Tuesday, July 2, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीधनाच्या पाठी धावताना...

धनाच्या पाठी धावताना…

ऋतुराज – ऋतुजा केळकर

धनाच्या पाठी धावताना…
सारे श्वास खर्चियले…
शेवटास सोबतीस…
नाही सरणही उरले…

लिहिता लिहिता माझे हात पुन्हा एकदा थांबले. रतन टाटा यांची एक गोष्ट आठवली. त्यांना प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते ब्रिटन येथे ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ देण्यात आले होते; पण ते त्या समारंभास हजर राहिले नाहीत, कारण त्यांचा कुत्रा अतिशय आजारी होता. मनात आलं, कुठल्या मुशीतून देवानं अशी माणसं तयार केली आहेत. देवानं एका बाजूला क्रूरकर्मा हिटलर बनवला, तर दुसऱ्या बाजूला रतन टाटांसारखे अनमोल रत्न.

कसं आहे ना, संस्कृतीची सांगड घालून, शुभंकर विचारांची जोपासना करत, जीवनाची नीतिमूल्य जपत जगणारी रतन टाटा म्हणा किंवा डाॅक्टर आमटेंसारखी माणसं पाहिली की, “तेथे कर माझे जुळती” ही उक्तीच आठवते. एका वाक्यात यांचं वर्णन करायचं झालं, तर ‘आचार विचारांची बकुळ फुलं सदैव ज्यांच्या आठवणीने मनाच्या अंगणात गोंदण शिल्पासम रांगोळी घालतात, अशी ही माणसं’ आणि आज एका बाजूला वडिलांच्या जीवावर उड्या मारत पैसा, व्यसनं तसेच माज यांच्या नशेत धुंद होऊन कुण्या पादचाऱ्यांवर गाडी घालून संपूर्ण न्यायसंस्थेला, मीडियाला इतकंच काय सामान्य माणसालाही कामाला लावणारी आजची ही पिढी अत्यंत बेधुंद वागतेय, तर त्यातीलच कुणी एक जिच्याबरोबर आयुष्य काढायच्या आणाभाका घेतल्या तिलाच भर रस्त्यावर साध्या गाडीच्या पान्हाने ठेचून ठेचून ठार मारणारा क्रूरकर्मा आणि त्याला अजिबात न अडवता नेभळटपणे पाहत राहणारा षंढ समाज. याच कारण काय असावे? एक नाही तर अनेक आहेत.

एक तर आज समाजात लोप पावत चाललेली एकत्र कुटुंबपद्धती आहेच; पण याच साऱ्या कारणांची कारणमीमांसा करणं अत्यंत गरजेचं आहे, असं कुठे तरी नाही का वाटतं? मी असं मुळीच म्हणणार नाही की, ‘आजच्या आधुनिक युगात अश्मयुगीन नियम पाळा’ पण आधुनिक विचारधारा आणि अध्यात्म यांची कुठेतरी सांगड घालून, चिरतरुण, मंगलकारी आणि ज्ञानदायी अशा समाजरचनेचा पाया घालून तो जनमानसांच्या हृदयापर्यंत पोहोचविणे गरजेचं आहे, असं मला वाटतं. आपण जरी रतन टाटा नाही बनू शकलो, तरी निदान स्वतःला असं घडवा की, आपल्या पाठीमागे आपलं नुसतं नाव जरी उच्चारलं ना तरी सर्वांच्याच मनात आदर तर दाटून यावाच यावा; पण दुराचारी वृत्तीच्या व्यक्तींच्या मनात धडकी भरली पाहिजे. याकरिता आपल्या आयुष्याच्या कॅलिडोस्कोपवर निष्कलंक चारित्र्याने आशा, अपेक्षा आणि स्वप्न यांच्या कुंचल्यातून आदर्श नीतिमूल्ये जपून, जग जिंकण्याचे मूलमंत्र रेखाटा. अर्थातच त्याकरिता आपल्याला आवश्यकता आहे, ती मनाच्या स्थिरतेची आणि ती स्थिरता प्राप्त होते, ती ध्यान साधनेतून, योगातून तसेच मौलिक विचारांतून.

चिखलात राहूनही कमळ स्वच्छ आणि सुंदर राहून अखेरीस परमेश्वराच्या चरणकमलावर स्वतःला अर्पित करते, ते वाईटातून नेहमीच चांगल्याची आवड असण्याच्या त्याच्या वृत्तीमुळेच. म्हणूनच जर हे गुण आचरणात आणायचे असतील, तर मन अपार श्रद्धेने भरून जाणं अत्यंत गरजेचे आहे. खरं पाहायला गेलं, तर देव जरी सर्व सृष्टीचा निर्माता असला, तरी तो कुठेही प्रत्यक्षात अवतीर्ण होतं नाही. तो त्याच्या दूतांच्या करवी सौंदर्य आणि मांगल्य निर्मिती करतो. त्यानं प्रत्येकाच्याच हृदयाच्या पणतीत दोन ज्योती लावलेल्या आहेत. एक शुभंकर विचारांची, तर दुसरी षडरिपूंची.

आपण कुठल्या ज्योतीचे मशालीत रुपांतर करून जीवनात मार्गक्रमण करायचं, ते स्वतःच ठरवायचं असतं. त्यावरच त्याच घरादारात आणि समाजात स्थान ठरतं. कसं आहे ना की, शुभंकरत्वाने कलियुगातील हा भवसागर तरून जाण्यास मदत होते, तर षडरिपूंनी आपल्या आत्मारुपी ओढणीला दुःष्कर्माचे डाग पडून, जन्म-मृत्यूच्या या फेऱ्यात अडकून पडायला होतं.

म्हणूनच क्षुद्र मोहाच्या ध्यासापायी माणुसकीच्या सुगंधित सुरांची सुरावट न ऐकता, अनऋतू म्हणजे ऋतूचक्राच्या विरोधी वागणे गैर नाही का? आपण सारेच कमी-अधिक फरकाने त्या परमेश्वराची अप्रतिम रचना आहोत म्हणूनच आपल्या या आयुष्यातील ऋतुचक्रात काल, कर्म आणि कारण यांचा त्रिवेणी संयोग घडवून कालाच्या पानावर आपलं नाव चिरकालाकरिता सुवर्णाक्षरांनी गोंदले जाईल, याची काळजी किती घ्यायची, हे ज्याचं त्यानं ठरवावं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -