Sunday, July 14, 2024
Homeसाप्ताहिककोलाजचिटणीस दाम्पत्याचा साहित्यिक प्रवास

चिटणीस दाम्पत्याचा साहित्यिक प्रवास

शैक्षणिक क्षेत्रात अतिशय महत्त्वाचे कार्य या आदर्श दाम्पत्याच्या हातून घडले. एकंदरीत काव्य आणि साहित्य यांचा हा ‘दाम्पत्य’ प्रवास सुखद मनोहारी आणि स्तिमित करणारा आहे. वय वाढते; पण प्रतिभा फुलत-खुलत राहते हेच खरे.

नक्षत्रांचे देणे – डॉ. विजया वाड

शैक्षणिक क्षेत्रात चिटणीस (अशोक आणि डॉ. शुभा चिटणीस) दाम्पत्य किती तरी नागरिकांना ज्ञात आहे. उभयतांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान वादातीत आहे. त्यांचा साहित्यिक प्रवासही लक्षणीय, वेधक आणि अत्युत्तम आहे. अशोक कोठावळे, अशोक मुळे, कौतुक मुळे अशा नामवंत प्रकाशकांनी त्यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. ‘तन्वीचे आभाळ’ हे डॉ. शुभा चिटणीस यांचे पुस्तक. फार सुरेख शब्दचित्र रेखाटले आहे. शुभा चिटणीस यांनी, की बात ही कुछ और है! तन्वी हर्बल कोणास ठाऊक नाही? स्वत: मुख्यमंत्र्यांनी पुस्तकास शुभेच्छा दिल्या आहेत. आकाश विरभ्र असते; पण आभाळ गच्च असते. तन्वीच्या आभाळामधून आरोग्याच्या धारा बरसत असतात. मेधा मेहेंदळे यांचे चरित्र अतिशय बोलके उतरले आहे की, ते त्यांचे एकटीचे चरित्र न राहता, साऱ्या मेहेंदळे परिवाराने तोलून धरलेले आहे.

सर्वश्री अशोक आणि कौतुक मुळे या परिवाराने मोठ्या ‘ष्टाईल’मध्ये हे चरित्र प्रकाशित केले आहे. आयुर्वेदाच्या आभाळाला कवेत घेण्याचे डॉ. शुभाताईंचे काम मोठे आहे, यात शंका नाही. वैद्यकीय क्षेत्रात दुष्ट स्पर्धा चालू असताना, ‘तन्वी’ सर्वांना पुरून उरली आहे. मेधाचे अवघे कुटुंब तिच्या यशस्वितेमागे खंबीरपणे उभे राहिले, हे तिचे सद्भाग्य. पतीच्या सुरुवातीच्या विरोधास प्रयत्नांनी मेधाताईंनी मोडून काढले. अर्थात हा ‘प्रवास’ पत्नीच्या मानसिक आधारावर त्रास देणारा ठरू नये, एवढीच पतिराजांची इच्छा होती. ती सात्त्विक, आरोग्यदायी, निरपेक्ष होती. प्रामाणिक होती; पण पत्नीचे प्रयत्न बघून, पतीने मग सहकाराचा हात पुढे केला. बात बन गयी! शुभाताईंनी अतिशय बोलके पुस्तक वाचकांच्या हाती दिले आहे. तन्वी हर्बल चिरायू व्हावे, अशा शुभेच्छा अशोक समेळ यांनी दिल्या आहेत. पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे.

अशोक चिटणीस यांची २ पुस्तके आता प्रकाशित झाली आहेत. मी गोव्याला गेले होते, तेव्हा सरही सपत्निक सफरीवर आले होते. त्यांच्या बॅगा पायलटने स्वत: विमानात ठेवल्या. मला आश्चर्य वाटले. पायलटने सर आणि बाई यांना वाकून नमस्कार केला. “माझा विद्यार्थी” सर सहजपणे म्हणाले. खरंच शिक्षकीपेशा हा आदर्शपेशा खराच!

‘थोरा-मोठ्यांच्या गाठीभेटी’ हे सरांचे अत्यंत वाचनीय पुस्तक. मा. अटलबिहारी वाजपेयी, मनोहर जोशी, मा. बाळासाहेब, सर्वश्री मंगेश पाडगावकर अशी ९ नामवंत व्यक्तिमत्त्वे या सुंदर पुस्तकाचा साज आहेत. पुस्तकातील आठवणी जिवंत स्वरूपाच्या आहेत. अशोक चिटणीस यांनी त्या अक्षरश: जिवंत केल्या आहेत. गेली साठ वर्षे अशोक सर लिहीत आहेत, अव्याहत. अनेक पुरस्कार मिळाले, त्याला गणती नाही. गर्वभार इवलासाही नाही. नम्रता, सत्यप्रियता, शिक्षण आणि शिकविणे यांसाठीची तळमळ, शैलीदार लेखन, किती गुण वर्णावे? थोरामोठ्यांच्या गाठीभेटी हा एक अत्यंत बोलका, वाचनीय अनुभव आहे.

आर्त काव्याविष्कार म्हणजे ‘अद्वैत’ हा कवितासंग्रह. उत्कटता, प्रेमलता, कवित्व या साऱ्यांचे मनोज्ञ दर्शन म्हणजे ‘अद्वैत.’ लेखक कवीमनाचा असतो, याचा मूर्त आविष्कार म्हणजे अद्वैत. यातील ‘कलासक्त’, ‘तू’ ,‘पारोशी’ या कविता उत्कृष्टतेचा, आर्ततेचा आविष्कार आहेत. अव्यक्ताला व्यक्त करू पाहणारा, हा शब्द-अर्थ प्रवास स्तिमित करणारा आहे.
उत्कट निसर्गरूपे, सामाजिक जाणीव, काव्यात्म हळवेपणा, सामाजिक दडपणाचा मनास असलेला धाक, मुग्ध प्रीतीचे सुंदर आविष्करण किती गुण वर्णावे? ‘आवरावे पसारे’ विरक्तीची जाण करून देतात.

एकंदरीत काव्य आणि साहित्य यांचा हा ‘दाम्पत्य’ प्रवास सुखद मनोहारी आणि स्तिमित करणारा आहे. वय वाढते, पण प्रतिभा फुलत, खुलत राहते हेच खरे.

शैक्षणिक क्षेत्रात अतिशय महत्त्वाचे कार्य या आदर्श दाम्पत्याच्या हातून घडले. जगभर त्यांचे विद्यार्थी पसरले आहेत. परदेशात स्थिरावले आहेत; पण या सरल, साध्या, निरंकारी स्वभावाच्या शिक्षकाबद्दल त्यांच्या मनात अपार आदर आहे. मी तो प्रत्यक्ष अनुभवला आहे. शिकवितो तो शिक्षक, पण जीवनशिक्षण देतो तो विद्येचा खरा उपासक. ही शिक्षकाची व्याख्या असेल, तर ती या जोडीस ‘सार्थ’ लागू आहे.

अवश्य वाचा ही या जोडीची तीन पुस्तके. समृद्ध व्हाल वाचकांनो. समृद्ध होता होता श्रीमंतही व्हाल. हे नक्की!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -