
पुण्यात धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच
पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे (Pune crime) प्रमाण चिंताजनक झाले असतानाच आता आणखी एक धक्कादायक बातमी पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील अंगणवाडीतील (Anganvadi) लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात (Nutrition food) अळ्या आणि उंदराच्या लेंड्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील जनता वसाहतीमध्ये (Janta Vasahat) हा प्रकार घडला आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारचा पोषण आहार देऊन सरकार (Maharashtra Government) मुलांच्या जीवाळी खेळ करत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.
पुण्यातल्या जनता वसाहतमधील पान आळीमध्ये एकात्मिक बाल योजना अंतर्गत अंगणवाडीमधील मुलांना देण्यात येणाऱ्या कडधान्यात अळया आणि उंदराच्या लेंड्या सापडल्या. राष्ट्रवादीच्या काँग्रेस रिक्षा संघटनाचे अध्यक्ष संदिप काळे यांनी हा सर्वप्रकार उघडकीस आणला. एकात्मिक बाल योजना ही महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत येते. वाटप करणाऱ्या प्रशासकीय अधिकारीने पाकीट फोडल्यानंतर पहिल्याच पाकिटात अळया आणि उंदरांच्या लेंड्या आढळून आल्या.
शालेय विद्यार्थ्यांना शाळेसोबत शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी पुरवण्यात येणाऱ्या आहारातील माल निकृष्ट दर्जाचा असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप केला जात आहे. पोषण आहारामध्ये आळ्या आणि उंदरांच्या लेंड्या आढळल्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय पोषण आहाराच्या धान्याला किड लागल्याचा प्रकार २५ जूनला समोर आला होता. खेड तालुक्यातील बहुळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हा प्रकार घडला होता. शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदूळ, मटकी, मूगडाळ यांना किडे आणि आळ्या लागल्याचे समोर आले होते. स्थानिक ग्रामस्थांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर पुन्हा आता अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे प्रशासन यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.