
मंदिर समितीने घेतला 'हा' निर्णय
पंढरपूर : आषाढी एकादशीसाठी (Ashadhi ekadashi) पंढरपूरला (Pandharpur) वारकरी मोठ्या संख्येने संख्येने दाखल होत असतात. या सर्व वारकऱ्यांना चांगली सुविधा देण्याचा मंदिर समितीचा (Mandir Samiti) प्रयत्न असतो. मंदिर समितीच्या भक्तनिवासांमध्ये (Bhaktaniwas) भाविकांच्या राहण्याची व खाण्याची सोय केली जाते. या भाविकांना चांगल्या प्रतीचे चहा, नाश्ता, भोजन मिळावे यासाठी एका हॉटेलचा ठेका देण्यात आला होता. मात्र, जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे. त्यामुळे भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे.
विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना सर्वात चांगली सुविधा देण्यासाठी मंदिर समितीने उभारलेल्या विविध भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी भाविकांचा ओढा असतो. अतिशय भव्य स्वरुपात उभारलेल्या या विविध भक्तनिवासांमध्ये असलेल्या ३६४ रुममध्ये जवळपास रोज १५०० भाविक निवास करु शकतात. अतिशय आलिशान पद्धतीने उभारलेले नवीन भक्त निवास तर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र असते. या भाविकांची लूट होऊ नये यासाठी मंदिर समितीने मोठा निर्णय घेत हॉटेल स्वतःच्या ताब्यात घेतले आहे.
कालपासून याची सुरुवात झाली असून भाविक येथील अल्पदरात मिळणाऱ्या आणि चांगल्या प्रतीच्या खाद्यपदार्थावर खुश असून मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड सर्व सुविधांकडे लक्ष ठेवून आहेत. चहा, कॉफी , दूध आणि नाश्त्याच्या दरात निम्म्याने कपात केली असून जेवणाची थाळी तर केवळ १०० रुपयात ठेवल्याने भाविकांच्या खिशाला कात्री लागणे बंद होणार आहे. या भक्तनिवासमध्ये वर्षभरात देशभरातून तीन लाखापेक्षा जास्त भाविक निवासासाठी येत असतात. आता मंदिर समिती या भाविकांना चांगल्या प्रतीचे खाद्यपदार्थ अतिशय अल्पदरात देणार आहे.