Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीवात्सल्यमूर्ती श्री गजानन महाराज

वात्सल्यमूर्ती श्री गजानन महाराज

गजानन महाराज – प्रवीण पांडे, अकोला

मानसी बापट, बंगळूरु यांना आलेला श्री गजानन महाराजांचा अनुभव.

आमच्या इथे श्री गजानन महाराजांची भक्ती पूर्वीपासूनच आहे. दहा वर्षांपूर्वी मी शेगाव येथे जाणार होते म्हणून फेसबुकवर मेसेज केला की, “महाराजांच्या दर्शनाला जाणार आहे, तर चार दिवस फेसबुकवर असणार नाही.” त्या क्षणी एक स्नेही प्रशांत सर, जे माझे फेसबुक फ्रेंड होते; पण मी त्यांना कधीही भेटले नव्हते. त्यांनी मला मॅसेज केला आणि त्यांचा फोन नंबर दिला आणि सांगितले की, “मला कॉल करा. तुम्ही शेगावला येत आहात, तर मी तुम्हाला लागेल, ती मदत करेल.” मी थोडी विचारात पडले की ओळख नाही, कधी भेटलो नाही आणि फोन कसा करू? दुपारी मिस्टर जेवायला घरी आल्यावर, त्यांच्याशी बोलून प्रशांत सरांना फोन लावला. त्यांनी मला व्यवस्थित मार्गदर्शन केले आणि मी कुठल्या गाडीने येणार हे विचारून घेतले. जेव्हा आम्ही स्टेशनवर उतरलो, तर त्यांचा असिस्टंट आम्हाला घ्यायला आला होता.

स्टेशनजवळच एका रेस्टहाऊसवर त्यांनी आमच्यासाठी रूम बुक केली होती. कुठलेही नाते नाही, साधी ओळख ही नाही, तर भेट तर दूरचीच गोष्ट; पण या सगळ्यामुळे मी खूप भारावून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला VIP दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली होती. त्यामुळेच गजानन महाराजांच्या फोटो समोर (गादी, महाराजांचे विश्रांती स्थान) उभी राहून मी दर्शन घेतले. इतका आनंद झाला होता की काय सांगू, आनंदाने डोळ्यांतून अक्षरशः पाणी येऊ लागले होते. मी बाहेर आल्यावर प्रथम प्रशांत सरांना कॉल केला आणि त्यांचे आभार मानले. आनंदसागरला देखील आम्हाला त्यांच्याच असिस्टंटने सोडले. खूप छान वाटत होते आम्हाला. इतकी आपुलकी एका अनोळखी व्यक्तीकडून खरेच आम्ही खूपच भाग्यवान होतो. तेव्हापासून मी ही ठरवले की, आपल्याला जितकी मदत करता येईल तितकी करायची. फक्त पैशाने मात्र कुणालाच नाही. तेव्हापासून आम्ही प्रत्येकाला शक्यतो मदत करीत असतो. या सगळ्यातून मला खूप आनंद आणि समाधान मिळते.

बंगळूरु ते शेगाव हे अंतर खूप मोठे आहे. रात्रंदिवस प्रवास करून आल्यावर जर कोणी आपली व्यवस्था आपुलकीने लावून दिली म्हणजे आपण तसेच चिंतामुक्त होतो, समाधान पावतो. पण हे सर्व घडून येण्याकरिता श्रींची कृपा असावी लागते. श्री गजानन महाराज हे अत्यंत दयाळू आणि कनवाळू आहेत.

शेगावला दर्शनाला गेले असता, माहेरी आल्याचा अनुभव येतो. मंदिरातील प्रत्येक व्यक्ती, सेवेकरी, व्यवस्थापन आणि मंदिरात असणारी सर्व मंडळी अतिशय स्नेहाने वागतात, बोलतात. असे सुंदर स्थळ, संस्थान माझ्या तरी पाहण्यात दुसरे नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -