
संजय राऊतांच्या मागणीवर नरेश म्हस्के यांचा खोचक टोला
नवी दिल्ली : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभेत बिनाचेहऱ्याचं सरकार जास्त चालणार नाही, त्यासाठी चेहरा द्यावाच लागेल, असं म्हणत महाविकास आघाडीसाठी (Mahavikas Aghadi) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, अशी अप्रत्यक्ष मागणी केली. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच सत्ताधारी पक्षांतील नेत्यांनीही राऊतांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ठाण्याचे खासदार व शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी यावर प्रतिक्रिया देत संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. महाविकास आघाडीने राज्यात अबू आझमी (Abu Azmi) यांचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करावा, असे त्यांनी म्हटले आहे.
नरेश म्हस्के म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीने अबू आझमी यांचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करावा. तसाही त्यांनी निवडणुकीत झेंड्याचा रंग बदललेला आहे. हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांचा अडीच वर्षाचा घरात बसून केलेला कारभार आणि अडीच वर्ष पायाला भिंगरी बांधून एकनाथ शिंदे यांनी केलेला कारभार याच मूल्यमापन करावं लागेल, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
महायुतीतील मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत नरेश म्हस्के म्हणाले की, आमच्या नेत्यांनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे की, आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा एकनाथ शिंदे असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.