
सुजाता सौनिक यांची झाली नियुक्ती
मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary of the State) महिला अधिकारीची नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता सौनिक (Sujata Saunik IAS) यांची सचिवपदासाठी निवड झाली असून त्या या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी असतील. सुजाता सौनिक यांनी या आधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली आहे.
सुजाता सौनिक या १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांना मुख्य सचिवपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ लाभणार असून जून २०२५ मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता मावळते मुख्य सचिव नितीन करीर (Nitin Karir) यांच्याकडून त्या सूत्रे हाती घेणार आहेत.
नितीन करीर यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आला होता. तो कालावधी संपल्यानंतर आता या पदावर सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन करीर यांचा कालावधी पुन्हा एकदा वाढवून देण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण राज्य सरकारकडून तसे न करता सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुजाता सौनिक यांचे पती देखील होते मुख्य सचिव
सुजाता सौनिक या राज्याच्या वरिष्ठ अधिकारी असून त्या निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत. मनोज सौनिक यांनीदेखील याआधी राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळे आता पती आणि पत्नी मुख्य सचिव होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
कोण आहेत सुजाता सौनिक?
सुजाता सौनिक यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगड मध्ये झाले आहे. पंजाब विद्यापीठामधून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव गृहमंत्रालय, सरकारच्या सल्लागार सहसचिव अशा महत्त्वाच्या पदावर देखील कारभार सांभाळला आहे. त्या गेल्या तीन दशकांपासून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.