिच्याजवळ नसलेलं पण ते दुसऱ्या स्त्रीकडे असेल, तर तिला नक्कीच भुरळ घालतं व तिला प्रेमात पाडतं नक्कीच!!
नुसती बाह्यसौंदर्याची भुरळ नसते ही… व्यवस्थितपणा, सुगरणपणा, हौशी स्वभाव एखाद्या व्यक्तीमधील भावतात व आत्मसातही करावेसे वाटतात कुठल्याही वयात…

अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत वेगवेगळ्या स्वभावाचे अनेक पैलू आवडतात, ते स्वतः जवळ असावे किंवा जमले तरी पाहिजे असं मनाला पटवून देऊन त्याप्रमाणे वागलं जातं म्हणजे त्या गोष्टीवर भाळणं!!
अनेकांच्या कलागुणांवर फिदा होणारे अनेक दर्दी असतात… मनापासून दाद देणारे…
संगीताच्या प्रेमात पडलेले अनेक असतात… पण एखाद्या गायकावर फिदा होणारेही आहेतच…
हे फक्त व्यक्ती सापेक्षच नसतं तर… निसर्ग, वस्तू, प्राणी यावर सुद्धा मन जडतं… हे मन जडणं म्हणजे आवडणं… तेच भाळणं!!

काश्मीरच्या प्रेमात कोण नाही पडणार…
ताजमहालला कसं विसरायचं…
शांत वातावरणात समुद्राची गाज साद
घालते तेव्हा…
झालात ना फिदा त्या लाटांवर…
मोगऱ्याच्या सुगंधावर भाळलाच आहात ना…
कोजागिरीच्या देखण्या चंद्रावर…
काळ्या ढगांना पाहून मोराचा नाच…
वाघाचा दरारा…
देवाची भक्ती…
ब्लॅक सिनेमा…
भरजरी पैठणी…
उगवता सूर्य…
मावळत्या सूर्याच्या छटा…
प्राजक्ताचा सडा…
खमंग पुरणपोळी…
मृदगंध…
रत्नागिरीचा हापूस…
ऐटबाज चेतक…
उंचावरून पडणारा धबधबा…
झाला आहात ना या गोष्टींवर फिदा…
आणि कितीतरी…
आयुष्य हे चांगल्या गोष्टींच्या प्रेमात पडण्यासाठीच असतं हे मात्र खरं!!

देवानं सृष्टीच अशी बनवली आहे, कित्येक गोष्टींवर जीव भाळतो, सौंदऱ्याची खाणच… फक्त ती नजर असायला हवी… ते सौंदर्य टिपायचं…अनुभवायचं… वाखाणायचं! मग ते इतकं भावतं की, त्याच्या प्रेमात न पडून चालणारच नाही!
अशाप्रकारे भाळणं, फिदा होणं, अन् नंतर प्रेमात पडणं हा जीवनातला सुंदर अनुभव आहे!
सौंदऱ्यावर असतं भाळणं!
अदांवर असतं फिदा होणं!!
कला आणि कलाकाराच्या असतं
प्रेमात पडणं!!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -