Thursday, July 18, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनसेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांची फुटबॉल प्रशिक्षक गिरिजा

सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांची फुटबॉल प्रशिक्षक गिरिजा

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी आला होता. नागपूरमध्ये एक फुटबॉल प्रशिक्षक वस्तीमध्ये राहणाऱ्या मुलांना फुटबॉल शिकवतो आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास पाठवतो, अशी त्याची कथा होती. अशीच काहीशी कथा तिची आहे, मात्र तिने एका असाध्य रोगाशी लढणाऱ्या मुलांची टीम तयार केली. इतकंच नाही तर या मुलांच्या टीमने ‘खेलो इंडिया पॅरा गेम्स-२०२३’सह पाच राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत, तेदेखील अवघ्या पाच वर्षांत. ही गोष्ट आहे, केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील फुटबॉल प्रशिक्षक गिरिजा कुमारी मधू यांची.

केरळच्या थामरकुलम, अलप्पुझा येथील एका गरीब शेतकरी कुटुंबात गिरिजाचा जन्म झाला. गिरिजाला पाच भाऊ आणि दोन बहिणी. तिचे बालपण सामान्य परिस्थितीत गेले. १९९२ साली तिने १२ वी पूर्ण केली. तिला पुढे शिकायचं होतं; परंतु तिला तिच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करावा लागला. त्यामुळे तिने तिच्या आईला आधार देण्यासाठी, कोट्टायममध्ये नर्सिंगचा कोर्स केला. दोन वर्षे रु. ७५० प्रति महिना पगारावर हॉस्पिटलमध्ये तिने काम केले. १९९५ मध्ये तिच्या गावातील एक इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर मधू सूधनन यांच्याशी तिचे लग्न झाले.

मधू आणि गिरिजा यांना दोन मुलगे आहेत. मोठा यदू कृष्णन, २५ वर्षीय बहरीनमध्ये सिव्हिल इंजिनीअर आहे, तर धाकटा २० वर्षांचा गोकुल कृष्णन केरळमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बी. टेक शिकत आहे. गोकुलच्या जन्मानंतर मधूने थामरकुलम येथील तिच्या घरी एक छोटा टेलरिंग व्यवसाय सुरू केला. ती डिझायनिंग शिकली. नाईटी, साडी, अंडरस्कर्ट अशी वस्त्रे तयार केली. तीन महिलांना नोकरी दिली. असा १० वर्षे तिने व्यवसाय केला.

गिरिजाला शाळेपासूनच खेळाची आवड होती; पण कौटुंबिक परिस्थितीमुळे ती खेळू शकली नाही. आपण खेळू शकलो नाही; पण मुलाने फुटबॉलपटू व्हावे, यासाठी तिने २०११ मध्ये स्थानिक फुटबॉल अकादमी, चथियारा फुटबॉल अकादमी (CFA) मध्ये तिच्या दुसऱ्या मुलाला दाखल केले. २०१७ पर्यंत, गिरिजा अजूनही तिच्या मुलाच्या फुटबॉल प्रशिक्षणात गुंतलेली होती. जेव्हा अनेक चांगल्या प्रशिक्षकांनी चथियारा फुटबॉल अकादमी सोडले, तेव्हा तिने स्वतः प्रशिक्षक होण्याचा निर्णय घेतला. तिने अलाप्पुझा येथे सहा दिवसांच्या फुटबॉल कोचिंग कोर्समध्ये प्रवेश घेतला. सुरुवातीला ती अपयशी ठरली. त्यानंतर तिने कोचीमध्ये पुन्हा कोर्स केला आणि तिला प्रमाणपत्र मिळाले. नंतर गिरिजाने २०२१ मध्ये पिल्लई ग्रुप, मुंबईच्या क्रीडा व्यवस्थापनातील फिफा इंडिया एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामबद्दल ऐकले. तिने मुंबईत त्यांच्या ऑफिसला फोन केला; पण मल्याळम मिश्रित इंग्रजी बोलायला तिला त्रास झाला.

सुदैवाने दुसऱ्या बाजूला डॉ. सेलिना जॉय नावाची मल्याळी महिला होती. भेदरलेल्या गिरिजाला त्यांनी शांत केले आणि मल्याळम भाषेत सर्व काही समजावून सांगितले. सेलिनाच्या मदतीने गिरिजाने स्पोर्ट्स मॅनेजमेंट कोर्ससाठी अर्ज केला. मुलाखतीसाठी तिने इंग्रजी सुधारली. मुलाखतीत तिने तिच्या उत्साहाने प्राध्यापकांना प्रभावित केले आणि एक विशेष बाब म्हणून तिला प्रवेश देण्यात आला. त्यानंतर कोविडचा फटका बसला आणि २०२१ मध्ये हा कोर्स ऑनलाइन झाला. गिरिजाने हा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केला आणि लवकरच केरळच्या वरिष्ठ मुलींच्या फुटबॉल संघाची संघ व्यवस्थापक बनली.

गिरिजा ऑल इंडिया फुटबॉल असोसिएशन (AIFA)च्या गोल्डन बेबी लीगमध्ये सामील झाली, ही लीग दरवर्षी ५०० ग्रामीण मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देते. तिथे काम करताना तिची कविता सुरेशशी भेट झाली, जी सेरेब्रल पाल्सी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे नेतृत्व करत होती. शरीराची हालचाल आणि स्नायूंच्या समन्वयावर परिणाम करणारा सेरेब्रल पाल्सी (CP) हा एक दुर्धर आजार आहे. समाजाच्या परिघावर ते असतात. त्यांना दुर्लक्षित ठेवले जाते. गिरिजाने तीन वर्षांपूर्वी सेरेब्रल पाल्सी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ केरळ (CPSAK) ची स्थापना केली. तिने थामारकुलम या गावात सेरेब्रल पाल्सी मुलांसाठी फुटबॉल उपक्रम आयोजित करण्यास सुरुवात केली.

तिने सेरेब्रल पाल्सी असलेल्या २० मुलांना योग्य प्रशिक्षण आणि आहार मिळावा यासाठी तिचे सोने गहाण ठेवले. पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी गिरिजाने २ लाख रु. तिचे दागिने गहाण ठेवून जमवले. पुढे अनेक वेळा दागिने गहाण ठेवावे लागले. असोसिएशनमध्ये सामील होण्यापूर्वी गिरिजाने सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांबद्दल खूप संशोधन केले आणि त्यांचा संघर्ष समजून घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना देखील भेटली.

२०२१ पासून गिरिजाने सुमारे २५० सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांना प्रशिक्षित केले आहे आणि खेलो इंडिया पॅरा गेम्स २०२३ सह  आम्ही सहभागी झालेल्या सर्व पाच राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. या मुलांसाठी फिटनेस प्रशिक्षण लवकर सुरू करण्यासाठी, ती पालकांना प्रोत्साहित करते. कोचिंगच्या आव्हानांबद्दल स्पष्टीकरण देताना गिरिजा म्हणते, ‘‘समाज अनेकदा या मुलांकडे दुर्लक्ष करतो किंवा त्यांची थट्टा करतो आणि त्यांचे पालक त्यांच्या भविष्याबद्दल घाबरतात. आम्ही या मुलांना सामान्य मुलांप्रमाणे प्रशिक्षण देतो; पण ते कठीण आहे. या मुलांची नोंदणी करण्यास इच्छुक पालकांना शोधणे कठीण आहे म्हणून आम्ही टॅलेंट हंट स्पर्धा घेतो. सुदैवाने आता लोकांना आमच्याबद्दल माहिती आहे आणि थेट संपर्क साधला जातो.’’

२०२३ मध्ये, गिरिजाने अमोघा फाऊंडेशनची सुरुवात मेव्हण्याच्या मदतीने कौशल्यवान अपंग मुलांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीतील मुलांसाठी केली. त्यांनी १५ मुलांना स्कूटर आणि लॅपटॉप देऊन आणि त्यांच्या कौशल्य विकासासाठी मदत केली आहे. एचडीएफसी बँकेची ऊर्जा फाऊंडेशन गिरीजाचे कार्य लक्षात घेऊन अमोघाच्या सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांना आणि स्त्रियांना मदत करते, ग्राफिक डिझाइनसारख्या कौशल्यांमध्ये वर्षभर प्रशिक्षण देते आणि त्यांना स्वतंत्र भविष्यासाठी नोकरी सुरक्षित करण्यात मदत करते. एका स्त्रीने निर्धार केला, तर ती समाजात किती बदल घडवून आणू शकते, हे गिरिजाच्या कार्यातून कळते. दुर्धर आजाराशी झुंजणाऱ्या मुलांना राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धा जिंकून देणारी गिरिजा कुमारी मधू खरी लेडी बॉस आहे.
theladybosspower@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Previous article
Next article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -