Tuesday, July 16, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखअतिउष्णता कामगारांच्या जीवावर

अतिउष्णता कामगारांच्या जीवावर

मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक

भारतासारख्या देशात ९० टक्के कामगार शक्ती, कृषी, बांधकाम, वीटभट्टी आणि इतर तत्सम क्षेत्रांमध्ये प्रचंड राबते. तेथे काम करणाऱ्या कामगारांना उष्णतेच्या तीव्रतेमुळे लक्षणीय धोका सहन करावा लागतो. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या नवीन अहवालात जगभरातील ७० टक्क्यांहून अधिक कामगारांना अतिउष्णतेचा धोका वर्तवण्यात आला असून त्यांची सुरक्षा आणि आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे.

जगातील ३.४ अब्ज कर्मचाऱ्यांपैकी २.४ अब्जाहून अधिक कामगारांना त्यांच्या कामाच्या वेळी कधी तरी अतिउष्णतेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘बदलत्या हवामानात कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्य सुनिश्चित करणे’ या शीर्षकाच्या अहवालानुसार, २००० ते २०२० या २० वर्षांच्या कालावधीमध्ये उष्णतेमुळे जोखीम अंदाजांमध्ये ३४.७ टक्के वाढ झाली आहे. हवामान बदलामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे, हे त्रिकालबाधित सत्य आहे. याव्यतिरिक्त, जादा तापमानामुळे जागतिक कर्मचारी वर्ग अकाली वृद्ध होत आहे. मोठ्या संख्येने लोक संभाव्य धोकादायक उष्णतेच्या स्थितीत आहेत.

गेल्या २० वर्षांमध्ये अतिउष्णतेमुळे धोकादायक स्थितीत गेलेल्या कामगारांचे प्रमाण ६५.५ टक्क्यांवरून ७०.९ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. २०२३ मध्ये तापमानात विक्रमी वाढ झाली आहे. २०२४ मध्येही हा ट्रेंड कायम राहिला. जागतिक हवामान संघटनेच्या मते, जानेवारी २०२४ हा आतापर्यंतचा सर्वात उष्ण जानेवारी महिना होता. भारतात ९० टक्के श्रमशक्ती अनौपचारिक क्षेत्रात कार्यरत आहे. शेती, बांधकाम, वीटभट्ट्या आणि इतर तत्सम क्षेत्रांमध्ये काम करत असताना कामाच्या वेळी जास्त उष्णतेच्या संपर्कात आल्याने कामगारांना उष्माघाताचा त्रास होतो. हवेचे तापमान, आर्द्रता आणि औद्योगिक सेटिंग्जमधून उष्णतेचे स्रोत, उष्णता उत्सर्जित करणारे स्रोत आणि यंत्रसामग्रीमुळेही भोवतीच्या तापमानात वाढ होत असते. भारतीयांना आधीच कळत-नकळत मानवी जगण्याच्या मर्यादेच्या आसपासच्या तापमानाचा सामना करावा लागत आहे.

उष्णतेशी संबंधित जोखमींमुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या घटकांमध्ये दारिद्र्य, अनौपचारिक रोजगार आणि शेतीचे जास्त दर पाहता येतात. वंचित आणि असुरक्षित लोकसंख्येला याचा जास्त धोका आहे. शेती किंवा किनारपट्टीवर काम करणाऱ्यांना उष्णतेचा धोका आहे. भारत, आफ्रिकन आणि पश्चिम आशियाई देशांसारख्या उष्ण तसेच ग्रामीण भागात मूत्रपिंडाच्या तीव्र आजाराची महामारी मोठ्या प्रमाणात शारीरिक श्रम करणाऱ्या कामगारांना प्रभावित करत आहे. अहवालात म्हटले आहे की, मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे कृषी कामगार मोठ्या संख्येने मृत्यू पावू लागले आहेत. एकट्या मध्य अमेरिकेत, एका दशकात २० हजारांहून अधिक लोक या आजाराने मरण पावले असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. दरम्यान, जगभरात २६.२ दशलक्ष लोक कामाच्या ठिकाणी उष्णतेच्या तणावाशी संबंधित तीव्र मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते.

जागतिक कामगार संघटनेने आणखी एका अभ्यास अहवालाचा आढावा देऊन म्हटले आहे की, सामान्य कार्य चालू ठेवण्यासाठी शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअस राखणे आवश्यक आहे. ते ३८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढल्यास शारीरिक आणि संज्ञानात्मक कार्ये विस्कळीत होतात. ते ४०.६ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढल्यास अवयवांचे नुकसान होऊन संवेदना नष्ट होण्याचा धोका निर्माण होऊन मृत्यू होऊ शकतो. अति उष्णतेमुळे दरवर्षी होणाऱ्या २२.८७ दशलक्ष व्यावसायिक अपघातांमध्ये अंदाजे १८,९७० जीव जातात, तर २.०९ दशलक्ष लोकांना अपंगत्व येते. भारतातील बहुतेक उष्णतेवरच्या कृती योजना स्थानिक संदर्भांशी जुळवून घेत नाहीत. अभ्यास अहवालात नमूद केले आहे की, कामगारांमधील आरोग्याच्या अनेक परिस्थितीचा संबंध हवामान बदलाशी आहे. त्यात कर्करोग, हृदयविकार, श्वसन रोग, मूत्रपिंड निकामी होणे आणि मानसिक आरोग्य आदींचा सामवेश आहे. १.६ अब्ज कामगार अल्ट्राव्हायोलेट किरणोत्सर्गाच्या संपर्कात आहेत आणि १८,९६० पेक्षा जास्त कामगार दर वर्षी नॉन-मेलेनोमा त्वचेच्या कर्करोगामुळे बळी पडतात. १.६ अब्ज लोक कामाच्या ठिकाणी वायू प्रदूषणाच्या संपर्कात येतात. दर वर्षी आठ लाख ६० हजार कामगारांचा मृत्यू होतो.

कृषी क्षेत्रातील ८७० दशलक्षपेक्षा अधिक कामगार कीटकनाशकांच्या संपर्कात येण्याची शक्यता असते. कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे दर वर्षी तीन लाखांहून अधिक मृत्यू होतात. परजीवी आणि वेक्टर-जनित रोगांमुळे दर वर्षी १५ हजार मृत्यू होतात. बांगलादेशमध्ये, विविध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या चार लाखांहून कामगारांना प्रचंड उष्णतेमुळे वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यातील ६० टक्के कर्मचारी महिला आहेत. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, कारखान्यांमध्ये विशेषतः कापड कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त कामगारांना यंदाच्या उन्हाळ्यात प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागला. २२ वर्षीय आयशा तालुकदार तनिसा ही ढाका येथील एका जीन्स कारखान्यात टेलर म्हणून काम करते. हा कारखाना पाश्चिमात्य ब्रँडसाठी कपडे बनवतो. बांगलादेशच्या ७० वर्षांच्या इतिहासात इतक्या तीव्रतेची आणि कालावधीची उष्णतेची लाट आली नव्हती. ती म्हणते, ‘आमच्यापैकी काही मुली आजारी पडल्या आहेत. उष्णतेमुळे त्यांना मळमळ किंवा अशक्तपणा जाणवतो. कापड कारखान्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी उष्मा एक आव्हान बनले आहे.’ एका संशोधन अहवालानुसार, अत्यंत उष्णतेच्या प्रभावामुळे बांगलादेशची वार्षिक सहा अब्ज डॉलरची श्रम उत्पादकता गमावत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे की, जगभरातील दोन तृतीयांशपेक्षा जास्त कामगार कामाच्या ठिकाणी तीव्र उष्णतेच्या संपर्कात आले आहेत.

‘बांगलादेश इन्स्टिट्यूट ऑफ लेबर स्टडीज’चे उपसंचालक मनिरुल इस्लाम म्हणतात, ‘उष्णता हा कापड उद्योगासाठी एक गंभीर व्यावसायिक धोका आहे.’ इस्लामने चारशेहून अधिक कामगारांचे सर्वेक्षण केले आणि सांगितले की, पाचपैकी एका कामगाराला उष्णतेमुळे किमान एकदा आजारी रजेवर जावे लागले. ३२ टक्के कामगारांनी सांगितले की, अतिउष्णतेमुळे त्यांची कामाची क्षमता कमी झाली आहे. काही प्रमुख कपडे उत्पादक आपल्या कामगारांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी पावले उचलत आहेत; परंतु कामगार अधिकार कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, कामगारांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी पुरवठादार, ब्रँड आणि सरकारकडून अधिक पैसे आणि वचनबद्धता आवश्यक आहे. केवळ कारखाने थंड ठेवल्याने कामगारांचे संरक्षण होत नाही. बांगलादेशसारख्या देशात, कामगारांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तीव्र उष्णतेमध्ये लांबचा प्रवास करावा लागतो. सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय मर्यादित असणाऱ्या या देशामध्ये बरेच लोक लहान आणि अरुंद घरांमध्ये राहतात. बांगलादेशमधील वस्त्रोद्योगात काम करणारे कामगार महिन्याला सरासरी ११३ डॉलर (सुमारे ९४०० रुपये) कमावतात. एवढ्या मर्यादित उत्पन्नामुळे महागड्या वातानुकूलित यंत्रणा आणि जनरेटर या कामगारांच्या आवाक्याबाहेर आहेत.

उन्हाळ्यात वीज खंडित होणे, ही बांगलादेशची आणखी एक समस्या आहे. ‘ग्लोबल वर्कर डायलॉग’ (जीडबल्यूडी)चे कार्यकारी संचालक गाय स्टुअर्ट नियमितपणे कारखाना कामगारांच्या परिस्थितीचे सर्वेक्षण करतात. त्यांचे म्हणणे आहे की, कारखाने थंड ठेवणे एक वेळ शक्य आहे; परंतु कामगारांना प्रवासादरम्यान किंवा गर्दीच्या घरात राहताना वेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. ‘ग्रीट टेक्नॉलॉजी लि.’ या ऊर्जा तंत्रज्ञान कंपनीमधील ऑपरेशन्सचे प्रमुख सुदीप पॉल यांनी अनेक वर्षे कारखान्यांना हवामानातील आव्हानांचा सामना करण्यास मदत केली आहे. ते म्हणाले की साधी, स्वस्त पावले बदल घडवून आणू शकतात. यामध्ये सकाळी आठऐवजी सकाळी ६ वाजता शिफ्ट सुरू करणे समाविष्ट असू शकते. त्यामुळे कामगार दुपारच्या तीव्र उष्णतेपूर्वी दुपारच्या जेवणासाठी जाऊ शकतात. त्यांना घरी परतण्यासाठी हलके सुती कपडे आणि पांढरे छत्र प्रदान केले जाऊ शकते. कारखान्यांमध्ये कूलरही बसवता येतील; जेणेकरून उष्णता कमी करता येईल. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार कामाच्या ठिकाणी झालेल्या दुखापतींमुळे दर वर्षी सुमारे १९ हजार लोकांचा मृत्यू होतो आणि अंदाजे २६.२ दशलक्ष लोक कामाच्या ठिकाणी होणाऱ्या उष्णतेच्या त्रासामुळे मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त आहेत. अतिउष्ण हवामानाच्या परिणामापासून वाचवण्यासाठी तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -