Thursday, July 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजThackeray and Fadnavis : ठाकरे आणि फडणवीसांचा विधीमंडळात एकाच लिफ्टने प्रवास!

Thackeray and Fadnavis : ठाकरे आणि फडणवीसांचा विधीमंडळात एकाच लिफ्टने प्रवास!

चंद्रकांत पाटील, अंबादास दानवे, अनिल परब आणि उद्धव ठाकरे यांनीही हसतखेळत खाल्ले पेढे

राजकीय वर्तुळात या भेटींची तुफान चर्चा; नेमकं चाललंय काय?

मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) सर्व राजकीय पक्षांनी (Political Parties) जास्त जागा निडून आणण्यासाठी कंबर कसली होती. सत्ताधारी व विरोधी पक्षांतील एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीकाही केली होती. मात्र, आज विधीमंडळात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. आधीचे सहकारी मात्र मधल्या काळात प्रचंड शत्रुत्व निर्माण झालेले ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज विधीमंडळात चक्क एका लिफ्टने जाताना दिसले. त्यांच्यात जुजबी संवादही झाला. एवढंच नव्हे तर भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, अनिल परब (Anil Parab) व उद्धव ठाकरे यांच्यातही पेढे खात गप्पा झाल्याचे पाहायला मिळाले. या भेटींची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

झालं असं की, विधीमंडळात लिफ्टपाशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही नेते एकाचवेळी येऊन थांबले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जुजबी संवाद झाला. त्यांनी एकाच लिफ्टने प्रवासही केला. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे दोघांमध्ये कटुता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील तोंडदेखला का होईना पण झालेला संवाद हा महत्त्वाचा मानला जात आहे.

पेढे खात रंगल्या गप्पा

राज्य विधीमंडळाच्या कालपासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. त्यामुळे आजही कटुतेचं चित्र असेल, असा अंदाज होता, मात्र विधीमंडळात अधिवेशनापूर्वी एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली. ते विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांना एक भलेमोठे चॉकलेट दिले.

यावेळी अंबादास दानवे यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे आणि अनिल परब हे देखील उपस्थित होते. चंद्रकांत पाटील दालनात येताच या सर्व नेत्यांमध्ये हसतखेळत संवाद सुरु झाला. अंबादास दानवे यांनी चंद्रकांत दादांसमोर पेढ्याचा बॉक्स धरला. दादा लोकसभा निवडणुकीत आमचे ३१ खासदार निवडून आले म्हणून आम्ही पेढे वाटत आहोत, असे अंबादास दानवे यांनी म्हटले. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या हातातील पेढ्याचा एक तुकडा शेजारी उभे असलेल्या अनिल परब यांना देत म्हटले की, मी यांचा पेढा अॅडव्हान्समध्ये वाटतो. ठाकरे गटाचे अनिल परब हे नुकतेच मतदान पार पडलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे किरण शेलार रिंगणात आहेत. या निवडणुकीचा निकाल १ जुलैला जाहीर होईल. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचे अगोदरच अभिनंदन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -