समर्थ कृपा – विलास खानोलकर
कमलाकर शेठ नावाचा एक भक्त स्वामींना विचारतो की, माझा गर्व, अहंकारी स्वभाव जात नाही. मला मार्गदर्शन करा. दुसऱ्या दिवशी स्वामी स्वप्नात आले व म्हणाले, “अहंकार म्हणजेच अहंम अध्यात्मात एक स्टेज आहे.” अहंम ब्रह्मास्मी म्हणजे मीचे ते ब्रह्म आहे. पण ही स्टेज यायला अहंम म्हणजेच “मी”चे विसर्जन करावे लागते. तेव्हाच हे विश्व ब्रह्ममय दिसू लागते आणि आपल्यातच ते आहे याची जाणीव होते. पण स्वतःच्या अहंकाराचा बळी दिल्याशिवाय नाही.
“देवाचिया द्वारी उभा क्षणभरी त्याने चारी मुक्ती साधीयेला” आता इथे द्वाचे द्वार म्हणजे तुमच्या मन मंदिराचे द्वार आणि जेव्हा तुम्ही भगवंताच्या आठवणीत तल्लीन होऊन, केवळ एक क्षण देहभान विसरता, स्वतःला विसरता, स्वतःमधल्या मी ला विसरता, तो एक क्षण मुक्तीचा असतो म्हणजे परमात्मा मीलनांचा असतो बस्स… तीच मुक्ती काळ, वेळ, स्थिती, शरीर आणि स्वचा विसर तो एकच क्षण मुक्तीचा परमेश्वर भेटीचा असतो. हा एक क्षण येण्यासाठी, भगवंताला शरण जाऊन, अहंकाराचा बळी द्यावा लागतो. नाही तर आहे, जन्मोजन्मी जपाच्या माळा ओढतात. आहे पण मी, सोडायला तयार नाही. मग भगवंत म्हणतो, मी आहे, तर भगवंत नाही आणि मी नाही, तर भगवंत आहे. कळायला फार कठीण आहे, ही गोष्ट. मला माहीत आहे. पण अध्यात्मात जर खरोखर प्रगती हवी असेल, तर मी सोडा आणि भगवंताला शरण जा, त्याला बोला माझ्या सर्व ठिकाणी तूच आहेस म्हणजेच या विश्वात, या पानात, या फुलांत, माझ्या मित्र-मैत्रिणींमध्ये, माझ्या नातेवाइकांमध्ये, माझ्या कुटुंबामध्ये सर्व ठिकाणी भगवंतरूपी परमेश्वरच नांदतो आहे. एवढेच काय पण माझ्या तनात, माझ्या मनात, माझ्या श्वासात, माझ्या विचारात तूच आहेस. “चाले हे शरीर कोणाचिया सत्ते मग अहंता राहिली कोठे, कोण चालवितो आपला श्वास, आपलं शरीर, आपला संसार, आपला व्यापार याचा सूक्ष्म विचार करा, आजपासून एक करूया” जे जे भेटे भूत मानीजे भगवंत” असे गोंदवलेकर महाराज म्हणायचे. म्हणजे जे आपणास भेटतील, ते सर्व भगवंताची रूपं अगदी भूतसुद्धा.
एकदा भूताने संत तुकारामांना उपद्रव करण्यासाठी, त्यांच्यासमोर प्रगट झाले, तेव्हा तुकाराम महाराजांच्या तोंडून सहज वाक्य निघाले, “पांडुरंगा आज या रूपात दर्शन दिलेस धन्य झालो आणि त्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणत हात जोडले. ज्यावेळी तुम्ही सगळीकडे, सर्वांमध्ये भगवंत पाहू लागता, तेव्हा तुमच्यातील भगवंत आपोआपच जागा होतो. तुमची आणि तुमच्या आजूबाजूची परिस्थिती आपोआपच बदलू लागते, आपल्या स्वतःमध्येच फार बदल होतात, करूणेचा झरा तुमच्या अंतरंगात वाहू लागतो, हेच ईश्वराचे स्रोत आहे. कारण जेथे करूणा, दया तेथेच भगवंत. बघा ना आपण किती वेळा चुकतो आणि परत ईश्वराची करूणा भाकतो तो आपल्याला त्याच्या या लेकराला माफ करतोच ना!
हा ईश्वरीय कृपेचा प्रसाद म्हणजे करूणा येणे, अहंकार गेल्याशिवाय कोणालाही मी सांगितलेल्या गोष्टी करणं जमणार नाही. माफ करा, पण हे सत्य आहे. कारण मी हे अनुभवले आहे. दुसऱ्या लोकांना माफ करणे सहजासहजी जमत नाही. अगदी त्यात त्याचे स्वतःचे भले असले, तरी ही वृत्ती घातक परमार्थात तर खूपच, ही वृत्ती पण एक दैनंदिन जीवनातही पूजेला बसता ना? तेव्हा काय बोलता त्यातला एक शब्द आठवा सर्मपयामी, सर्व सर्मपयामी. खरेच क्षमा करणे, हा खूप मोठा गुण आहे. तो सहजासहजी करता येणार नाही. हे चांगल्या वाईट गोष्टीचं समर्पण त्या ईश्वराच्या पायावर करा. रोजच्या रोज आणि सर्वांना माफ करा, माफी मागा आणि मोकळे व्हा, मोकळे झालात की, मन आनंदाने भरून जाईल. तो आनंद वाटा. मग तो आणखी वाढेल आणि नकळतच सर्व ईश्वर चरणी अर्पण करून, तूच कर्ता करविता या भावनेने राहिलो, तर अहंकार आपोआपच गळू लागतो. आपल्याला ईश्वरी सत्तेची जाणीव होऊ लागते. शेवटी एकच बोलतो, “झाडाचे पानंही न हाले चाले त्याची सत्ता मग अहंता राहिली कोठे.”
तुम्ही लहान बालकासारखे व्हा की देव, स्वामी तुमचे पालक होतील ||
प्रेम, आनंद, हास्य वाटा
प्रेमाचेच दुकान थाटा ||१||
शत्रुच्या टाका खाटा
प्रेमरूपी साखर वाटा ||२||
गळू द्या तुमचा अहंकार
वाढू या जगभर सहकार ||3||
विसरा तो वाईट गर्व
ईश्वरचरणी
विसरा सर्व सर्व ||४||
सुरु होईल आनंदाचे पर्व
अमर विलास म्हणे तेच स्वामीपर्व ||५|