मुलाला एखाद्या दिवंगत पूर्वजाचे नाव ठेवण्याची परंपरा आजही कोकणात आहे. या परंपरेप्रमाणे सोहिराबानाथांचे नाव ठेवण्यात आले. मात्र प्रेमाने त्यांना सोयरू असे घरातील ज्येष्ठ मंडळी हाक मारायची आणि घरातले सोयरू सोहिरोबानाथ झाले. बांदे ऊर्फ एलिदाबाद हे तेव्हा शहरवजा गाव होते. सावंतवाडीच्या जवळच्या या गावात सोहिरोबानाथांचे कुटुंब वस्तीला आले. आंबिये मंडळी या नव्या गावी आली, तेव्हा सोहिरोबांची मुंज झालेली होती. सोहिरोबानाथ यांच्याबाबत एक किस्सा सांगितला जातो, त्या दिवशी कडक ऊन होते. सावंतवाडीतून राजेसाहेबांचे तातडीचे निमंत्रण आले. फणस घेऊन नाथ निघाले. इन्सुली मेटाच्या खाली विश्रांतीसाठी वडाच्या झाडाखाली ते थांबले. फणस फोडला. आता गरे खाणार, एवढ्यात त्या वनातून स्पष्ट आवाज, ‘‘बाबू हमको कुछ देता है?’’ तेव्हा नाथांनी या आपण तृप्त व्हा, असे सांगितले.
स्वरांची जागा आकृतीने घेतली. भव्यपुरुष, नाथपंथी वेश योग्याने फणसाची चव चाखली. पाच गरे सोहिरोबांना दिले. योग्याने “मी गहिनीनाथ, गैबीनाथ, तुझे वैराग्य पाहून संतुष्ट झालो. तू यापुढे अच्युत आंबिये नव्हेस, तू सोहिरोबा सोऽहं मंत्राचा जप कर. अमर होशील,’’ असा आशीर्वाद दिला. हा गहिनीनाथांचा साक्षात्कार नाथांच्या जीवनातील परिवर्तनबिंदू ठरला. सावंतवाडी दरबारात जाऊन, त्यांनी राजाकडे राजीनामा दिला अन् पुन्हा बांद्याची वाट धरली.
तत्कालीन समाजावर नाथ संप्रदायाचा मोठा पगडा या भागात असल्याचे दिसून येते. सोहिरोबानाथही यातून सुटले नाहीत. त्यांच्यावर गोरक्षनाथाचा मोठा प्रभाव. सोहिरोबांना गुरूमंत्रही त्यांनीच दिला. त्यांच्या उपलब्ध कवितेत गोरक्षनाथांवरचे एकच पद आठवते. याच्या उलट गैबीनाथासंबंधीचे उल्लेख वारंवार आढळतात. मग हा गैबीनाथ कोण प्रश्न समोर येतो. मराठी वाङ्मयाचा अधिक अभ्यास करताना दोन गैबीनाथ आढळतात. कै. बा. भ. बोरकर यांनी याची उकल करण्याचा बराच प्रयत्न केला आहे. या दोन गैबीनाथांपैकी एक गहिनीनाथ आणि दुसरे ज्ञानेश्वरांचे शिष्य सत्यामलनाथांचे शिष्य गैबीनाथ. महाराष्ट्र भाषाभूषण आजगावकर यांच्या मते, गोरक्ष शिष्य गहिनीनाथ हेच सोयरोबांचे गुरू होते. हिंदू लोक त्यांना गैबीनाथ आणि मुसलमान त्यांना ‘गैबी पीर’ असे म्हणतात. सोहिरोबानाथांबद्दल अधिक जाणण्याचा जेव्हा प्रयत्न होतो, तेव्हा पावला पावलावर आश्चर्याचा धक्का बसतो. इतिहासकारही चकित व्हावेत, असे एक एक दाखले मिळू लागतात. आपले उभे आयुष्य ईश्वर भक्तीत व्यस्त असताना, वंशपरंपरागत आपल्याकडे कुळकर्णीचे काम आले आहे. ते नेटाने आणि प्रामाणिकपणे केले पाहिजे, याची त्यांना जाणीव होती. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी हे काम सुरू केले. २० वर्षं इमाने-इतबारे चालविल्यानंतर आता पुढे यातच रमणे योग्य नाही, असे समजून त्यांनी या कामांचा राजीनामा दिला.
यावेळी नाथांच्या मुखातून अनेक पदे निर्माण होऊ लागली; पण नाथांनी ती लिहून ठेवली नाही. मात्र आज जी शेकडो पदे उपलब्ध आहेत, ती नाथांच्या भगिनीने लिहून घेतलेली. नाथांच्या सान्निध्यात राहून, तोंडावाटे बाहेर पडणारी संतवाणी ती लिहून घेई. पुढे मग गुरुकृपेने आलेला आत्मानुभव शब्दबद्ध होऊन, गीतबद्ध होऊ लागला. सोहिरोबांनी पदरचनाही विपुल केली होती. श्लोक, अभंग, आरत्या, कटिबंध, सवाया यांचा त्यात अंतर्भाव होतो. विविध रागांमध्ये गाता येतील, अशी त्यांची पदे आहेत. तात्त्विक विषयांवर काव्यरचना केल्यामुळे, सोहिरोबांच्या मराठीत संस्कृतप्राचुर्य लक्षणीयपणे आलेले आहे. मात्र त्यांच्या शैलीत कुठेही क्लिष्टपणा आलेला दिसत नाही. त्यांचे बरेचसे आयुष्य कोकणात गेल्यामुळे, त्यांच्या रचनांतून कोकणात प्रचलित असलेले शब्दही आढळतात.
‘अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे…’ असा संदेश देणाऱ्या सोहिरोबानाथांनी ‘सिद्धान्तसंहिता’,‘अद्वयानंद’, ‘पूर्णाक्षरी’, ‘अक्षयबोध’ व ‘महदनुभवेश्वरी’ असे ग्रंथ लिहिले. ‘सिद्धान्तसंहिता’ या ग्रंथात सुमारे पाच हजार, तर ‘महदनुभवेश्वरी’ या ग्रंथात नऊ हजारांहून जास्त ओव्या आहेत. इतर तीन ग्रंथांमध्ये प्रत्येकी पाचशे ओव्या आहेत. या सर्व ग्रंथांचा लेखनकाळ १७४८ ते १७५० असा आहे. ग्रंथलेखनाव्यतिरिक्त सुमारे पाच हजार पदे त्यांनी लिहिली, असे म्हणतात. त्यात अभंग, श्लोक, सवाया, कटिबंध, आरत्या इत्यादींचा समावेश आहे. वयाची चाळिशी पूर्ण व्हायच्या आधीच ते ग्रंथलेखन कार्यातून निवृत्त झाले आणि गावोगावच्या भजन मेळ्यांमध्ये सहभागी होऊ लागले. त्यांनी हिंदीमध्येही काव्यनिर्मिती केली आहे. ‘‘संतश्रेष्ठ नामदेवांनंतर उदंड हिंदी भक्तिकाव्य रचना करून, उत्तरेस स्वतःच्या पंथाची ध्वजा लावणारा सोहिरोबांएवढा तोलामोलाचा सत्पुरुष महाराष्ट्र संतमंडळात दुसरा कुणी दिसत नाही,’’ असे त्यांच्या चरित्राचे आणि त्यांच्या काव्याचे अभ्यासक बा. भ. बोरकर यांनी म्हटले आहे.
दिसणे ते सरले। अवघे प्राक्तन हे मुरले।।
आलो नाही गेलो नाही।
मध्ये दिसणे हे भ्रांती।
जागृत होता स्वप्नची हरपिले। अशी अनेक रसाळ पदे निर्माण करून, कोकणासह संपूर्ण उत्तर भारतात नाथपंथाची ध्वजा लावणारे, श्री संतश्रेष्ठ सद्गुरू सोहिरोबानाथ आंबिये यांना इन्सुली (ता. सावंतवाडी) मेटाच्या पायथ्याशी असलेल्या विस्तीर्ण वटवृक्षाच्या सावलीत सोहिरोबांना गहिनी नाथांचा कृपाप्रसाद लाभला. तेथेच नाथभक्तांनी त्यांचे भव्य मंदिर उभारून, त्यांची स्मृती जोपासली आहे. वैशाखी पौर्णिमेला येथे आत्मसाक्षात्कार दिन हजारो भाविकांच्या उपस्थितीत दरवर्षी साजरा होतो.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…