हव्या हव्याचा हव्यास…

Share

संवाद – गुरुनाथ तेंडुलकर

जगप्रसिद्ध रशिअन लेखक लिओ टॉलस्टॉयने लिहिलेली एक कथा आहे.
हाऊ मज लँड अ मॅन नीड्स?

मराठीत या कथेची अनेक भाषांतरं, रूपांतरं झाली आहेत. एक अत्यंत दरिद्री माणूस राजाच्या दरबारात गेला आणि त्याने राजाजवळ थोडी जमीन मागितली.

राजा म्हणाला, ‘उद्या सकाळी ये. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जेवढं अंतर चालशील तेवढी जमीन तुझ्या मालकीची. अट फक्त एकच. वर्तुळ पूर्ण व्हायला हवं. सकाळी जिथून चालायला सुरुवात करशील त्या ठिकाणी संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत परतायला हवं.’

दुसरे दिवशी तो दरिद्री माणूस सूर्योदयाच्या आधीच हजर झाला. सूर्योदय झाला आणि त्या माणसाने चालायला, नव्हे धावायला सुरुवात केली. धावता धावता तो बराच दूर गेला. सकाळची कोवळी उन्हं आता माथ्यावर आली. त्या माणसाच्या अंगातून घामाच्या धारा निथळू लागल्या. पोटात भुकेचा आगडोंब उसळला. जरासं थांबावं, भाकरतुकडा खाऊन घोटभर पाणी प्यावं, घटकाभर विश्रांती घ्यावी असा विचार त्याच्या मनात क्षणभर चमकला. पण…!

पण पुढच्याच क्षणी त्याने तो विचार झटकून टाकला अन् आणखीनच जोराने धावायला सुरुवात केली. प्रत्येकक्षण महत्त्वाचा होता. जेवढे जास्त धावू तेवढी अधिक जमीन मिळणार होती. तो माणूस धावतच राहिला. पुढे… पुढे… आणि अचानक त्याच्या ध्यानात आलं की, त्याची सावली लांब झालीये. माथ्यावरचा सूर्य पश्चिमेला कललाय. आता माघारी फिरायला हवं. फिरून राजवाड्याजवळ पोहचून वर्तुळ पूर्ण करायला हवं. तो माघारी वळला आणि जीवाच्या आकांतानं राजवाड्याच्या दिशेने धावायला सुरुवात केली. पण आता पायातलं त्राण संपले होते. श्वास धपापू लागला होता. घसा कोरडा पडत चालला होता. राजवाडा तर फारच दूर राहिला होता. आणि अचानक त्याला चक्कर आली. छाती फुटून
रक्ताची उलटी झाली. तो माणूस खाली कोसळला. पडला. मेला…!

ज्यावेळी त्या माणसाचं प्रेत पुरण्यासाठी खड्डा खणला त्यावेळी राजा म्हणाला, ‘कितीशी जमीन लागते माणसाला? सहा फूट लांब आणि तीन फूट रुंद. बस्स शेवटी एवढ्याच जमिनीची आवश्यकता असते.’ लिओ टॉलस्टॉय या जगप्रसिद्ध रशिअन लेखकाची ही गोष्ट, हाऊ मज लँड अ मॅन नीड्स? ही गोष्ट तुम्ही नक्की ऐकली वाचली असेल.

आज ही गोष्ट मला पुन्हा नव्यानं आठवली कारण… गेल्या आठवड्यात माझ्या ओळखीतलं एक जोडपं आमच्या घरी आलं होतं. नवरा एका मोठ्या कंपनीत डायरेक्टर. बायको एका फॉरिन बँकेत व्हाइस प्रेसिंडेंटच्या हुद्यावर. दोघांचा मिळून पगार साधारण महिन्याला पंचवीस तीस लाख रुपये. घरात सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा. पण एवढा पैसा असूनही त्या जोडप्याला मूल-बाळ नाहीये. नवरा-बायको दोघंही करिअर माईंडेड आहेत. दोघेही आपापल्या कामात सतत व्यग्र…!
लग्नानंतर सुरुवातीला पहिली पाच वर्षं सेटल होईपर्यंत ‘मूल नको’ हा निर्णय दोघांनीही परस्परांच्या अनुमतीने घेतला होता. त्यानंतर दोघं आपापल्या कामात एवढे बिझी झाले की मूल टाळण्यासाठी अनेक कारणं समोर आली. या वर्षी नको. या वर्षी प्रमोशन ड्यू आहे. इतक्यात नको… यावर्षी सिंगापूरला डिलर कॉन्फरन्स आहे. तिची तयारी करायला हवी… ‘इतक्यात नको… इतक्यात नको…’ म्हणता म्हणता वर्षं उलटत गेली.

