क्राइम – अॅड. रिया करंजकर
तरुण पिढी ही सुशिक्षित असल्यामुळे, रोजगारासाठी छोटी-मोठी कामे करण्यासाठी मुंबईला येतात. ५० वर्षांपूर्वी गावाकडे एकत्र कुटुंबपद्धती होती; पण आताची परिस्थिती बघितली, तर गावच्या घरात वयस्कर एक किंवा दोन माणसे असतात. काही घरांचे दरवाजे बंद असतात, ते मे महिना, गणेशोत्सव, सणासुदीला उघडतात. गावाकडे राहणारा भाऊ, चुलता जो कोणी असेल, तो लक्ष देत असतो. गावाकडच्या जमिनी कसत असतो. काही वर्षांपूर्वी मुंबईचा चाकरमानी पाऊस सुरू झाला की, शेतीसाठी दहा-पंधरा दिवस का होईना गावी जायचा, आता तेही बंद झाले.
सुधाकर आणि त्याचे कुटुंब कामानिमित्त मुंबईला राहत होते. सुधाकरचा भाऊ रामदास हा आपल्या आईसोबत गावी राहत होता. शेतात पीक घेऊन, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. जेवढी जमेल तेवढी शेती रामदास करत होता. बाकीची शेती ही दुसऱ्याला लागवडीसाठी देत असे.
सुधाकरचे वडील गेल्यानंतर आईबरोबर बाकीच्या भावंडांची नावे सातबारावर आलेली होती. सर्वांचा हक्क हा समान होता; पण काही शेतीच्या कामानिमित्त सतत मुंबईच्या चाकरमान्यांना गावी जाता येत नव्हतं म्हणून रामदास गावी राहत असल्यामुळे, त्याला लिहून दिलं होतं की, गावी जमिनीच्या बाबत काही व्यवहार असतील, तर आमच्यातर्फे रामदास बघेल. त्यांनी हे आपल्या सोयीसाठी केलेलं होतं; कारण आमच्यामुळे जमिनीचे कुठले व्यवहार थांबू नये; पण रामदास याला दारूचे व्यसन होते आणि वृद्धापकाळाने त्याची आई गेली होती. त्यामुळे तो गावी एकटाच राहत असे. मुंबईच्या भावंडांनी रामदासला गावच्या जमिनीचे सर्व अधिकार दिले, हे गावातील सावकाराला माहीत होते. सावकार ज्यावेळी रामदासला भेटायचा, त्यावेळी तो रामदासला मुद्दामहून दारूचे व्यसन लावायचा. रामदासबरोबर गोडगोड बोलून गप्पागोष्टी करायचा. रामदासचाही सावकारावर विश्वास बसू लागला. एके दिवशी सावकाराने रामदासच्या शेतातील जमीन शेती करायला मागितली. सावकाराने रामदासला सांगितले की, तू मला तुझी शेती कसायला दे. मी त्या बदल्यात तुला योग्य तो मोबदला देईन. रामदासला सावकाराचा निर्णय योग्य वाटू लागला. सावकाराकडून पडीक जमिनीत पीक पण येईल आणि योग्य तो मोबदला पण मिळेल. रामदासने सावकारासोबत घेतलेला निर्णय मुंबईतल्या एकाही भावाला सांगितला नव्हता.
सावकाराने दोन-तीन वर्षं त्या जमिनीतून चांगल्यापैकी पीक काढलं आणि त्याचा मोबदलाही रामदासला दिला होता. रामदास चांगलाच खूश होता. त्याला दररोज दारू मिळत होती. एके दिवशी सावकाराने रामदासचा कल बघून, त्याच्याकडून काही पेपरवर सह्या करून घेतल्या. त्यावेळी रामदास साहजिकच दारूच्या नशेत होता. रामदासने सावकाराला सह्यांबद्दल विचारलं, तर त्यावेळी सावकाराने त्याला सांगितले की, मला तुझी जमीन अजून दोन-तीन वर्षे कसायची आहे. त्यामुळे मी पेपर करून घेतले; कारण तू दुसऱ्या कोणालाही ती जमीन कसायला देणार नाही. हा व्यवहार आपल्या दोघांतच राहील. रामदासने ते मान्य केले आणि कागदपत्रांवर सह्या केल्या. त्याचदरम्यान रामदासचा मोठा भाऊ सुधाकर गावी आला होता. सुधाकरने जमिनीबद्दल रामदासला विचारलं असता, त्या जमिनीत सावकार शेती करत असल्याचे रामदासने सांगितले. सुधाकरने सावकाराला विचारले असता, गेली दोन-तीन वर्षे ती जमीन मी कसत असून, त्याचा मोबदलाही मी रामदासला देत असल्याचे सावकाराने सांगितले. सुधाकरने जास्त प्रश्न न विचारता, आपल्या भावाला चार पैसे मिळत आहेत, त्या आनुषंगाने विषय सोडून दिला.
पण सुधाकर जेव्हा गावी गेला, तर त्याला असं दिसलं की, सावकाराने जमिनीच्या बॉर्डरला विटांची बॉर्डर बांधली होती. याबद्दल सुधाकरने रामदासला विचारले असता, रामदासला त्यातले काहीच माहीत नसल्याचे सांगितले. सुधाकरने जमिनीबद्दल सावकाराला विचारले असता, सावकाराने सरळ उत्तर दिलं की, तुमची जमीन तुमच्या भावाने मला विकलेली आहे आणि त्याचा मोबदला मी रामदासला देत आहे. सावकाराने आपल्याकडे असलेली कागदपत्रे सुधाकरला दाखविली. सुधाकर त्यांना बोलला की, या जमिनीचे आम्हीही मालक आहोत, आमचीही सातबारावर नावे आहेत. सातबारा काढण्यात आला, त्यावेळी सुधाकर आणि इतर भावंडांनी केलेली चूक त्यांच्या लक्षात आली. कारण त्यांनी तिथे लिहून दिलेलं होतं की, या जमिनीचा जो काही व्यवहार होईल, त्या पाहण्याचा रामदासला आम्ही पूर्ण अधिकार दिलेला आहे. त्याला अधिकार दिलेला असल्यामुळे, त्यांनी ती जमीन विकली, असं सावकार सरळ सुधाकरला म्हणाला. त्यामुळे या जमिनीवर तुमचा कोणताही आणि कशाही प्रकारचा अधिकार नाही, असं सावकार त्यांना बोलू लागला. रामदासच्या दारूच्या नशेमुळे चांगली शेतजमीन सुधाकर आणि त्यांच्या कुटुंबाच्या हातून निघाली होती. नोकरीच्या निमित्ताने गाव सोडून, शहराकडे गेलेली तरुण पिढी गावाच्या जमिनीकडे दुर्लक्ष करतात आणि जमीन अशाप्रकारे गावाच्या सावकारांच्या ताब्यात येतात. त्यामुळे गावचे सावकार दिवसेंदिवस अधिक श्रीमंत होत चाललेले आहेत आणि मुंबईचा चाकरमानी मात्र गावचे घरदार सोडून, मुंबईमध्ये ८ बाय ८ च्या खोलीत आपले आयुष्य काढत आहेत.
(सत्यघटनेवर आधारित)