Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

NEET Paper Leak Case : धक्कादायक! नीटच्या गोंधळात राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यात सबएजंट कार्यरत

NEET Paper Leak Case : धक्कादायक! नीटच्या गोंधळात राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यात सबएजंट कार्यरत

एवढंच नव्हे तर त्यात पालकांचाही समावेश!

लातूरच्या दोन आरोपी शिक्षकांनी केला मोठा खुलासा

लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात (NEET Paper Leak Case) दिवसेंदिवस नवनवीन उलगडे होत आहेत. वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (NEET) पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरपर्यंत पोहोचले होते. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशा दोन आरोपी शिक्षकांना नांदेड एटीएसने ताब्यात घेतलं आणि त्यांची कसून चौकशी केली. चोकशीदरम्यान एक मोठा धक्कादायक खुलासा या शिक्षकांनी केला आहे. नीटच्या प्रकरणात काही पालकांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या पालकांनी आपल्या पाल्याचे गुण वाढवून मिळावेत, यासाठी ४ ते ५ लाख रुपये दिले असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

विद्यार्थ्यांचे गुण वाढवून देण्यासाठी पैसे उकळल्याची धक्कादायक माहिती दोन आरोपी शिक्षकांनी पोलीस चौकशीत दिली. वैद्यकीय प्रवेश परीक्षेत गुण वाढवण्याचं आमिष दाखवून अनेक पालकांकडून प्रत्येकी ४ ते ५ लाख रुपये उकळल्याचा प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला. या रॅकेटमध्ये सहभागाच्या संशयावरून पोलीस कोठडीत असलेले जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक संजय जाधव, जलील पठाण यांनी चौकशीत धक्कादायक माहिती दिली.

आरोपी शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, या घोटाळ्यात जिल्ह्याजिल्ह्यात अनेक सबएजंट कार्यरत आहेत. दरम्यान, यापैकी २८ जणांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र, यातीलच काहींनी आपल्या पाल्यांसाठीही पैसे दिलेले असल्याचा खुलासा झाला आहे. त्यामुळे आता यांना या रॅकेटमधले सबएजंट म्हणायचं की, पालक या संभ्रमात पोलीस पडले आहेत.

पोलीस कोठडीत असलेला जलील पठाण आणि संजय जाधव यांनी नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची बरीच माहिती पोलिसांना दिली. गेल्या ३ ते ४ वर्षांत पठाण आणि जाधवसारखे अनेक एजंट लातूर जिल्हा आणि मराठवाड्यातही कार्यरत आहेत. त्यांनी जे पैसे जमा केले, त्या विद्यार्थ्यांचे गुणही वाढवून देण्यात आल्याचा दावा या दोघांनी केला आहे. इतकंच नव्हे तर इतर सरकारी नोकर भरती प्रक्रियेतील परीक्षेतही हे रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपी शिक्षक जाधव आणि पठाण यांच्याकडून पैसे घेऊन ते दिल्लीपर्यंत पोहोचवणारा उमरगा, आयटीआयमधील सुपरवायझर इरन्ना कोनगलवार आणि दिल्लीतील एजंट गंगाधर हे तीन आरोपी अद्याप फरार आहेत. गंगाधर हा मूळचा मराठवाड्याचा असून उत्तराखंडमध्ये लपून बसला आहे.

Comments
Add Comment