ते गृहस्थ ऑफिसच्या कामात एवढे बिझी होते की मुलाबद्दल विचार करायला देखील वेळ नव्हता. इंक्रिमेट, प्रमोशन्स, नव्या नव्या असाइनमेंटस्, नवीन नवीन प्रोजेक्टस्. त्या बाईंच्या बाबतीतही हाच प्रकार होता. बिझनेस डेव्हलपमेंट, फॉरिन टूर्स, मिटिंग्ज् आणि पार्ट्या… मुलाबद्दल विचार करायला देखील सवड नव्हती.

दोघांच्याही पगाराचा आकडा वाढतच होता. गाड्यांची संख्या आणि गाड्यांची लांबी वाढतच होती. इसॉपचे शेअर्स मिळतच होते. गुंतवणूक वाढत होती. लग्न झालं त्यावेळी वन रूम किचन, पुढे टू रूम किचन… करता करता त्यांनी आठ बेडरूमच्या अालिशान पेंटहाऊसपर्यंत मजल मारली आणि… अचानक एक दिवस त्यांना जाणीव झाली की हे एवढं सारं मिळवलं पण कुणासाठी? हे जे आपण मिळवलं त्याचा उपयोग करणारं आणि उपभोग घेणारं पुढे कुणीच नाहीये.

दोघांनीही डॉक्टरांकडे धाव घेतली. तोवर ते गृहस्थ साठीच्या जवळ आले होते. त्या बाईंनीदेखील वयाची पन्नाशी पार केली होती. डॉक्टरांनी तपासण्या करून स्पष्टपणे सांगितलं , ‘आता स्वतःचं मूल होणं शक्य नाही. ती वेळ केव्हाच टळून गेलीये. किंबहुना कामाच्या ताणामुळे आणि सततच्या धावपळीमुळे त्या बाईंची मासिक पाळी वयाच्या पस्तिशीतच गेली होती.’ आता एकच उपाय होता तो म्हणजे अॅडॉप्शन. मूल दत्तक घेणं…!

आणि त्याच कामाच्या निमित्तानं हे नवरा-बायको आमच्या घरी आले होते. माझी काही सामाजिक संस्थांमध्ये ओळख आहे. काही आश्रमाचे संचालक माझ्या परिचयाचे आहेत हे ठाऊक असल्याने हे पती-पत्नी मला भेटायला आले होते. मी त्यांची सगळी माहिती ऐकून – नोंदवून घेतली. दोघांचं वय, शिक्षण, उत्पन्न, नोकरीचे पत्ते, राहण्याचं ठिकाण, इतर माहिती वगैरे नोंदवून मी दोन दिवसांत कळवतो असं सांगितलं. आमच्या घरून निघताना त्या बाईंच्या डोळ्यांत पाणी
आलं होतं,

‘सर, प्लीज काहीतरी करा हो… कोट्यवधी रुपयांची दौलत कमावलीये. घरात सगळं सगळं आहे. फक्त…’ बोलता बोलता त्यांच्या दबलेला हुंदका बाहेर पडलाच. मी कामाला लागलो. श्रद्धानंद महिलाश्रम, होली फॅमिली, बाल आशा ट्रस्ट, विसावा, आश्रय, आधार, वात्सल्य अनेक आश्रमात चौकशी केली. केवळ मुंबईतच नव्हे तर अगदी पुण्याला, नागपूरला, सोलापूरला देखील चौकशी केली. माझे काही मित्र कलकत्याला आहेत त्यांच्यामार्फत मदर टेरेसा आश्रमातही संपर्क साधला… पण… पण सगळीकडून एकच उत्तर आलं. `बराच उशीर झालाय…!’

मूल कायदेशीर दत्तक घेताना सरकारी नियमानुसार नवरा-बायको दोघांच्या वयाची बेरीज नव्वदहून अधिक असता कामा नये. या नियमानुसार त्या दोघांचं ‘वय’ उलटून गेलं होतं… मूल होण्याचं नैसर्गिक वय तर कधीच उलटलं होतं. आता तर मूल दत्तक घेण्याचं वय देखील उलटून गेलं होतं.

अत्यंत जड अंतःकरणाने मी त्यांना फोन केला आणि ‘सॉरी’ म्हणालो. त्यांच्या पत्नीशी तर बोलण्याचं धैर्यच माझ्यात नव्हतं. मला स्वतःलादेखील खूप वाईट वाटलं आणि त्या पती-पत्नीचा विचार करतानाच मला लिओ टॉलस्टॉयची `हाउ मज लँड अ मॅन नीडस्?’ ही कथा आठवली. कथेतला तो दरिद्री माणूस अधिक जमिनीच्या आशेनं धाव धाव धावला अन् शेवटी धावता धावता उरीपोटी फुटून मेला.

आज मला अधिकाधिक जमीन मिळवण्यासाठी धावणाऱ्या त्या दरिद्री माणसाच्या जागी एका कंपनीचे डायरेक्टर असलेले, सुटाबुटात वावरणारे, परदेशी गाड्यांतून हिंडणारे ते गृहस्थ दिसले. आजवर आम्ही आमच्या नातेवाइकांत, मित्रांत त्या कुटुंबाबद्दल बोलताना मोठ्या कौतुकानं बोलत होतो. क्वचित त्यांचा हेवाही करीत होतो पण आज मात्र… आज मात्र मला त्या साहेबांची दया आली. त्यांच्या पत्नीचे शब्द पुन्हा आठवले.

‘घरात सगळं सगळं आहे हो. फक्त…’ त्याक्षणी हा ‘फक्त’ त्या सगळ्या असण्याहूनही महत्त्वाचा होता. जरा विचार करा की माणसाला सुखाने जगण्यासाठी काय काय लागतं? किती पैसा लागतो? घर किती खोल्यांचं असलं की संसार सुखाचा होतो? सोन्यासारखं आयुष्य जगण्यासाठी किती किलो सोन्याची गरज असते? या सोन्यावरून मला एकदम आठवला तो पॉप सिंगर डान्सर मायकल जॅक्सन.

या मायकल जॅक्सनने साडेसातशे कोटी डॉलर खर्चून अडीच हजार एकर जमिनीवर एक अालिशान महाल बांधला होता. लाख कोटी नव्हे तर अगदी अब्जावधी रुपये नव्हे डॉलर्स कमावले आणि उडवले. १९८८ साली लंडनच्या टाइम्सनं मायकल जॅक्सनच्या संपत्तीचं वर्णन करताना लिहिलं होतं की, त्याची संपत्ती त्याच्या वजनाच्या सहाशे पट सोन्याच्या किमती एवढी आहे. त्यावेळी मायकलचं वजन होतं साठ किलो. साठ गुणिले सहाशे म्हणजे छत्तीस हजार किलो सोन्याच्या किमती एवढी संपत्ती. एवढी प्रचंड संपत्ती कमावलेला हा मायकल जॅक्सन वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी मेला. तो मेल्यानंतर त्याचं शवविच्छेदन झालं. त्यात काय सापडलं ठाऊक आहे?

शवविच्छेद करणाऱ्या डॉक्टरांना त्याच्या पोटात निरनिराळ्या औषधांच्या न विरघळलेल्या चौवीस गोळ्या सापडल्या पण अन्नाचा मात्र एक कणदेखील सापडला नाही. मरण्याच्या आधी मायकल जॅक्सन कित्तेक दिवस म्हणे जेवतच नव्हता. केवळ औषधांच्या गोळ्या घेऊन जगत होता. काय उपयोग झाला त्याच्या प्रचंड पैशाचा? पैसा असूनही सुख नसलेले अनेक उदाहणं आपण पाहतो.

पण याचा अर्थ असाही नव्हे की कोणी पैसे कमावू नयेत. पैसे जरूर कमावावे. अगदी भरपूर कमावावे. संपत्ती निर्माण करून त्या संपत्तीच्या सहाय्यानं आपली अधिकाधिक प्रगती करीत राहावं असं आपल्या भारतीय आध्यात्म विज्ञानानंही सांगितलं आहे. वेदांतातही तसा स्पष्ट उल्लेख आहे. संपत्ती कमावायलाच हवी. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थापैकी अर्थ म्हणजे संपत्ती हा एक महत्त्वाचा पुरुषार्थ आहे. पण… पण हव्या हव्याच्या हव्यासापायी आयुष्यभर केवळ पैशांशिवाय इतर काहीही कमावलं नाही असं स्वतःला वाटू नये याची काळजी घ्यावी.
संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे.

अति तृष्णा न कर्तव्या।
तृष्णा नैव परित्यजेत ।
शनै शनैश्च भोक्तव्यं ।
स्वयं वित्तमुपार्जितम् ।।
अर्थ आहे त्याहून अधिक अधिक मिळवण्याची हाव धरू नये किंवा इच्छांचा संपूर्ण त्यागही करू नये. आपण स्वतः कमावलेल्या संपत्तीचा हळूहळू योग्य प्रकारे उपभोग घेत जावा.

एकात्त्ववेत्याचं वचन आहे, ‘कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता सुवर्णमध्य साधला तरच आयुष्याचं सोनं होतं.’

Recent Posts

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

2 seconds ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

28 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

59 minutes ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

6 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

7 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

7 hours ago