Thursday, July 4, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलविवाहास विलंब, ज्वलंत समस्या

विवाहास विलंब, ज्वलंत समस्या

मनस्विनी – पूर्णिमा शिंदे

हल्ली मोठा आणि गहन प्रश्न, तो म्हणजे, मुला-मुलींची लग्न वेळेत होत नाहीत आणि झालीच तरी ती टिकत नाहीत. काही मुला-मुलींची वये ३० ३५, ४० वर्षे तर काही त्यापुढेही गेली आहेत, असे चित्र आज पाहायला मिळत आहे. मुलांचे करिअर, मुलीही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे होणाऱ्या जोडीदाराबद्दल मुला-मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

मुलगा शिकलेला, दिसायला सुंदर, घरात एकुलता एक असावा, कमवणारा, जास्त पगारवाला, स्वतःचा फ्लॅट, शहरात राहणारा, स्वत:ची खोली अशा एक ना अनेक अपेक्षा असल्यामुळे हल्ली मुला-मुलींचे लग्न जमण्यास विलंब होत आहे. मुलं शिकली असली तरी आज पाहिले तर नोकऱ्याचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे तसेच व्यवसाय करण्यासाठी अपुरे ज्ञान किंवा आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे त्यांची सर्व मेहनत, व्यवसाय उभे सांभाळण्यातच जाते. शेती करणाऱ्याला तर मुली नकोच म्हणतात. त्यामुळे लग्न जमणे अवघड झाले आहे. त्यापेक्षाही मोठा गहन प्रश्न आहे तो म्हणजे केलेली लग्ने टिकणे अवघड होत आहे.

लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो. किंवा स्वतः अगदी मनापासून पसंत केलेला मुलगा किंवा मुलगी असो. काही दिवसांतच दोघांचे पटत नाही.

अगदी किरकोळ भांडण झाले तरी घटस्फोटापर्यंत मजल जातेय. याची कारणे म्हणजे एकमेकांबद्दल झालेले गैरसमज, संशय, तसेच व्यसन, शारीरिक, मानसिक, आजार, लैंगिक समस्या आणि मोबाइलच्या सततच्या वापरामुळे संवाद कमी आणि वादच वाढत चाललेत. कुणी कुणाचं ऐकावं, त्याने बदलले पाहिजे, मी नाही बदलणार असे ठाम विचार. मुलीच्या संसारात तिच्या आई-वडिलांची नको इतकी ढवळाढवळ तर मुलाच्या संसारात त्याचे आई-वडील नको इतके लक्ष घालतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोघांचे वेगवेगळे स्वभाव. आता स्वभावाबद्दल सांगायचे झाले तर, दोघांवर निरनिराळ्या वातावरणात संस्कार झालेले असतात. ते दोघे एकमेकांसारखे असतीलच कसे? एकसारख्या स्वभावाच्या, गुणांच्या दोन व्यक्ती एकत्र येतीलच कशा? आपल्याला हवा तसा जीवनसाथी कसा मिळेल.

सरळ सोप्प आयुष्य देवालाही मिळालं नाही. मग आपल्याला कसं सर्व मनासारखं मिळेल. आपल्याला हवी तशी परफेक्ट व्यक्ती मिळणे म्हणजे स्वप्नातल्या परीकथेसारखचं नाही का! या पिढीच्या आधीच्या लोकांनी संसार केलेत की! त्यांच्यामध्ये तरी कुठे सर्व बाबतीत परफेक्ट होते! तुमच्या आई-वडिलांनी संसार केलेत हे आत्ताची पिढी बघत आली आहे. मग या मुला-मुलींनी त्यांच्याकडून शिकून घेतले पाहिजे आणि त्यानीही शिकवले पाहिजे. संसारात थोड्याफार फरकाने तडजोड करावीच लागते. कोणत्याही जोडप्यात किरकोळ मतभेद, दोषारोप, होतच राहतात. विवाहयोग्य मुला-मुलींनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे आणि थोडीशी तडजोड केल्यासच निश्चित आपली विवाह संस्कृती, विवाह संस्कार टिकून राहील. हे महत्त्वाचे नेमकं चुकतोय कुठे? सध्या युगात भेडसावणारी ही ज्वलंत समस्या! पुढील होणाऱ्या परिणामांना कसे सामोरे जाणार आहात? या सर्व लेखन प्रपंचातून एकच आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन विवाह इच्छुकांनी लग्नात तडजोड करावी आणि लग्नानंतरही तडजोड केल्यास घटस्फोटाचे प्रमाण देखील कमी होईल.

वाद होत असतात. पण ते तुटेपर्यंत ताणायचे नाहीत. थोडा तू बदल, थोडी मी बदलते असे दोघांच्या सामोपचाराने बदल घडवून, वाद न करता संवादाने, एकमेकांना समजून घेऊन. जे मिळालं त्यात आनंद मानून एकमेकांचा स्वीकार करून एकमेकांच्या स्वभावाला थोडीशी तडजोड करून, न जुळणाऱ्या गुणांना एका वेगळ्या प्रेमाच्या रंगाच्या धाग्यात बांधून आयुष्य जोडत गेलो तर नक्कीच तेच प्रेमाचे धागे मजबूत होऊन. पती-पत्नीचे नाते घट्ट होईल. एकूणच आपल्याला सर्वच परफेक्ट मिळणार नाही, जे मिळाले त्याचा आनंदाने स्वीकार करणे. अशा प्रकारचे समुपदेशन करणे ही आजच्या काळाची गरज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -