
पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सजली
देहू : आषाढीची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला जातात. आषाढी वारी (Ashadhi Wari 2024) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पायी पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी (Dehu) सज्ज झाली असून प्रशासनही (Administration) वारकऱ्यांची विशेष काळजी घेण्यासाठी सज्ज झाले आहे. भाविक व वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, आरोग्य केंद्रासह पालखी परिसरात स्वच्छतेची काळजी देखील घेतली जात आहे.
अशातच आज संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान होणार आहे. यामुळे परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यासोबत वारकरी पूजाअर्चा व भजन करीत असल्याने सध्या देहूत भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थान व नगरपंचायत प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.
भाविकांची राहण्यासाठी तारांबळ
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, वैकुंठगमन मंदिर, येलवाडी येथील भागीरथी माता मंदिर, विठ्ठलनगर येथील पादुका मंदिर व चिंचोली पादुका मंदिर, अनगडशहावली दर्गा परिसरात भाविकांची गर्दी आहे. परिसरात तुरळक पाऊस पडत असल्याने भाविकांची राहण्यासाठी तारांबळ उडत आहे. तर ठिकठिकाणी मोठ्या गृह प्रकल्पांच्या पार्किंगमध्ये, खासगी व प्राथमिक शाळेच्या आवारात व वर्ग खोल्यांमध्ये तात्पुरती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रस्थान कार्यक्रम
- पहाटे ४.३० - महापूजा
- ५ ते ७ - काकडा
- ८ ते ९ - गाथा भजन
- १० ते १२ - काल्याचे किर्तन
- १२ ते १ - जरीपटका सन्मान
- १ ते २ - पादुका पूजन व सत्कार
- दुपारी २ - पालखी प्रस्थान
- सायंकाळी ६ - पालखी मुक्काम
- रात्री ९ ते ११ - किर्तन, जागर
महापालिकेची तयारी
- शीघ्रकृती दलाचे स्वतंत्र पथक
- सोहळ्यावर ड्रोनद्वारे नजर
- मुक्कामाच्या ठिकाणी सोयीसुविधा
- दिंडीप्रमुखांचा सत्कार
- पालखी मार्गावर वृक्षारोपण
- फिरती शौचालये, तात्पुरती स्नानगृहे
- वीस हजार सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध