Sunday, July 7, 2024
Homeसाप्ताहिककोलाजदेवांच्या कल्याणासाठी दधीचिंचा देहत्याग

देवांच्या कल्याणासाठी दधीचिंचा देहत्याग

विशेष – भालचंद्र ठोंबरे

एकदा इंद्र देवाकडून देवगुरू बृहस्पतींचा अपमान झाला. त्यामुळे देवगुरू इंद्रपुरी सोडून, आश्रमात निघून गेले. इंद्रदेवाला आपली चूक कळल्यानंतर त्यांनी पश्चाताप दग्ध होऊन बृहस्पतींना विनवून आणण्याचा प्रयत्न केला, मात्र देवेंद्रला पाहताच, बृहस्पती आपल्या तपोबलाने अंतर्धान पावले. इंद्रदेव निराश होऊन परतले.

देवगुरू देव-दैत्त्यांच्या संघर्षात आपल्या तपोबलाद्वारे देवांचे बल वाढवून रक्षण करीत असत. मात्र आता तेच नसल्यामुळे, देवांचे बल क्षीण झाले. मदतीसाठी देव ब्रह्मदेवाकडे गेले, तेव्हा प्रथम ब्रह्मदेवांनी इंद्रदेवांची कानउघडणी केली व जोपर्यंत देवगुरू परत येत नाहीत, तोपर्यंत मुनिश्रेष्ठ त्वष्टा विश्वकर्माच्या तीन शीर असलेल्या (त्रिशिरा) विश्वरूप नामक मुलाला पुरोहित करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर मातेकडून ते असूरवंशीय असल्याचेही सूचित केले. विश्वरूप हे आध्यात्मिक व वेदशास्त्र संपन्न असल्याने इंद्रदेवांनी त्यांना यज्ञगुरू केले. एकदा यज्ञकार्यादरम्यान विश्वरूप देवासोबत दैत्त्यानांही आहुती देत असल्याचे लक्षात आल्याने, क्रोधित झालेल्या इंद्रदेवांनी यज्ञ स्थळीच विश्वरूपाचा त्याचे तीनही शीर कापून वध केला.

ब्रह्मदेवाला हे कळताच, विश्वरूपच्या हत्तेमुळे इंद्रदेवाला ब्रह्महत्तेचे पातक लागल्याने, इंद्रपदावर राहण्याचाही अधिकार नसल्याचे त्यांनी मतप्रदर्शन केले. आता तरी बृहस्पतीलाच शरण जाण्याचा व त्यांना परत आणण्याचा सल्ला इंद्रदेवांना दिला. मात्र आपण तोही प्रयत्न केला, मात्र आपल्याला पाहताच, बृहस्पती अंतर्धान पावल्याचे इंद्रदेव म्हणाले. मात्र यज्ञाच्याच ठिकाणी केलेल्या या ब्रह्म हत्तेमुळे सर्व देव ऋषी-मुनी आदींनी इंद्रदेवाची निर्भत्सना केली. त्यामुळे इंद्रदेव अधिकच खिन्न व दुःखी झाले.

त्वष्टा विश्वकर्मांना जेव्हा आपल्या मुलाच्या (त्रिशिराच्या) हत्तेची बातमी कळली, तेव्हा ते अतिशय क्रोधायमान झाले. त्यांनी इंद्रदेवांच्या नाशासाठी त्वरित यज्ञ आरंभ केला व यज्ञ समाप्तीनंतर यज्ञातून एक विशालकाय दैत्त्य प्रकट झाला. विश्वकर्मांनी त्याचे नामकरण वृत्रासूर करून, त्यास प्रथम ब्रह्मदेवाची आराधना करून वर प्राप्त करण्याची व त्यानंतर इंद्रासह सर्व देवांचा नाश करण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे वृत्रासूर प्रथम ब्रह्मदेवाची तपश्चर्या करण्यास गेला. त्याने केलेल्या घोर तपश्चर्येमुळे प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा आपणास लोखंडाच्या किंवा लाकडाच्या कडक अथवा नरम अशा कोणत्याही शास्त्राने मृत्यू येऊ नये, असा वर मागितला. ब्रह्मदेवाने तथास्तू म्हणून वर दिला. तेव्हा वृत्रासूर आपण अजिंक्य झालो, या आनंदात वेगाने इंद्र लोकावर चालून जाऊन विध्वंस व संहार करू लागला. तेव्हा इंद्रदेव विष्णूकडे गेले व प्राणरक्षणासाठी प्रार्थना करू लागले.

तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, मी स्वतः ब्रह्मदेव किंवा महादेव यापैकी कोणीही तुला या संकटातून वाचवू शकत नाही. तुला केवळ एकच व्यक्ती व ती म्हणजे भूलोकावरील महर्षी दधीचि ऋषीच यापासून वाचवू शकतात. त्यांनी जर आपली हाडे तुला दिली, तर त्यापासून शस्त्र बनवून, त्याद्वारे तू वृत्रासूराचा वध करू शकतो, असे सांगितले. त्याप्रमाणे इंद्रदेव महर्षी दधीचिकडे जाऊन वृत्त कथन केले. तेव्हा माझ्या देहदानानी जर पूर्ण देव लोकांचे संकट टळून भले होत असेल, तर मी त्यासाठी तयार आहे, असे म्हणून योगमायेने देहत्याग करून अस्थीरूप झाले. त्या अस्थीपासून वज्र बनवून इंद्राने वृत्रासूराला ललकारून त्याचा वध केला. अशाप्रकारे दधीचि ऋषींनी देव कल्याणासाठी प्राणाची आहुती दिली. भाद्रपद शुक्ल अष्टमीला महर्षी दधीचि जयंती साजरी केली जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -