निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
शेतकरी खिन्न अवस्थेत आकाशाकडे टक लावून पाहत आहे. या वर्षी तरी पाऊस पडेल का? …आणि एक दिवस त्याला पावशा पक्ष्याचा आवाज येतो. पेरते व्हा, पेरते व्हा आणि मग शेतकरी आनंदाने आपल्या कामाला लागतो. हा आपला मानवी आनंद. जो आपलं जीवन जगण्यासाठी पूरक आहे. कोण देतं? ही पंचतत्त्व आणि याचे संकेत कोण देतं, तर या जीवसृष्टीतील अगदी लहानात लहान घटकसुद्धा. अगदी मानवनिर्मित हवामान खाते सांगण्याआधीच.
या पूर्वीच्या लेखात मी पक्ष्यांची माहिती दिली होती की, पक्षी आपल्याला पावसाचे संकेत कसे देतात आणि कोणते पक्षी देतात? कावळा, पावशा, टिटवी असे अनेक पक्षी. घरटी किती उंच आणि मजबूत फांदींवर बांधतात यावरून पावसाचे संकेत समजतात. कोणती वाईट घटना घडणार असेल, तरीही आपल्याला पशुपक्षी, कीटक अगदी वनस्पतीसुद्धा याचे संकेत देतात. कावळा घरटे कोणत्या दिशेने आणि किती उंचावर बांधतो यावर पावसाचे प्रमाण आपल्याला समजते. जसे काटेरी झुडपांवर घरटे केले, तर समजावे पाऊस कमी येणार आणि आंब्यासारख्या वृक्षांवर केले, तर समजावे पाऊस चांगला येणार. पश्चिमेला केले तर पाऊस जेमतेम आणि पूर्वेला केले तर पाऊस चांगला पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस कमी पडणार आणि झाडाच्या टोकावर केले, तर दुष्काळ पडणार. वादळी पक्षी जर किनाऱ्याकडे येत असेल, तर समुद्रात वादळ येणार, हे नक्की. उधई म्हणजेच वाळवी. पाऊस पडणार असेल, तेव्हाच पंख फुटलेली उधई एकमेकांशी संबंध ठेवतात आणि आपल्याला उडताना दिसतात. पावसाळ्यापूर्वी सापसुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसायला लागतात. कारण त्यांच्या बिळात पावसाचे पाणी येणार, त्यासाठी ते त्यांच्या सुरक्षित जागा शोधायला जातात.
आपल्याला मुंग्यासुद्धा तोंडात अंडी सुरक्षित जागी घेऊन जाताना दिसायला लागतात. तसं समुद्राच्या दिशेने जाणारे असंख्य खेकडे दिसतात. वेलीचे तंतू सरळ रेषेत उभे राहताना दिसले, तर चांगल्या पावसाचे लक्षण समजावे. वेलींना आवश्यक असणारा जलस्रोत मिळणार, यामुळेच वेलीचे तंतू आकाशाच्या दिशेने सरळ रेषेत येतात. बिचूल आणि कुटजाचा बहर अतिवृष्टी, कवठाच्या फुलांचा बहर वादळ-वारा, खैर आणि शमीचा फुलोरा आला म्हणजे कमी पाऊस, तर बिब्याच्या झाडांचा बहर म्हणजे दुष्काळाचे संकेत. असे संकेत हे वनस्पतीसुद्धा आपल्याला देत असतात. काटेरी वनस्पती या कमी पाण्यात सुद्धा चांगल्या पद्धतीने जिवंत राहू शकतात. म्हणूनच यांचा बहर म्हणजे दुष्काळाचे प्रतीक असते.
पाऊस येणार नसेल, तर हरणसुद्धा तिच्या पिल्लांना जन्म देत नाही, विणीचा काळ असला तरी. असे ऐकण्यात आहे की, एका गरोदर वाघिणीने तिचा गर्भपात डायसकोरियाचे कंद खाऊन केला. याचे कारण जर दुष्काळ पडला, तर गवत उगवणार नाही. म्हणजेच तृणभक्षी प्राणीसुद्धा राहणार नाही. खरंच यांचे सृष्टी ज्ञान हे अतिशय अद्भुत आहे.
चुंबकीय क्षेत्रातील बदल, पृथ्वीच्या कवचातून वायू बाहेर पडणे, जमिनीखालील कंपन, हवामानातील बदल या गोष्टींमुळे पशुपक्षी, कीटक, वनस्पती यांना जाणीव होत असते; परंतु माझ्या मते, आपल्यापर्यंत ज्या आवाजाच्या लहरी पोहोचू शकत नाहीत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात. भूकंपाच्या आधी काही आठवडे किंवा काही सेकंदापूर्वी प्राणी, पक्षी, कीटक हे आपल्या वास्तव्यापासून दूर जायला लागतात. जर भूकंप येणार असेल, तर पक्षी आकाशात उंच उडायला लागतात, कुत्रे भुंकायला लागतात, मांजरी जास्त प्रमाणात ओरडतात त्यांच्या वागण्यात बदल होतो. त्यांच्यामुळे जागेपासून दूर जातात किंवा कुठे तरी लपण्याचा प्रयत्न करतात. पक्षी अगदी शांत होतात किंवा खूप कलकलाट करतात आणि आकाशात झुंडीने उडतात. पाण्यातील मासे पाण्याबाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, तर कधी-कधी विचित्रपणे सुद्धा पोहतात. जमिनीखाली होणाऱ्या हालचाली या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाटा निर्माण करतात. ज्याच्या संवेदना उंदीर, सरपटणारे सापासारखे प्राणी यांना लगेच समजतात; परंतु सर्वसामान्यपणे निसर्गातील हा बदल या जीवांना आधी कळतो. शिवाय वृक्ष-वनस्पतींमध्ये सुद्धा जे कंपन होते, त्याचे आकलन पक्ष्यांना लगेच होते. आपल्याला वनस्पतींमध्ये होणाऱ्या संवेदना मुळीच समजत नाहीत.
आपल्यासाठी अदृश्य स्वरूपात असणारे हे बदल वनस्पती, पशू-पक्ष्यांना लगेच समजतात. शास्त्रज्ञांच्या मते, कोळी हा अत्यंत संवेदनशील असतो. का? माझ्या मते, या जगातील सर्वात हलकं कोळ्याचं जाळं असतं. त्यामुळे येणाऱ्या लहरींमुळे कोळ्याच्या जाळ्यात होणारा बदल कोळ्याला सहज समजत असावा. प्रत्येकाला स्पंदन समजण्यासाठी परमेश्वरी रचना वेगवेगळ्या आहेत. जसं मधमाशांना त्यांच्या अँटिनाद्वारे स्पंदन कळतात, सापांमध्ये पीट ऑर्गन्स नावाचा एक अवयव असतो ज्यातून त्याला जमिनीखालील स्पंदन कळतात, मुंग्यांना त्यांच्या पायाद्वारे, माशांना त्यांच्या पार्श्वरेषांमुळे. शारीरिक अवयवातील वेगवेगळे अवयव हे संवेदनात्मक आहेत, यांचा संबंध थेट निसर्गाशी असल्यामुळे, हे खूपच संवेदनशील आहेत.
ऋतुमानानुसार येणारा फुलांचा, फळांचा बहर हा सजीवसृष्टीतील प्रत्येक घटकासाठी त्या ऋतूतील एक औषध असते, जे ऋतुमानानुसार होणाऱ्या परिणामाला आवश्यक असते. पावसाळ्यात येणाऱ्या वनस्पती या पावसाळ्यात होणाऱ्या आजारांवर औषधरूपाचे काम करतात. परमेश्वराने सुदृढ पंचतत्त्वाच्या नैसर्गिक सुदृढ प्रक्रियेनुसारच या विश्वातील प्रत्येक घटकासाठी त्याच्या आरोग्यासाठी, पुनरुज्जीवनासाठी, संरक्षण आणि संवर्धनासाठी तरतूद केलेली आहे. या जीवसृष्टीतील नैसर्गिक घटकांना याची जाणीव लगेच होते आणि त्याप्रमाणे ते त्यांची जीवनपद्धती अनुकूल करतात.
हवामान बदलानुसार पक्षी, प्राणी, कीटक, वनस्पती अगदी मानवसुद्धा स्थलांतर करीत असतात; परंतु आता झालेल्या प्रदूषणामुळे या पंचतत्त्वात जो काही बदल झाला आहे, त्याचा परिणाम या स्थलांतरित सजीवसृष्टीवर सुद्धा होत आहे.
मानवापेक्षा इतर सजीवसृष्टीतील घटक हे प्रजनन आणि अन्न या गोष्टीसाठी स्थलांतरित होत असतात; परंतु याच गोष्टी जर त्यांना पूरक नसतील, तर ते स्थलांतरित होऊन काय उपयोग? त्यामुळेच अनेक घटक नामशेष होत आहेत. जर जागतिक तापमानात बदल झाला, तर वनराई राहील का आणि त्यातील नैसर्गिक घटकांचं काय? अतिउष्णता वाढल्यामुळे नैसर्गिकरीत्या वणवा हा पेटणारच. परिणामी पशुपक्षी, कीटक, वनस्पती संख्या कमी होणारच. या ग्लोबल वार्मिंगचे सतत आपल्याला संकेत देणारे, हे जीव या ग्लोबल वॉर्मिंगमुळे यांनाच आपला जीव गमवावा लागत आहे आणि बरेच नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत, तरीही मानवाने जर याची दखल घेतली नाही आणि यावरचा योग्य मार्ग निवडून त्यावर लवकर कार्य केले नाही, तर मानवाची सुद्धा हीच अवस्था होणार आहे. ज्योतिष शास्त्रात नक्षत्रानुसार त्याचे वाहन असते आणि ही वाहने पशू-पक्ष्यांचीच असतात. पशू-पक्ष्यांच्या जीवनपद्धती प्रमाणे पाऊस कमी-जास्त प्रमाणात होणार आहे, याचे काही अनुमान ठरलेले असते. जसे बेडूक असेल तर पाऊस भरपूर पडणार, मेंढा असेल तर पाऊस कमी पडणार, हत्ती-मोर असेल तर पाऊस बऱ्यापैकी पडणार. कधी कधी हे अनुमान चुकू शकते आणि याचे कारणसुद्धा ग्लोबल वॉर्मिंगच आहे.
नैसर्गिक प्रक्रियेची असंतुलनता या सर्वांना कशा कळतात? तर माझ्या या सृष्टी संशोधनानुसार पंचतत्त्व असंतुलन प्रक्रिया ही सर्वात प्रथम या भूमीला पूर्णपणे ज्ञात होते. या भूमीशी निगडित असणारे सर्व घटक यांना हे समजतेच. वनस्पती-पक्षी-कीटक-पशू आणि शेवटी मानव. निसर्गाच्या सर्वात जवळचा घटक म्हणजे वनस्पती. वनस्पतींना संबंधित असणारे घटक म्हणजे कीटक आणि पक्षी. यांचे सहावे इंद्रिय हे जास्त जागृत अवस्थेत असते. जर आपण ध्यानधारणा केली आणि निसर्गाशी अत्यंत जवळ असलो, तर निसर्गातील बदल हा आपल्याला आपल्या शारीरिक परिणामांवर जाणवतोच, हा माझा अनुभव आहे. याचाच अर्थ तुम्ही निसर्गाच्या किती जवळ आहात, किती एकरूप आहात यावर या सर्व प्रक्रियांचा परिणाम हा होत असतो. साहजिकच आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा निसर्गाशी किती संबंधित आहे, हे मानवाला नक्कीच समजायला पाहिजे. आपल्या सर्वच चुका सर्वच सजीवसृष्टीसाठी घातक आहेत. हे पक्षी बऱ्याचदा ध्यानमुद्रेत बसलेले आपल्याला दिसतात. हे पंचतत्त्वांशी पूर्णपणे निगडित असतात. निसर्गातील प्रत्येक घटकांच्या वेदना, त्यांचा आनंद समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यांच्यातील क्षमता ही वाखाणण्यासारखी असते आणि ही क्षमता आपल्यात केव्हा निर्माण होते, जेव्हा आपण निसर्गमय होतो तेव्हाच आणि म्हणूनच मानवामध्ये ही क्षमता नाही आणि ही क्षमता वाढवायची असेल तर आपल्याला ध्यान-धारणा करण्याची, निसर्गाशी जवळीक करण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि हाच या ग्लोबल वॉर्मिंगचा उपचारात्मक उपाय आहे.