Thursday, July 4, 2024

मदत

पावसाच्या निमित्ताने दोन मुलींमध्ये झालेली आर्थिक विषमतेची दरी दूर झाली. दोघींमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले. संकटग्रस्त किंवा गरजू व्यक्तींना योग्यवेळी केलेली मदत ते कार्य साध्य करते. जर कुणी संकटात असेल तर आपण त्याला मदत केलीच पाहिजे.

कथा – रमेश तांबे

शाळा सुरू झाल्या होत्या. पूर्वाने शाळेसाठी लागणारी सर्व खरेदी मोठ्या हौसेने केली होती. शाळेचा नवा गणवेश, दप्तर, वह्या, पुस्तके, पेन-पेन्सिली, कंपास पेटी अशा अनेक गोष्टी तिने विकत घेतल्या होत्या. त्याशिवाय पावसाळी चपला, एक सुंदर छत्री अन् एक चांगल्या प्रतीचा रंगीबेरंगी भारी भक्कम किमतीचा रेनकोटसुद्धा!

पूर्वाच्या अत्याधुनिक इंटरनॅशनल शाळेशेजारीच एक सरकारी शाळा होती. गरीब मुलं तिथं जायची. दोन मजली रंग उडालेली इमारत. सगळी गरिबाघरची मुलं. कुणाच्या अंगावर शाळेचा गणवेश नाही, तर कोणाच्या पायात चप्पलच नाही. कुणाच्या पाठीवर खाकी रंगाचे जाडे भरडे दप्तर, तर कुणाच्या हातात दप्तर म्हणून धरलेली कापडी पिशवी. एकंदरीत या मुलांची गरिबी त्यांच्या शाळेच्या इमारतीपासून तिथल्या वातावरणात, मुलांच्या वागण्या- बोलण्यातही दिसायची.

एके दिवशी खूप पाऊस पडत होता. पाऊस म्हटला की, पूर्वा खूपच खूश व्हायची. आई पूर्वाला म्हणाली देखील आज खूप पाऊस आहे, नको जाऊ शाळेत! पण पूर्वा हट्टालाच पेटली. “मी शाळेत जाणारच. आपण आणलेल्या छत्री, रेनकोटचा काय उपयोग.” ड्रायव्हर काका आज येणार नव्हते. मग बाबांनीच पूर्वाला घाईघाईने शाळेजवळ सोडले. बाबांना आज एक अत्यंत महत्त्वाची मीटिंग असल्याने ते ऑफिसला लवकर जाणार होते. त्यामुळे वेळेच्या पंधरा मिनिटे आधीच पूर्वा शाळेजवळ पोहोचली. पावसाची रिमझिम सुरूच होती. अजून शाळा उघडली नव्हती. शाळेसमोरच मुलांना उभे राहण्यासाठी एक पत्र्याची शेड होती. बाबांनी पूर्वाला तिथे सोडलं आणि ते निघून गेले. पूर्वाने आपली रंगीत छत्री मोठ्या आनंदाने उघडली अन् पावसाचा आनंद घेत उभी राहिली.

तितक्यात पूर्वाच्याच वयाची एक मुलगी तिथे आली. प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेले दप्तर तिने डोक्यावर घेतले होते. शाळेच्या गणवेशात असलेली ती मुलगी पूर्ण भिजून गेली होती. ती पूर्वाच्याच शेजारी उभी राहिली. तिच्याकडे बघून पूर्वाला आश्चर्यच वाटले. छत्री नाही की रेनकोट नाही. भिजत भिजत ही मुलगी शाळेत येते. तिला दिवसभर थंडी नाही का वाजणार! मग त्या मुलीने प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले तिचे दप्तर उघडून ते भिजले तर नाही ना याची खात्री करून घेतली. पूर्वा त्या मुलीकडे बघत होती. तिचा सावळा रंग, विस्कटलेले, केस, भिजलेला गणवेश, पाऊस असतानाही तिला शाळेत जायची, शिकायची केवढी आवड! पूर्वाचं मन तुलना करू लागलं. त्या मुलीची परिस्थिती किती वेगळी आहे. आपले आई-बाबा आपल्याला हवी ती गोष्ट लगेच आणून देतात. तरीपण आपण किती हट्टीपणा करतो आणि या उलट ती मुलगी! पूर्वाच्या मनात विचारांचं वारं घुमू लागलं होतं.

थोड्या वेळाने पाऊस जरा कमी झाला. ती मुलगी तिथून निघण्याची तयारी करू लागली. तोच पूर्वा त्या मुलीला म्हणाली, “ए मुली थांब जरा.” मग पूर्वाने आपल्या दप्तरातला तो रंगीबेरंगी रेनकोट काढला अन् त्या मुलीच्या हातावर ठेवत म्हणाली, “हा घे रेनकोट, माझ्यातर्फे तुला गिफ्ट!” पूर्वाच्या या कृतीमुळे ती मुलगी जरा बावरलीच. अवाक् होऊन पूर्वाकडे बघतच राहिली. पूर्वाने त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवला आणि मोठ्या प्रेमाने म्हणाली, “खरंच सांंगते, माझ्याकडून हा रेनकोट तुला भेट. नवीनच आहे. मी कालच विकत घेतलाय तो.” ती मुलगी लगेच म्हणाली, “ताई खरंच नको मला. नवा रेनकोट हरवला म्हणून आई-बाबा मारतील तुला. मी जाईन शाळेेत. ती बघ समोरच आहे माझी शाळा.” पूर्वा तिला हसत हसत म्हणाली, “अगं मला नाही ओरडणार कुणी. मी सांगेन आईला की माझ्या मैत्रिणीला वाढदिवसानिमित्त भेट दिला म्हणून.” मग जबरदस्तीनेच पूर्वाने रेनकोट त्या मुलीच्या हातात दिला. त्या मुलीने मोठ्या उत्सुकतेने तो रेनकोट उघडून बघितला. रंगीबिरंगी रंगाचा रेनकोट तिला खूपच आवडला. तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. कारण रेनकोटमुळे तिचा शाळेत येण्या-जाण्याचा मोठा प्रश्न सुटणार होता. ती मुलगी रेनकोटाचे महत्त्व जाणून होती. म्हणूनच ती पूर्वाच्या पाया पडण्यासाठी खाली वाकली, तर पूर्वाने तिला थांबवत आपल्या मिठीत घेतले. मग हातात हात धरून दोघींनी रस्ता ओलांडला आणि आपापल्या शाळेच्या दिशेने निघाल्या.

पावसाच्या निमित्ताने दोघी एकमेकींना भेटल्या, मैत्रिणी झाल्या अन् बघता बघता दोघींमध्ये असलेली आर्थिक विषमतेची दरी मैत्रीच्या नात्यात सहज विरघळून गेली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -