Thursday, July 3, 2025

Belapur News : बेलापूर गावात भाजपाचा विकास कामाचा पाहणी दौरा!

Belapur News : बेलापूर गावात भाजपाचा विकास कामाचा पाहणी दौरा!

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी विरोधी पक्षनेता पंढरीनाथ पाटील, शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता अजय पाटील, कनिष्ठ अभियंता राजेश पाटील, विभागीय सहा.आयुक्त. शशिकांत तांडेल व संबंधित अधिकारी तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते.


स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार बेलापूर गावाचा विकास व्हावा याकरिता आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी “विशेष तरतूद” अंतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावाच्या विकासाकरिता तब्बल २० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या अनुषंगाने बेलापूर गावात क्रीडा संकुल उभारणे व समाजपयोगी विकास कामे होणार आहेत. तसेच ५ मजली बहुद्देशीय इमारतीमध्ये मल्टीलेवल कार पार्किंग, भाजी मार्केट, व्यायाम शाळा, ग्रंथालय, बॅटमिंटन कोर्ट, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र अशा अनेक विविध प्रकारच्या सोयी सुविधा या इमारतीमध्ये नागरिकांना उपलब्ध करून मिळणार आहे.


या पाहणी दौऱ्याच्या माध्यमातून आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना सूचित केले की, प्रभू श्री राम जन्म उत्सवाकरिता भूखंड मिळावा तसेच सदराचा परिसर सुशोभीकरण करणे अशा अनेक विविध सोयी सुविधा उपलब्ध होणार असून बेलापूर गाव हा स्मार्ट व्हिलेजकडे वाटचाल करणार आहे असे प्रतिपादन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केले. या पावसाळयामध्ये संपूर्ण नवी मुंबईतील २९ गावातील जे नाले, गटार आहेत, ते तुडुंब भरून जाऊ नये म्हणून या प्रथमतः लक्ष दिले गेले पाहिजे अशा सुचना आ.म्हात्रे यांनी उपस्थित असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Comments
Add Comment