
लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये (MSRTC) नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी मिळत आहे. एसटी महामंडळ अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी मेगाभरती जारी केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि नियंत्रक विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना एसटी महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. अर्ज करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले असल्याने उमेदवारांनी या संधीचा पुरेपूर फायदा करुन घ्यावा, असे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.
'या' पदांची भरती
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात समुपदेशक पदासाठी नोकरीची संधी आहे. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मानसिक ताणतणावाचे निवारण करणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे यासाठी समुपदेशक पदाची नियुक्ती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (M.S.W) किंवा कला शाखेची पदव्युतर पदवी (M.A Psychology) किंवा समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवाराला समुपदेशन क्षेत्रातील शासकीय, खाजगी संस्थामधील किमान २ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर ही नोकरी मानद तत्त्वावर घेण्यात येणार आहे. यासाठी नेमणुकीचा कालावधी १ वर्षांचा आहे. आवश्यकतेनुसार हा कार्यकाळ वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. लातूरमध्ये ही नोकरीची संधी आहे. १२ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
याबाबत अधिक माहिती https://msrtc.maharashtra.gov.in/GeneralPages/Recruitment.aspx या वेबसाइटवर देण्यात आली आहे.