Friday, May 9, 2025

किलबिलसाप्ताहिक

शिदोरी

शिदोरी

मुली सासरी जाताना मुलीबरोबर शिदोरी देण्याची प्रथा आहे. तसेच सासरहून माहेरी आलेल्या मुलीला सासरी जाताना आई आपल्याला शाब्दिक शिदोरी, वस्तूंची शिदोरी आणि प्रेमाची शिदोरीची भेट देऊन पाठवणी करत असते.


प्रतिभारंग - प्रा. प्रतिभा सराफ


आईकडे गेले होते. निघताना तिने चार लाडू बांधून दिले आणि शेजारच्या बाईंनी तिला कोकणातून येताना, अळूची दहा पाने दिली होती. त्यातली सहा पाने बांधून दिली. ताजा मुरंबा दिला. खरेतर आईची वयाची ऐशी वर्षे उलटून चार वर्षे झाली आहेत. आनंदाने मस्त एकटी राहते. तिला भेटायला गेल्यावर फार आनंद होतो; परंतु भेटायला जायला जमले नाही तरी तिची कोणतीच तक्रार नसते. तिला कधीही येताना ‘काय आणू?’ विचारले तर ‘काहीच नको, तू फक्त ये!’ म्हणते. जाताना ‘बेटा नीट जपून गाडी चालव हं, एवढेच म्हणते. खूप गप्पा करते पण कधीच कोणाविषयी काही वाईट बोलत नाही. काही कोणाचे चांगले असेल तर आवर्जून सांगते. शेजाऱ्या-पाजाऱ्यांचे खूप कौतुक करते. तिच्याकडे पाहिल्यावर असे वाटून जाते की, आपल्याला अजूनही ‘आई आहे’, ही किती मोठी आनंदाची गोष्ट आहे. जगात कोणीतरी प्रेमाने ‘बेटा...’ म्हणणारे आहे.


आईची ‘शाब्दिक शिदोरी’, ‘वस्तूंची शिदोरी’ आणि ‘प्रेमाची शिदोरी’ घेऊन मी नेहमीच परतते त्या बदल्यात तिला काही देण्याचे लक्षातच येत नाही. आतापर्यंत फक्त तिच्याकडून हक्काने, प्रेमाने घेतच आले आहे.


आज अचानक मला आजोळ आठवले. विदर्भातील अकोल्यातील छोट्याशा ‘वडाळी’ नावाच्या खेड्यात आम्ही आजीकडे जायचो. आत्या, मामा-मामी, मावशी-काका आणि खूप सारी चुलत-आते-मामे -मावस भावंडे सगळेच उन्हाळ्याच्या सुट्टीत हमखास आजीकडे आलेले असायचे. घरात विहीर होती ती अर्धेअधिक झाकलेली होती. पण त्याच्यातून पाणी काढूनच आजोबा अांघोळ करायचे. त्यांची अांघोळ अशी उघड्यावर असायची. आम्ही बाजूलाच कणगीमध्ये ठेवलेल्या भुईमुगाच्या शेंगांवर बसून तिथेच शेंगा खायचो. आजोबा ओरडायचे, ‘अरे पोरांनो, बियाण्यासाठी ठेवलेल्या आहेत त्या शेंगा.’ तर तिकडून आजी लटक्या रागाने ओरडायची. ‘बाप्पा, अशा कितीक लागणार आहे तुम्हाला बियाण्यांसाठी? कधीतरी आली आहेत नातवंड बसू दे की त्यांना आणि खाऊ द्या हवं तेवढं. लागलं तर बाजारातून विकत आणा नंतर...’


त्या दोघांमधील वादसुद्धा गमतीशीर असायचे. आजोबा ओरडले की, आजी बाजू घ्यायची आणि आजी ओरडली की, आजोबा आमची बाजू घ्यायचे. आजोळचे ते दिवस कधीच विसरता येण्यासारखे नाहीत. उन्हाळ्यात विदर्भ खूपच रखरखीत असायचा. शेतात फक्त ज्वारीचे सुकलेले धांडे असायचे. पण त्या रखरखीत उन्हाळ्याच्या दिवसातही भावंडांबरोबर केलेली मस्ती, भुताखेतांच्या रंगलेल्या गोष्टी, गावात कोणाचे लग्नकार्य असले की, आमचे वीस-पंचवीस माणसांचे कुटुंब जेवायला जायचो तो आनंद, आजीने बनवलेली शेंगदाण्याची चिक्की, मामीने बनवलेले कढी-गोळे, मामांनी स्वतः आमच्यासाठी तळलेली ढीगभर भजी, आत्या, मावशी आणि मामीने खूप राबून बनवलेले रोडग्याचे जेवण, अंगणात ढिगाने पडलेल्या चोखायच्या आंब्यांवर मारलेला ताव आणि निघायच्या दिवशी पाहुणचारात, सकाळपासून आटवत ठेवलेल्या दुधाची बासुंदी कायमस्वरूपी हृदयात साठवून ठेवलेल्या या खाद्यसंस्कृतीच्या रसरशीत आठवणी.
परतायच्या दोन-तीन दिवस आधीपासून आजी काही जुने ब्लाऊज, फाटके पेटिकोट इ. पासून छोट्या-मोठ्या पिशव्या शिवायची. त्या पिशव्यांमध्ये गच्च भरून तीळ, तुरडाळ, शेंगदाणे, सांडगे, चिकवड्या, कुरडया, सुकलेली बोरं, सरगुंडे, शेवया इत्यादी अनेक जिन्नस भरून द्यायची. मामी बसून या पिशव्यांची तोंड बंद करायची. आई ‘नको नको, इतकं नको’, असं बाजूला बसून बोलत असायची आणि मामी दाबून दाबून कसे अधिक भरता येईल का पाहायची.


हे सगळे तसेच्या तसे डोळ्यांसमोर येत आहे. आईला दिलेली शिदोरी, आमच्या कुटुंबीयांना वर्षभर पुरायची. ती शिदोरी संपायच्या आत पुढची उन्हाळ्याची सुट्टी यायची आणि नवीन शिदोरीची बेगमी करूनच आम्ही परतायचो. आज भरल्या घरात कशाचीच कमतरता नाही; परंतु आता आजीच्या घरून सरगुंडे येऊ शकत नाहीत. कारण नवीन पिढीला ते बनवता येत नाहीत, याचे दुःख आहे. जेव्हा जेव्हा आई काहीही बांधून देते तेव्हा साऱ्या रस्त्यात मला, अत्यंत प्रेमाने मुंबईत परतताना शिदोरी बांधून देणाऱ्या समस्त महिलावर्गाची आठवण येते. त्यांनी दिलेल्या पदार्थांपेक्षा, त्या जुन्या कपड्यासोबत त्या पदार्थांमध्ये घट्ट बांधलेले प्रेम आठवते.


प्रत्येकाला आयुष्यभर अशीच कोणती तरी शिदोरी मिळत राहावी, अशी अपेक्षा व्यक्त करते. आपणालाही कोणाला तरी शिदोरी देता आली पाहिजे, हीसुद्धा इच्छा व्यक्त करते!


[email protected]

Comments
Add Comment